सलग दुसऱ्या सामन्यात बेंगळुरूचा संघ दोन गोलांनी पिछाडीवर पडला होता. मागील सामन्यात केरळा ब्लास्टर्सविरुद्ध त्यांनी एक गुण खेचून आणला होता. यावेळी मात्र सुनील छेत्रीच्या गोलनंतर बेंगळुरूला पिछाडी आणखी कमी करता आली नाही. चेन्नईयीनसाठी जेजे लालपेखलुआ व ग्रेगरी नेल्सन यांनी पूर्वार्धात केलेले गोल निर्णायक ठरले.
बेंगळुरूचा हा मोसमातील दुसराच पराभव आहे. 15 सामन्यांत नऊ विजय व चार बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे सर्वाधिक 31 गुण झाले आहेत. त्यांचे अव्वल स्थान कायम राहिले. मुंबई सिटी एफसी (15 सामन्यांतून 27) दुसऱ्या, एफसी गोवा (14 सामन्यांतून 25) तिसऱ्या, तर नॉर्थईस्ट युनायटेड एफसी (15 सामन्यांतून 24) चौथ्या स्थानावर आहे.
चेन्नईयीनचा हा मोसमातील दुसराच विजय असून दोन बरोबरी व 11 पराभव अशा कामगिरीसह त्यांचे आठ गुण झाले, पण त्यांचे शेवटचे दहावे स्थान कायम राहिले.
चेन्नईने खाते उघडण्याची शर्यत जिंकली. यात बेंगळुरूच्या बचाव फळीची चूक त्यांच्या पथ्यावर पडली. रॅफेल आगुस्टोने मध्य क्षेत्रात चेंडूवर ताबा मिळवित सी. के. विनीत याला पास दिला. विनीतला चेंडूवर ताबा मिळविण्यासाठी झगडावे लागले. त्याने लालपेखलुआ याला पास द्यायचा प्रयत्न केला, पण चेंडू थेट बेंगळुरूच्या निशू कुमार याच्याकडे गेला. निशूला मात्र चेंडू सफाईदारपणे अडविता आला नाही आणि परिणामी लालपेखलुआ याला पुन्हा संधी मिळाली. मग लालपेखलुआने बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधू याला चकविले. चेंडू गुरप्रीतच्या हाताला लागून नेटमध्ये गेला.
पूर्वार्ध संपण्यास दोन मिनिटे बाकी असताना चेन्नईयीनने दुसरा गोल केला. विनीतने लालडीनलीना रेंथलेई याला उजवीकडे पास दिला. त्याने बॉक्समध्ये मारलेला क्रॉस पास टिपण्यासाठी नेल्सन याने बेंगळुरूच्या रिनो अँटो याला काही कळायच्या आत मुसंडी मारत संधी साधली. त्याने उडी घेत चेंडू हेडिंगवर नेटच्या डाव्या कोपऱ्यात घालविला. त्यावेळी गुरप्रीत निरुत्तर झाला.
मध्यंतराची दोन गोलांची पिछाडी बेंगळूरुने 57व्या मिनिटाला कमी केली. हरमनज्योत खाब्रा याने उजवीकडे झिस्को फर्नांडीस याला पास दिला. झिस्कोने क्रॉस चेंडू मारताच छेत्रीने प्रतिस्पर्धी मार्करला चकवून मैदानावर घसरत हेडींगवर लक्ष्य साधले.
यानंतर बेंगळुरूने काही प्रयत्न केले. 69व्या मिनिटाला मिकूने उडवीकडून जास्त अंतरावरून करणजीतला चकविण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला.
किन लुईसने 84व्या मिनिटाला मारलेला फटका रेंथलेईने हेडिंगवर थोपविला, पण चेंडू निशूकडे गेला. त्याने मात्र स्वैर फटका मारला.
सामन्यातील पहिला प्रयत्न बेंगळुरूने दुसऱ्याच मिनिटाला केला, पण झिस्कोने चेन्नईयीनचा गोलरक्षक करणजीत सिंग याच्या अगदी जवळून चेंडू मारला. त्यामुळे करणजीत चेंडू आरामात अडवू शकला.
12व्या मिनिटाला लुईस लोपेझने मिकूला उडवीकडे दिर्घ पास दिला. मिकूने पलिकडील बाजूला मैदानालगत मारलेला चेंडू टिपण्यासाठी बेंगळुरूचा एकही खेळाडू योग्य जागी नव्हता. त्यामुळे करणजीतने चेंडू बाहेर जाऊ दिला.
18व्या मिनिटाला चेन्नईयीनचा बचावपटू ख्रिस्तोफर हर्ड आणि छेत्री यांच्यात चेंडूवर ताबा मिळविण्यावरून चुरस झाली. अखेरीस हर्डने छेत्रीला पाडले. मिकूने 27व्या मिनिटाला जोरदार प्रयत्न केला. उडवीकडून झिस्कोने दिलेल्या पासवर त्याने मारलेला चेंडू थोडक्यात गोलपोस्टच्या बाजूने गेला. पुढच्याच मिनिटाला चेन्नईयीनचा बदली खेळाडू अनिरुध थापा याने केलेला प्रयत्न गुरप्रीतने फोल ठरविला.
]]>