संभाजीनगर (रुपेश बंगाळे): मागील २ ते ३ वर्षांपासून सुरू असलेल्या ध्यान मंदिराचे काम पूर्ण झाले असून, येत्या १६, १७ आणि १८ नोव्हेंबर २०१८ रोजी बीड बायपास रोडवरील रामकृष्ण मिशन आश्रम येथील ध्यान मंदिराचा भव्य उदघाटन सोहळा पार पडणार आहे. तसेच विशेष सार्वजनिक सभा व भोजन व निवासाची व्यवस्था देखील केली आहे. या कार्यक्रमासाठी रामकृष्ण मिशन आश्रमशी जोडलेल्या भारतातील मठ आणि मिशन केंद्रातून सुमारे ४०० ते ५०० साधू व भक्त येण्याचा अंदाज आहे. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादी मान्यवरांनी स्वामीजी विषयी व्यक्त केलेल्या भावना त्यांच्या वेषभूषेत मांडणार आहेत. रामकृष्ण मिशनचे सन्यासी स्वामींच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी विचार मांडणार आहेत. तसेच गाणी, भजन, नृत्य, छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचा संत रामदास स्वामी आणि संत तुकाराम महाराजांशी आलेला संबंध माहिती त्या त्या प्रसंगाच्या आधारावर सादर केले जातील. त्यातील बरेच कार्यक्रम मराठी आणि इंग्रजी बरोबर हिंदीतही घेणार आहेत. त्याच बरोबर मंदिर उभारणी साठी ज्यांनी मोलाचे योगदान दिले त्यांचा सत्कार देखील केला जाईल. त्या निर्सगरम्य अशा वातावरणात या आनंददायी कार्यक्रमासोबत मूर्तीपूजेचे रहस्य, भक्तियोग, ज्ञानयोग यावर प्रवचन होणार आहे, व ज्यांना मंत्र दीक्षा घायची आहे त्याना मंत्र दीक्षा देखील दिली जाईल. तिथे स्वामी विवेकानंद यांनी मांडलेल्या विचारांच्या पुस्तक विक्रीचे देखील आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी सहकुटुंब सर्वानी उपस्थित राहण्यासाठी आश्रमातील पदाधिकाऱ्यांनी विनंती केली आहे.]]>