रामनाथी (गोवा): संत, ऋषि, वेद, पुराण यांच्या तसेच भगवान शिवाच्या संकल्पाने हिंदु राष्ट्र होणारच आहे. आपली संस्कृती वेदांना पुढे घेऊन जात असतांना वेदांमागे क्षात्रतेजही आहे. आज अन्य पंथीय त्यांच्या धर्माला मानतात; पण हिंदू मात्र स्वधर्माला मानत नाहीत. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंचे चिंतन आणि आत्ममंथन होऊन त्यांच्यात बौद्धिक सुस्पष्टता यायला हवी. यासाठी धर्माची अवधारणा स्पष्ट असणे आवश्यक आहे. आज देशातील हिंदू कुपमंडूक झाले आहेत. दुसरीकडे महिलांवर अत्याचार होत आहेत. सध्या चारही दिशांना आग लागली असून महिलांनी झाशीच्या राणीप्रमाणे कार्यरत होऊन पुढे यायला हवे. देशांतर्गत आणि देशाबाहेरून आक्रमण होत असून स्वतःसह समाजाचे अध्यात्माद्वारे क्षात्रतेज जागृत व्हायला हवे. त्यासाठी हिंदूंनी स्वकर्तेपणा त्यागून अधर्माच्या विरोधात कार्य करायला हवे. आपण महिलांसह एकत्रित येऊन दोषांचे निवारण करत एकत्रितपणे पुढे जायला हवे. अशा पद्धतीने आपण स्वतःतील अग्नी जागृत करून पुढे गेल्यास अंधःकार नष्ट होऊ शकतो. त्यामुळे हिंदूंनी ब्राह्मतेजाद्वारे क्षात्रतेज जागृत केल्यास भारतासह विश्वात सर्वत्र ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होईल, अशा ओजस्वी वाणीतून श्री लालेश्वर महादेव मंदिर, बिकानेर (राजस्थान) येथील महंत स्वामी संवित् सोमगिरिजी महाराज यांनी उपस्थित हिंदुत्वनिष्ठांना मार्गदर्शन केले. ते रामनाथी, गोवा येथील श्री रामनाथ देवस्थानच्या श्री विद्याधिराज सभागृहामध्ये आयोजिलेल्या सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी क्षात्रतेजाच्या उपासनेची आवश्यकता’ या विषयावर बोलत होते. अधिवेशनाच्या प्रारंभी महंत स्वामी संवित् सोमगिरिजी महाराज, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, सनातनचे धर्मप्रसारक सद्गुरु नंदकुमार जाधव अन् सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी देश-विदेशातील १५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे २५० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते. या अधिवेशनामध्ये काश्मीरची समस्या, कलम ३७० रहित करणे, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका येथील हिंदूंवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणे, राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात रोखण्यासाठी उपाय, हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याची आगामी दिशा अशा विविध विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात येणार आहे. देशातील बहुसंख्यांक हिंदूंना संविधानिक संरक्षण मिळण्यासाठी हिंदु संघटनांचे अधिवेशन ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे भारतात बहुसंख्यांक समुदायाच्या शीर्षस्थ नेत्यांना एकत्रित येण्यास कायदेशीर बंदी आहे का ? याचे उत्तर ‘नाही’ असे असतांना मग असे प्रश्न का उत्पन्न होतात ? याचे एकमेव कारण म्हणजे भारतात बहुसंख्यांकांच्या सनातन धर्माला संविधानिक संरक्षण नाही ! त्यामुळेच आज कोणीही उठतो आणि हिंदूंना अपराधी ठरवण्याचा प्रयत्न करतो. जगातील सर्व देशांमध्ये त्यांच्या संविधानाद्वारे तेथील बहुसंख्यांकांचा धर्म, संस्कृती, भाषा आणि हित यांना संरक्षण