आधार कार्डला रेशनकार्डशी लिंकअप करण्याचे काम राज्यभर सुरु- गिरीश बापट

मुंबई : आधार कार्ड रेशनकार्डशी लिंकअप करण्याचे काम राज्यभर सुरु असून त्‍यामुळे बोगस रेशनकार्डचे प्रमाण कमी होण्यास मदत होत असल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत सांगितले. ठाणे जिल्ह्यातील कुळगाव बदलापूर येथील स्वस्त धान्य दुकानांवर भरारी पथकामार्फत करण्यात आलेल्या कार्यवाहीसंदर्भात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य सर्वश्री किसन कथोरे, अजित पवार, डॉ.पतंगराव कदम, सुभाष पाटील, जयंत पाटील, डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. श्री. बापट म्हणाले, ठाणे जिल्ह्यातील कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीतील दोन स्वस्त धान्य दुकानावर मुंबईतील भरारी पथकाने छापे टाकले. यावेळी या दुकानातून रेशनिंग धान्याचा काळा बाजार होत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर या दोन्ही दुकानाचे प्राधिकारपत्र निलंबित करण्यात आले असून त्यांच्याकडून दंडही वसूल करण्यात आला आहे. रेशनिंग दुकानातून धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठीच राज्यभर आधार कार्डचे लिंकअप करण्यात येत आहे. रेशनिंग दुकानात असलेल्या अन्नधान्याची माहिती देणारे फलक लावले जात आहेत का याबाबतही तपासणी करण्यात येईल.

ठाणे जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या सद्यस्थितीचा तपासणी अहवाल अंतिम टप्प्यात- बबनराव लोणीकर
ठाणे जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या सद्यस्थितीबाबतची तपासणी विभागीय आयुक्तांमार्फत केली जात असून याबाबतचा अहवाल अंतिम टप्प्यात असल्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत सांगितले. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांच्या कामाबद्दल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील, सदस्य मनीषा चौधरी, किसन कथोरे, प्रशांत बंब, डॉ. पतंगराव कदम, अजित पवार, सुभाष पाटील, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, सत्यजित पाटील, डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी प्रश्न उपस्थित केला होता. श्री. लोणीकर म्हणाले, मुरबाड तालुक्यामध्ये सन 2005 पासून 187 पाणीपुरवठा योजनांची कामे मंजूर असून मागील 10 वर्षामध्ये त्यापैकी 49 योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित 138 योजनांपैकी 34 योजना पूर्णत्वाच्या मार्गावर असून या योजनांमधून पाणी सुरु करण्यात आले आहे. तसेच 21 योजनांची कामे सुरु असून 23 योजनांमध्ये आर्थिक गैरव्यवहार निदर्शनास आल्याने संबंधित ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष/सचिव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत मंजूर योजना वेगवेगळ्या कारणांमुळे अपूर्ण असून याबाबत विभागीय आयुक्तांमार्फत ठाणे जिल्ह्यातील मागील 10 वर्षातील योजनांची चौकशी करण्यात आली आहे. चौकशी अहवाल अंतिम टप्प्यात असून येत्या महिन्याभरात हा अहवाल राज्य शासनास सादर करण्यात येणार आहे. बंद असलेल्या पाणीपुरवठा योजनांची माहितीही घेण्यात येत असून अनेक योजनांचा मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा योजना या योजनेत समावेश करण्यात आला आहे, असेही श्री.लोणीकर यांनी सांगितले.
मालवण तालुक्यातील आडवली-माडली नळपाणी योजनेसंदर्भात लवकरच बैठक- बबनराव लोणीकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आडवली- माडली नळपाणी योजनेसंदर्भात येथील विधानसभा सदस्यांसमवेत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नळपाणी योजनेसंदर्भात विधानसभा सदस्य सर्वश्री वैभव नाईक, अजित पवार यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. श्री. लोणीकर म्हणाले, नळपाणी योजनेच्या कामात गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले आहे. या योजनेचे काम पाच वर्षे अपूर्ण अवस्थेत असले तरी सध्या या योजनेंतर्गत उद्‌भव विहिरीची व अन्य कामे पूर्ण करण्यात आली असून या योजनेच्या पाणी पुरवठ्याच्या चाचणीचे काम सुरु आहे. भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत सन 2009-10 मध्ये 14.76 लाख किंमतीच्या मौजे आडवली माडली नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. राष्ट्रीय पेयजल योजना बंद करण्यात आली नसून या योजनेअंतर्गत अपूर्ण आणि जुन्या राहिलेल्या योजनांची कामे करण्यात येत आहेत. या नळपाणी योजनेसंदर्भात लवकरच बैठक घेऊन याबाबत तोडगा काढण्यात येईल. तसेच आवश्यक आणि गरज वाटल्यास याठिकाणी पाणीपुरवठा करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *