"महाराष्ट्र डर्बी'मध्ये मुंबई सिटीची बाजी डेफेडेरिकोच्या उत्तरार्धातील गोलमुळे पुणे सिटीवर एका गोलने मात

पुणे, दिनांक 3 ऑक्‍टोबर 2016: हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या “महाराष्ट्र डर्बी’त सोमवारी मुंबई सिटी एफसीने बाजी मारली. अभिनेता रणबीर कपूरची सहमालकी असलेल्या संघाने एफसी पुणे सिटीवर एका गोलने मात केली. निर्णायक गोल उत्तरार्धात मतायस डेफेडेरिको याने नोंदविला. सामना आज म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल मैदानावर झाला. सामन्याच्या 68व्या मिनिटाला अर्जेंटिनाचा मतायस डेफेडेरिको याने नोंदविलेल्या गोलमुळे मुंबई सिटीच्या खाती पूर्ण तीन गुण जमा झाले. मुंबईचा “स्टार’ खेळाडू व कर्णधार दिएगो फॉर्लान 84व्या मिनिटास “डगआऊट’मध्ये आला. त्याच्या जागी जेर्सन व्हिएरा मैदानात गेला, तोपर्यंत मुंबई सिटीचे वर्चस्व स्पष्ट झाले होते. सामन्याच्या भरपाई वेळेत मुंबई सिटीच्या जॅकिचंद सिंगचा धोकादायक फटका पुणे सिटीचा गोलरक्षक बेटे याने वेळीच रोखला, त्यामुळे मुंबईची आघाडी एका गोलपुरती मर्यादित राहिली. यावर्षीच्या “आयएसएल’ स्पर्धेतील मागील दोन सामन्यांत उत्तरार्धात गोलशून्य बरोबरीची कोंडी फुटली होती. आजही तीच परंपरा कायम राहिली. अर्जेंटिनाचा 27 वर्षीय आघाडीपटू मतायस डेफेडेरिको याने मुंबई सिटीला उत्तरार्धातील 23व्या मिनिटाला आघाडीवर नेले. कर्णधार दिएगो फॉर्लान याने नियंत्रित केलेल्या चेंडूवर डेफेडेरिको याने गोलची नोंद केली. त्याच्या डाव्या पायाच्या फटक्‍यासमोर पुणे सिटीचा गोलरक्षक अपौला बेटे हतबल ठरला. मुंबईच्या आघाडीनंतर दोन मिनिटांनी पुणे सिटीला बरोबरीची संधी होती. मात्र जीझस टॅटो याचा आक्रमक फटका गोलपट्टीवरून बाहेर गेला. 73व्या मिनिटाला पुन्हा एकदा पुणे सिटी संघ बरोबरी साधण्यात अपयशी ठरला. जोनातन लुका याच्या पासवर जीझस टॅटो याने मारलेला फटका मुंबईचा गोलरक्षक रॉबर्टो नेटो याने अडखळतच अडविला. सामन्याच्या पूर्वार्धात गोलशून्य बरोबरीची कोंडी कायम राहिली. मुंबईचा मतायस डेफेडेरिको, तसेच पुण्याचा गुस्ताव ओबरमन यांना मिळालेल्या संधी सोने करता आले नाही. पुण्याचा मध्यरक्षक अराटा इझुमी याने तुलनेत लक्षवेधक खेळ केला. त्याचे पासिंग उत्कृष्ट होते. सामन्याच्या 38व्या मिनिटाला इझुमी याने सुरेख पास रचला. त्याच्या चालीवर गुस्ताव ओबरमन याने डाव्या पायाने सणसणीत फटका मारला, पण मुंबईचा गोलरक्षक रॉबर्टो नेटो याने वेळीच फटका रोखला. उत्तरार्धाच्या सुरवातीस पुणे सिटीने संघात पहिला बदल केला. ओबरमनच्या जागी मोम्मार दोये याला मैदानावर पाठविण्यात आले. पुणे सिटीचे प्रशिक्षक अंतोनियो हबास यांना आजचा सामना स्टॅंडमधून पाहावा लागला. गतवर्षीच्या आयएसएल स्पर्धेच्या उपांत्य लढतीनंतर शिस्तपालन समितीने त्यांच्यावर चार सामन्यांच्या निलंबनाची कारवाई केली होती. त्यामुळे ते आज पुणे सिटीच्या “डग आऊट’मध्ये दिसले नाहीत. जायबंदी एदूर गुडजॉन्सन याच्याऐवजी निवडण्यात आलेला पुणे सिटीचा महंमद सिसोको यानेही आजचा सामना स्टॅंडमधून पाहिला. आजच्या सामन्यात पाच जणांना यलो कार्ड दाखविण्यात आले. त्यापैकी तीन कार्ड पूर्वार्धातील होती. मुंबईच्या लिओ कॉस्ता,सेहनाज सिंग व लुसियान गोईयान यांना, तर पुण्याच्या राहुल भेके व जोनाथन लुका यांना रेफरींनी ताकीद दिली.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *