दुधावरील बंदी मागे घेण्यासाठी वल्लभ गड संवर्धन समिती व सीमा संघर्ष समितीची मागणी

शट्टीहळ्ळी, बेळगांव  : गोकुळ दूध संघाने गायीचे दूध खरेदी करणे बंद केले आहे. त्यामुळे परिसरातील अनेक दूध उत्पादक व संस्थांचे नुकसान होत आहे. याचा विचार करुन संघाने दुधावरील बंदी मागे घ्यावी, अशी मागणी वल्लभगड संवर्धन समिती व सीमा संघर्ष समिती दड्डी विभागातर्फे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन गोकुळ संघाला देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील गोकुळ व वारणा दूध संघानी गायीचे दूध घेणे बंद केले आहे. त्यामुळे सीमाभागासह बेळगाव परिसरातील दूध उत्पादकांसमोर संकट उभे राहिले आहे. या भागातील अनेक शेतकरी दूध उत्पादक आहेत. अनेक अडचणींचा सामना करुन दूध उत्पादन घेतले जाते. असे असताना गायीच्या दुधाला फॅट नाही, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गाय दूध पावडरची उचल होत नसल्याची कारणे दाखविण्यात आली आहेत. त्यातून उत्पादकांची गळचेपी करण्याचा प्रयत्न होत आहे. सदर समस्या सोडविण्यासाठी योग्य निर्णय त्वरित घ्यावा, अशी मागणी वल्लभगड समितीचे संस्थापक गजानन साळुंखे व कार्याध्यक्ष विजय कुराडे यांनी पत्राकाद्वारे केली आहे.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *