ठाणे:- ९६ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन फेब्रुवारी महिन्यात नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेच्या विद्यमाने ठाणे नगरीत आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे अध्यक्ष ‘वस्त्रहरण’ फेम नाटककार गंगाराम गवाणकर आहेत. ठाणेकरांसाठी हा आनंदाचा सोहळा असणार आहे. कारण ठाण्यात होणारं हे पहिलं नाट्य संमेलन आहे. मुंबई प्रमाणे ठाणे सुद्धा एक सांस्कृतिक नगरी आहे. तर ठाण्यात होणार्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या संकुलाला “नाटककार स्वा. सावरकर नाट्य नगरी” असे नाव देण्यात यावे अशी आम्हा सावरकरप्रेमींची इच्छा आहे. सावरकवर हे देशातील जनतेसाठी कळा सोसणारे नाटककार होते. सावरकर म्हणत “नाटकात संसार कसा करावा हे दाखवावे. मानवी जीवन दाखवण्यापेक्षा मानवी जीवनाचे आदर्श दाखवावे” नाटक हे जनतेच्या मनावर परिणाम साधणारे महत्वाचे माध्यम आहे हे त्यांना माहित होते. म्हणून त्यांनी उक्तृष्ट नाट्य लिहिली व ती गाजली सुद्धा. नाटकातील पात्र रंगवताना किंवा साहित्य लिहिताना त्याचा समाजमनावर सकारात्मक पतिणाम होईल याची दक्षता त्यांनी घेतली आहे. प्रेम-प्रसंग, प्रणय प्रसंग रंगवताना अश्लीलतेला शिरकाव करु दिला नाही. एकदा आचार्य अत्रे आणि प्रा. फडके यांच्यात प्रचंड वादविवाद झाले तेव्हा फडके म्हणाले, अत्रे नेहमी फडकेंच्या साहित्यावर टीका करताना म्हणतात की त्यात अश्लील, बिभत्स प्रसंग रगविलेले आहेत, पण ते सावरकरांच्या साहित्यातील तशा वर्णनाच्या वाटेला जात नाही. त्यावर अत्रे म्हणाले, फडके यांनी केलेली बलात्काराची वर्णने वाचली की त्या वाचकाला आपणही असा बलात्कार करावा असे वाटू लागते. पण सावरकरांनी केलेली बलात्काराची वर्णने वाचली कि त्या बलात्कार करणार्याला चाबकाने झोडपावे, त्याला कठोर शिक्षा करावी असे वाटू लागते. सावरकर हे क्रांतीकारक असले तरी ते उत्कृष्ट साहित्यिक होते. १९३८ साली मुंबईत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ते निवडून आले होते. सावरकर म्हणतात त्याच प्रमाणे त्यांनी आपली लेखणी तलवारीसारखी चालवली. काळ्या पाण्यासारखी निर्दयी आणि निष्ठूर शिक्षा भोगत असतानाही हा माणूस देशसेवा सोडत नाही. एकिकडे अंदमानात होणारे हिंदुंवरील अत्याचार ते थोपवून लावत होते. अंदमानमधील निरक्षर कैद्यांना साक्षर करीत होते. तर दुसरीकडे उत्तम काव्य रचत होते. सावरकर अंदमानातून बाहेर पडले तेव्हा ९०% कैदी मराठी साक्षर झाले होते. अंदमानात बंदींना वर्षातून एक भेट मागण्याची मुभा होती. तेव्हा बंदी काहीतरी चांगल्या वस्तु किंवा पदार्थ मागवित असत. पण सावरकारांनी कैद्यांना सांगितले की आतापासून मी सांगतो ती पुस्तके मागवा. त्यानंतर अंदमानात २००० पुस्तकांचा संग्रह झाला. तुरुंगाधिकारी बारी याचा पुस्तकांना विरोध असूनही सावरकरांनी अंदमानात उत्तम वाचनालय सुरु केले. सुट्टीच्या दिवशी बंदिवान मारामार्या किंवा जुगार खेळण्याऐवजी पुस्तक वाचू लागले. स्वभाषाभिमान हे राष्ट्रनिर्मितीचे महत्वाचे अंग असते असं त्यांना नेहमी वाटत. म्हणूनच त्यांनी भाषाशुद्धी व लिपीशुद्धी आंदोलन सुरु केले. राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी स्वभाषेत शिरलेल्या यावनी शब्दांना बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी राज्यव्यवहार कोश निर्माण केला. त्याचप्रकारे सावरकरांनी मराठी भाषेत शिरलेल्या ऊर्दू, इंग्रजी शब्दांसाठी प्रतिशब्द निर्माण केले. जुने असलेले व मृत पावलेले शब्द पुन्हा जीवीत केले. सिने-नाट्य संदर्भातील कित्येक शब्द सावरकरांनी दिलेले आहेत. दिग्दर्शक, पार्श्वसंगीत, नेपथ्य असे शब्द त्यांनी नाट्यजगताला अर्पण केले आहेत. ज्या हातांनी त्यांनी राष्ट्र घडवले, क्रांती केली. त्याच हातांनी त्यांनी मातृभाषेचे पुनरुज्जीवन केले. म्हणूनच सावरकर हे इतर नाट्यकारांपेक्षा वेगळे आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन ठाण्यात होणार आहे. अंदमानच्या भयाण कारागृहात जाण्याआधी सावरकर ठाण्याच्या कारागृहात राहिलेले आहेत. ठाण्याच्या कारागृहातूनच त्यांना अंदमानला नेण्यात आले होते. तर असे ठाणे आणि सावरकरांचे नाते आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन ठाण्यात होणार आहे. तर सावरकरांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी योगायोगाने नव्हे तर नियतीनेच उपलब्ध करुन दिली आहे. कारण ९६ वे नाट्य संमेलन सातारा जिल्ह्यात होणार होते. पण काही कारणास्तव ते ठाण्यात होत आहे. हा निव्वळ योगायोग नाही. सावरकरांनी केलेल्या राष्ट्रभक्तीबद्दल, क्रांतीकार्याबद्दल आपण त्यांना काहीच देऊ शकलेलो नाही. आतापर्यंत त्यांना भारतरत्न मिळायला हवे होते. पण ते नाही मिळाले. ते मिळेल तेव्हा मिळेल. ही आलेली संधी आपण का गमवावी? म्हणून आम्हा सावरकरप्रेमींची अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेला नम्र विनंती आहे की नाट्य संमेलनाच्या संकुलाला “नाटककार स्वा. सावरकर नाट्य नगरी” असे नाव देण्यात यावे. या विनंतीस मान देवून नाट्य परिषद योग्य तोच विचार करतील व योग्य तोच निर्णय देतील अशी आमची नम्र आशा आहे. लेखक : जयेश शत्रुघ्न मेस्त्री]]>