नवी मुंबईतील स्टार सिटी बार सील करा, मनसेची मागणी

नवी मुंबई मनपा हद्दीत विनापरवाना हॉटेल सुरु, मनसेचा आरोप प्रतिनिधी, नवी मुंबई: बेलापूर येथील प्लॉट क्र.५३, सेक्टर १५ मधील स्टार सिटी रेस्टोरंट आणि बार गेल्या तीन ते चार वर्षांपासून विनापरवाना सुरु असल्याची गंभीर बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबईने मनपा आयुक्त एन.रामास्वामी यांच्याकडे पुराव्यांसह लक्षात आणून दिली व सदर रेस्टोरंट बार तात्काळ सील करण्याची मागणी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली. मनसेने माहिती अधिकाराचा वापर करून माहिती मागविली असता सदर रेस्टोरंट बारला परवाना विभागाची व अग्निशमन विभागाची कोणतीही परवानगी नसल्याचे निदर्शनास आले व ही बाब गंभीर असूनही महापालिकेचे बेलापूर विभागाचे विभाग अधिकारी, परवाना उपायुक्त, अतिक्रमण उपायुक्त, अग्निशमन विभागाचे अधिकारी, परिमंडळ १ चे उपायुक्त यांनी सदर बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आपली  जबाबदारी झटकली असल्याचे मनसेचे शहर सचिव संदीप गलुगडे यांनी मनपा आयुक्तांच्या लक्षात आणून दिले. मुंबईतील कमला मिल कमपाउंडच्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेने अनेक हॉटेल, रेस्टोरंट, बार, लॉजिंग, बोर्डिंग यांना नोटीसा पाठविल्या व काही ठिकाणी बांधकाम निष्कासित केले असले तरी ही सर्व कारवाई दिखावा होती की काय असा संशय व्यक्त करून पूर्णपणे अनधिकृत व विनापरवाना व्यवसाय करीत असलेल्यांवर मनपा प्रशासन मेहेरबान असल्याचा आरोप याप्रसंगी मनसे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांनी आयुक्तांसमोर केला. याउपरही प्रशासनाला जाग आली नाही तर महारष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे नवी मुंबई कार्यक्षेत्रातील अनधिकृत व विनापरवाना चालणाऱ्या हॉटेल, रेस्टोरंट, बार, पब, लॉजिंग, बोर्डिंगची यादी जाहीर करू असा गौप्यस्फोट मनसे बेलापूर विभाग अध्यक्ष नितीन चव्हाण यांनी केला आहे. उपरोक्त बाबींसंदर्भात १)      महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता स्टार सिटी रेस्टोरंट आणि बार ला तात्काळ सील करण्यात यावे व संबंधित मालकांविरोधात तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. २)      स्टार सिटी रेस्टोरंट आणि बार सारखे अनेक रेस्टोरंट बार, पब, बोर्डिंग, लॉजिंग नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात असण्याची दाट शक्यता असून याचा शोध घेण्यासाठी कार्यक्षम व प्रामाणिक अधिकाऱ्यांची समिती तात्काळ नेमण्यात यावी. ३)      ज्या अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळे अद्याप कारवाई झाली नाही त्या अधिकाऱ्यांना दोषी ठरवून त्यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे व त्यांच्या संपत्तीची देखील सखोल चौकशी करण्यात यावी. या मागण्या मनसेच्या शिष्टमंडळाने आयुक्तांसमोर करून तात्काळ यावर योग्य ती कारवाई करावी अन्यथा या अनधिकृत बाबींबाबत मनपा प्रशासनाला जागे करण्यासाठी घंटा वाजवा आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे. स्टार सिटी रेस्टोरंट बार संदर्भात लवकरच मनसे नवी मुंबई पोलीस आयुक्त व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सुद्धा तक्रार करणार आहे असे मनसे उपशहर अध्यक्ष विनोद पार्टे यांनी म्हटले आहे. यावेळी मनपा आयुक्त एन.रामास्वामी यांनी अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांना बोलावून तात्काळ स्टार सिटी रेस्टोरंट बार वर कारवाई करण्याचे आदेश मनसेच्या शिष्टमंडळा समोर दिले. याप्रसंगी मनसेच्या शिष्टमंडळात शहर अध्यक्ष गजानन काळे, उपशहर अध्यक्ष विनोद पार्टे, निलेश बाणखेले, शहर सचिव संदीप गलुगडे, डॉ.आरती धुमाळ, नितीन चव्हाण, अप्पासाहेब कोठुळे, संदेश डोंगरे, सनप्रीत तुर्मेकर, स्वप्नील गाडगे, राम पुजारे, रमेश वाघमारे, रोहित गवस, प्रीतम गायकवाड, भूषण पाटील व मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *