सामर्थ्य आहे चळवळींचे | जो जो करील तयांचे | परंतु तेथे भगवंताचे | अधिष्ठान पाहिजे ||१|| पहिले ते हरिकथा निरुपण | दुसरे ते राजकारण | तिसरे ते सावधपण | सर्व विषयीं ||२|| महाराष्ट्रीय भगव्या झेंड्यात निगुढ असलेला हाच अर्थ ह्या हिन्दू ध्वजात प्रकट झालेला आहे. ही ॐकारयुक्त कुंडलिनी हीच ते भगवंतांचे अधिष्ठान दर्शविते. ते मुख्य हरिकथेचे निरुपण करते आणि हे कृपाण हे तेच चळवळीचे सामर्थ्य तेच राजकारण सर्व विषयी सावधपण प्रकटविते. अर्थात त्या महान हिन्दू साम्राज्याच्या पुरातन ध्वजाच्या त्या भगव्यात समर्थांचा जो मुक संदेश अंतर्हित होता, त्याचीच प्रकट घोषणा हा हिन्दूध्वज करीत आहे. ह्याहून त्यात काही एक अंतर नाही. महाराष्ट्रीय भगव्याप्रमाणे शिखांचे कृपाण हेही त्यावर अंकित असल्याने हिन्दूजातीच्या दुसऱ्या महान संरक्षकाचीही गुरु गोविंदसिंगांचीही मुद्रा त्यावर अंकित आहे. गुरु गोविंद कटीस दोन खड्ग बांधीत आणि म्हणत, हा खड्ग योगाचा आहे, हा भोगाचा आहे, हा शांतीचा आहे, हा पुष्टीतुष्टीचा! तोच संदेश हा हिन्दूध्वज घोषित करीत आहे. तो योगाचा खड्ग ही ह्या ध्वजावरील कुंडलिनी आहे.तो भोगाचा खड्ग हे कृपाण! त्याचप्रमाणे हा ॐकार, शिखांचा, वैदिकांचा, आर्यांचा, ब्राम्हणांचा, सनातनीयांचा, सर्वांचाच महामंत्र आहे. ही कुंडलिनी ही जैन, बौध, शैव, शाक्त चार्वाकांसुध्दा अखिल हिन्दूंच्या सर्वांच्या भवितव्याची हमी आहे. सर्व प्रांताच्या आणि पंथाच्या जातीवर्ण निर्विशेष हिन्दू मात्रास अत्यंत पुज्य असलेली आणि त्यांचे प्रतिनिधित्व करणारी, हिन्दूजातीच्या महान ध्येयाची घोषणा करणारी, भूतकाळाच्या हितावह परंपरेस लवमात्र न सोडता हिन्दू जातीच्या धार्मिक आणि राष्ट्रीय अशा महान भावी आकांक्षांना प्रकट आणि प्रस्फुरित करणारी आणि तरीही अखिल मनुष्य जातीसह प्रत्येक्ष बुध्दिवादाने, भौतिक शास्त्रांच्या परिभाषेतही पटवून देता येणारी ही ॐकारयुक्त – कुंडलिनी – कृपाणाची भव्य चिन्हे ज्या भगव्यावर अंकित आहेत, तो हा हिन्दूध्वज देवकुलाच्या कोटिकोटि वीरांच्या प्रतापाने “परित्राणाय साधूनाम् विनाशासच दुष्कृताम्” अशी धीरगंभीर गर्जना करीत अखिल मानवांचे परम मंगल साधीत या पृथ्वीवर सर्वत्र आणि सदोदित विजयी होवो!!! लेखक:- स्वातंञ्यवीर विनायक दामोदर सावरकर हिन्दूध्वज = अभ्युदय, निःश्रेयस, निदर्शक, कुण्डलिनी, कृपाण चिन्हांकित.]]>