श्रीरामनवमीच्या मंगलदिनी नालासोपारा येथे “श्रीराम मंदिर निर्माण संकल्प यात्रा” काढून हिंदूंनी घेतली अयोध्येत श्रीराममंदिर बांधण्याची आणि भारतात रामराज्य आणण्याची शपथ आता हिंदूंनीच संघटित होऊन अयोध्येत श्रीराममंदिर बांधावे-समस्त हिंदूंचा निर्धार नालासोपारा:- सृष्टीच्या उत्पत्तीपासून आतापर्यंतच्या कालखंडात भूतलावरील आदर्श राजा म्हणून ’प्रभू श्रीरामचंद्रा’चे उदाहरण दिले जाते, तर सर्वोत्तम राज्य म्हणून ’रामराज्या’चा उल्लेख केला जातो. अशा श्रीरामचंद्रांचा जन्म आपल्या भारतमूमीत झाला, ही प्रत्येक भारतीयासाठी महतभाग्याची गोष्ट आहे. मात्र ज्या पवित्र स्थळावर प्रभू श्रीरामचंद्रांनी पृथ्वीवर अवतार घेतला, दुर्दैवाने त्याच ठिकाणी रामलल्लांना एका दहा बाय दहाच्या तंबूत, पोलिसांच्या प्रचंड बंदोबस्तात दिवस कंठावे लागत आहेत. राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे आणि हिंदूंच्या अतिसहिष्णुतेमुळे प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मभूमीतच त्यांचे मंदिर बांधण्याच्या मागणीसाठी हिंदूंना प्रभू श्रीरामचंद्रांच्या अस्तित्वाचे पुरावे द्यावे लागतात. आंदोलने करावी लागतात. अयोध्येत श्रीराममंदिर बांधले जाणे, हा हिंदूंच्या अस्मितेचा प्रश्न बनला आहे. त्यामुळे आता कोणावरही विसंबून न रहाता हिंदूंनी संघटित होऊन अयोध्येत श्रीराममंदिर बांधण्यासाठी आणि भारतभूमीत रामराज्य (हिंदु राष्ट्र) आणण्यासाठी संकल्प करावा या उद्देशाने समस्त हिंदुत्त्ववादी संघटनांच्या वतीने आज श्रीरामनवमीच्या पवित्र दिनी नालासोपारामध्ये ‘श्रीराम मंदिर निर्माण संकल्प यात्रा’ काढण्यात आली. नालासोपारा पश्चिमेतील सोपारा गाव येथील श्री चक्रेश्वर महादेव मंदिराजवळ प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेची आणि धर्मध्वजाची विधीवत पूजा करून संकल्प यात्रेला आरंभ करण्यात आला. फुलांनी सजवलेल्या रथामध्ये प्रभू श्रीरामचंद्राची प्रतिमा स्थापन करण्यात आली होती. यात्रामार्गातील ३ किलोमीटरचा संपूर्ण परिसर भगवे ध्वज आणि पताका लावून भगवामय करण्यात आला होता. ’मंदिर तो बनाएंगे, रामराज्य भी लायेंगे’ च्या घोषणांनी मार्गक्रमण करत चाललेल्या संकल्प यात्रेच्या मार्गात अनेक ठिकाणी सुवासिनींनी प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेचे आणि धर्मध्वजाचे औक्षण केले. संकल्प यात्रेत सहभागी हिंदूंनी ’हिंदूंओंका एक ही नारा, अयोध्यामें हो राम मंदिर हमारा’, ’शपथ रामकी खाते है, मंदिर वही बनाएंगे’ या आशयाचे हातात धरलेले हस्तफलक लोकांच्या आकर्षणाचा विषय बनले होते. हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, हिंदू गोवंश रक्षा समिती, बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बजरंग सेवा दल या संघटनांचे आणि भाजप, शिवसेना आणि मनसे या पक्षांचे कार्यकर्ते यांसह शेकडो धर्माभिमानी हिंदू या संकल्प यात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. नालासोपारा पूर्वेतील सेंट्रल पार्क मैदानात ‘श्रीराम मंदिर निर्माण संकल्प यात्रे’चा समारोप करण्यात आला. यावेळी सहभागी हिंदूंनी अयोध्येत श्रीराममंदिर निर्माण करण्यासाठी आणि भारतभूमीत रामराज्य (हिंदु राष्ट्र) स्थापन करण्यासाठी कटिबद्ध रहाण्याची शपथ घेतली.]]>