देण्यात आले आहे. भारत हा एकमात्र देश आहे की, जेथे बहुसंख्य असूनही हिंदूंना संविधानाद्वारे कुठलेही संरक्षण देण्यात आलेले नाही. उलट भारतीय संविधानाने अल्पसंख्यांकांचे पंथ, संस्कृती, भाषा आणि हित यांना संरक्षण दिले आहे. हे संविधानाच्या समतेच्या तत्त्वाच्या (म्हणजे ‘लॉ ऑफ इक्वॅलिटी’च्या) विरोधात आहे. भारतात बहुसंख्यांक हिंदूंचा धर्म, संस्कृती, भाषा अन् हित यांना संवैधानिक संरक्षण मिळावे, यासाठीच हिंदु संघटनांचे हे अधिवेशन आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले. भविष्यात भारत आणि नेपाळ यांच्यासह संपूर्ण पृथ्वीवर ‘हिंदु राष्ट्र’ स्थापित करण्यासाठी अधिवेशनाचे आयोजन ! – नागेश गाडे हिंदु जनजागृती समितीचे केंद्रीय समन्वयक श्री. नागेश गाडे यांनी अधिवेशनाचा उद्देश अवगत करतांना सांगितले की, जगात ख्रिस्ती समुदायाची १५२, इस्लामी ५७, बौद्धांची १२ राष्ट्रे, तर ज्यूंचे ‘इस्रायल’ नावाचे एक राष्ट्र आहे. हिंदूंचे मात्र या पृथ्वीवर एकही राष्ट्र नाही. वैश्विक पटलावर आगामी ५ वर्षांत भारत आणि नेपाळ ही दोन हिंदु राष्ट्र पुनर्स्थापित व्हावीत, या उद्देशाचे विचारमंथन व्हावे आणि हिंदु संघटनांचे योजनाबद्ध रितीने या दिशेने मार्गक्रमण व्हावे, हाच या अधिवेशनाचा मुख्य उद्देश आहे. हिंदु राष्ट्र-स्थापना केवळ भारतापुरती मर्यादित नसून वेदमंत्रात म्हटल्याप्रमाणे ‘संपूर्ण पृथ्वी ही एक राष्ट्र आहे’, या समुद्रवलयांकित पृथ्वीवर भविष्यात हिंदु राष्ट्र स्थापित करायचे आहे. अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रारंभी शंखनाद करण्यात आला. दीपप्रज्वलनानंतर सनातन पुरोहित पाठशाळेतील पुरोहितांनी वेदमंत्रांचे पठण केले. त्यानंतर उपस्थित संतांच्या हस्ते हिंदु जनजागृती समितीपुरस्कृत ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंचे संघटन करा !’ या मराठी आणि हिंदी भाषांतील, तसेच सनातनच्या ‘स्वभावदोष (षड्रिपु) निर्मूलनाचे महत्त्व आणि गुण-संवर्धन प्रक्रिया’ या मराठी आणि हिंदी भाषांतील ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी श्री. प्रदीप खेमका यांनी हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी अधिवेशनाच्या निमित्ताने दिलेल्या संदेशाचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे श्री. सुमीत सागवेकर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीअंतर्गत ‘उद्योगपती परिषद’ आणि ‘आरोग्य साहाय्यता समिती’ यांची स्थापना या अधिवेशनामध्ये हिंदु जनजागृती समितीअंतर्गत ‘उद्योगपती परिषद’ आणि ‘आरोग्य साहाय्यता समिती’ यांची स्थापना करण्यात आली. या संघटनांच्या बोधचिन्हाचे अनावरण वेदमंत्रांच्या घोषामध्ये महंत स्वामी संवित् सोमगिरिजी महाराज यांच्या मंगलहस्ते करण्यात आले. संघटनेच्या उद्देशाची माहिती समितीचे केंद्रीय समन्वयक श्री. नागेश गाडे यांनी सर्वांना अवगत करून दिली. हिंदुत्वनिष्ठांना साहाय्य करण्यासाठी ‘उद्योगपती परिषद’ आणि आपत्काळात समाजाला साहाय्य करणे अन् वैद्यकीय क्षेत्रातील दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन करण्यासाठी ‘आरोग्य साहाय्यता समिती’ या उद्देशाने या दोन्ही संघटना कार्यरत असणार आहेत. श्री. रमेश शिंदे (राष्ट्रीय प्रवक्ते) हिंदु जनजागृती समिती]]>