दारू घरपोच! सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?

तिकडे बिहार राज्याने दारूबंदीसाठी कठोर पावले उचलली असताना, साधू संतांच्या, पुण्यवंतांच्या, वीर महापुरुषांच्या, छत्रपती शिव – शंभूंच्या महाराष्ट्रात आता दारू थेट घरपोच देण्याची भाषा होऊ लागली आहे. ते ही सुसंस्कृतपणाचा आव आणणाऱ्या आरएसएसच्या छत्रछायेखाली तयार झालेल्या भाजपच्या वरिष्ठ मंत्र्यांच्या तोंडातून बाहेर पडते, याला म्हणावे तरी काय ! दारू, तीही थेट घराघरात….? आता सरकारचे डोके खरेच ठिकाणावर आहे का, हेच विचारण्याची वेळ आली आहे.

राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच या संबंधी बोलताना ही माहिती दिली. मुळात दारूने पिढ्यान् पिढ्या बरबाद होत असताना भाजप सारख्या सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या पक्षाचा एक जबाबदार मंत्री केवळ महसुलात वाढ व्हावी या उद्देशाने घरपोच दारू देण्याची जर घोषणा करीत असेल तर ही महाराष्ट्राच्या दृष्टीने शोकांतिकाच म्हणावी लागेल. हे तर सुशिक्षित तरुणाई व्यसनाच्या खाईत लोटण्यासाठी शासनाने उचललेले अधोगामी पाउलच म्हणावे लागेल. मुळात सरकारने राज्याच्या तिजोरीमध्ये भर घालण्यासाठी धोरणात्मक पाऊले उचलणे अत्यावश्यक आहे. परंतू या सरकारातील मंत्र्यांना काय काय उपद्व्याप सुचतील याचा काही नेम नाही.
आज सुसंस्कृत महाराष्ट्र घडविण्यासाठी दारूबंदी ही काळाची गरज आहे. तरुणाईला व्यसनांपासून दूर लोटण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातील भाजप सरकार मधील या मंत्री महोदयांनी घरपोच दारू पोहचविणे का आवश्यक आहे, त्याचे दिलेले कारणच मुळी हास्यास्पद आहे. त्यांचे म्हणणे आहे की, दारू पिऊन लोक गाडी चाळवितात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. याचा अर्थ स्पष्ट होतो की, दारुड्या वाहन चालकांवर कारवाई करण्यास सरकार कुचकामी ठरत आहे. “ड्रंक एन्ड ड्राईव्ह” मूळे जर अपघात होत असतील आणि ते अपघात रोखण्यास सरकारी खाते कामचुकारपणा करत असेल किंवा हे गुन्हे रोखण्यासाठी हे भाजप सरकार अकार्यक्षम ठरत असेल तर, दारू बंदी हाच यावर एकमेव उपाय आहे. एका प्रतिष्ठित वकील महाशयांनी तर ऑनलाईन दारू घरपोच सेवेमुळे युवकांना रोजगार मिळतील अशी मुक्ताफळे उधळली आहेत. पण यामुळे राज्यातील कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त होतील याचा विचार ह्या मंडळींच्या डोक्यात का बरं येत नसावा.! मुळात हे कुणाच्या तरी भल्यासाठी रचलेले षढयंत्र तर नव्हे! हे स्वार्थी राजकारणी काय काय करतील याचा खरेच काही नेम नाही. आज दारू घरपोच देतील, उद्या “पारू” पण देतील. तसेही कोर्टाने विवाहबाह्य संबंधांना काही अंशी मान्यता दिलीच आहे….!
सरकारने देशाच्या भावी पिढीचा व भवितव्याचा विचार करता अखंड देशात दारूबंदी करावयास हवी. तरच सदृढ तरुण पिढी जन्मास येईल. भारत देश बलशाली होईल. यावर भाजप तसेच मित्रपक्षांनी गांभीर्याने विचारमंथन करून हे भलतेच खुल डोक्यातून काढून टाकावे अशी अपेक्षा महाराष्ट्राची सुज्ञ जनता बाळगून आहे.
आज महाराष्ट्राला ७०० हून अधिक किमीचा समुद्र किनारा लाभला आहे. साडेतीनशे हून अधिक ऐतिहासिक शिवकालीन गडकिल्ले आहेत. असंख्य तीर्थक्षेत्रे आहेत. लेण्या आहेत. महाराष्ट्राला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. आणि जर सरकारला महसुलच हवा असेल तर त्यांनी या ऐतिहासिक नगरीचा नियोजनबद्ध रित्या विकास करावा. असे केल्यास एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडेल. महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने शिवशाही नांदेल. आणि देश विदेशातील पर्यटक हा शिवशाहीचा नजारा पाहण्यास येतील आणि महाराष्ट्राला भरघोस महसूल देखील प्राप्त होईल. तेव्हा सरकारने याचा नक्कीच सकारात्मक विचार करावा.
]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *