कुंडलिका नदीवरील पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

रोहा: कोंकण रेल्वेमुळे रोहे नगरीला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. रोहे हे रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे तालुक्याचे ठिकाण असून तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहत हे महत्वाचे केंद्र आहे.मध्ये रेल्वेच्या माध्यमातून लवकरच पनवेल ते रोहा असा लोकल रेल्वे मार्ग लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू होणार आहेच. भले हा प्रकल्प २०११ रोजी पूर्ण होण्याची तारीख असताना देखील रायगडच्या राजकीय अनास्थेपायी हा प्रकल्प वेळेत पूर्ण न होता सुमारे ५ ते ६ वर्षे लटकला असून, ते कधी पूर्णत्वास जाईल याची आजही शाश्वती देता येत नाही. मुळात रोहा तालुका हा तसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला. असे असले तरी रोहा नगरीचा विकास हवा तसा पहावयास मिळत नाही. रायगड जिल्ह्यातील या महत्वाच्या तालुक्यातील कुंडलिका नदीवरील पुलाचे अर्धवट बांधकाम गेल्या ८ वर्षापासून अपूर्णावस्थेत आहे. विशेष म्हणजे हा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांचा असून, सद्या त्यांचे पुतणे हे विधानसभेचे आमदार आहेत. तसेच स्वतः सुनील तटकरे, त्यांचे बंधू अनिल तटकरे हे विधानपरिषदेवर सदस्य (आमदार) आहेत. सुनील तटकरे यांची कन्या रायगड जिल्हा परिषदेची अध्यक्षा आहेत. स्थानिक रोहा नगरपरिषदेवर देखील यांचेच वर्चस्व आहे. असे असून देखील या लहानशा पुलाचे बांधकाम गेली ८ वर्ष रखडले आहे. आजपर्यंत या पुलाच्या बांधकामासाठी ३ कंत्राटदारांच्या माध्यमातून काम करण्यात आले, तरी देखील ह्या पुलाचे काम अर्धवट अवस्थेत रखडले आहे. जुना पूल हा अत्यंत धोकादायक झाला आहे. तेथे कधीही मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागे महाड येथील सावित्री नदीवरील पुलावरील अपघाताची आठवण होताच अंगावर काटे येतात. तसाच भयंकर प्रकार कुंडलिका नदीवरील या धोकादायक पुलाच्या बाबतीत देखील घडू शकतो. परंतु असे असले तरी येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी याचे गांभीर्य लक्षात का येत नाही हा चर्चेचा विषय आहे. सदर बांधकाम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याची चर्चा देखील जनतेमध्ये दबक्या आवाजात होत आहे. ३/३ कंत्राटदार नेमून देखील हे बांधकाम अर्धवट का??? या मागील झारीतील शुक्राचार्य कोण याचा तपास सबंधित विभागाने तातडीने करावयास हवा. तसेच सदर पुलाचे तज्ज्ञांकडून पुनर्निक्षण (ऑडिट) करूनच हा पूल वापरासाठी खुला करावा. या पुलाच्या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात येत आहे. या पुलाचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप जनतेमधून होत असल्यामुळे सरकारने खोलात जावून या प्रकरणाचा तपास करून तडा लावावा आणि जनतेचा पैसा जनहिताच्या कार्यासाठी मार्गी लागावा अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे. सरकारने या प्रकरणी योग्य तो तपास करून संबंधितांवर कठोरातील कठोर कारवाई करावी हीच काय ती अपेक्षा…]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *