फळ-भाजी मार्केटच्या समस्या ऐकण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख पहाटेच वाशीच्या बाजारात

जागेच्या अडचणीवर कायमस्वरूपी तोडगा काढणार

ठाणे : एरव्ही शेतमाल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांशी चाललेली घासाघीस आणि माल उतरविण्याचा पहाटे सुरु असलेला गदारोळ वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला नवा नाही. पण या नेहमीच्या वातावरणात सहकारमंत्री सुभाष देशमुख जेव्हा खुद्द खांद्याला खांदा लावून आपल्याशी बोलताहेत म्हटल्यावर शेतकरी, कामगार यांच्यात कौतुकमिश्रित आश्चर्य दिसत होते.

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज पहाटे ६ वाजता वाशीचे फळभाजी मार्केट गाठले. याठिकाणच्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी स्वत: पाहणी करून सर्वांशी बोलणे हाच उत्तम उपाय असल्याने त्यांनी माथाडी कामगार नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना बरोबर घेऊन फळ-भाजी मार्केट मध्ये शेतकरी-व्यापारी-कामगार यांच्याशी सरळ संवाद सुरु केला.

जागेची समस्या सोडविणार

कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवसाला मोठ्या प्रमाणावर आवक-जावक होते. आशियातील एक मोठी बाजारपेठ म्हणून या बाजार समितीकडे पाहिले जाते. फळ-भाजी या शेतमालाची मोठी आवक असल्याने शेकडो ट्रक्स आणि टेम्पो याठिकाणी राज्याच्या सर्व भागातून येतात. याच ठिकाणी पार्किंग होत असल्याने व मालाची चढ-उतार करावी लागत असल्याने सकाळी खूप गैरसोय होते हे नरेंद्र पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. यावर सहकारमंत्री देशमुख यांनी कामगार व व्यापाऱ्यांशीही चर्चा केली, त्यांचे मत जाणून घेतले आणि जागेची समस्या सोडविण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करू असे सांगितले.

सहकारमंत्री यांनी प्रत्यक्ष लिलाव देखील पाहिला आणि त्यातही येणाऱ्या अडचणी समजावून घेतल्या. लिलावाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर शेतमाल येतो, तिथेही जागेची अडचण आहे. तसेच बाजाराची रचनाही त्या दृष्टीने अधिक सुविधाजनक कशी करता येईल हे पाहू असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या बांधावर थेट व्यापाऱ्यांना जाऊन शेतमाल खरेदी करता येईल, असेही ते म्हणाले.

बाजार नियंत्रणमुक्तीबाबत समिती गठीत केली असून या समितीच्या बैठका सुरु आहेत. योग्य तो निर्णय घेतला जाईल आणि शेतकरी, व्यापारी तसेच माथाडी कामगार यांचे हित पाहिले जाईल व संतुलित भूमिका सरकार घेईल असेही ते म्हणाले. अतिरिक्त आयुक्त तथा प्रशासक मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सतीश सोनी यांनी देखील यावेळी काही सुचना दिल्या.

सहकारमंत्री तब्बल दोन तास कामगार व व्यापारी यांच्यासमवेत होते. खुद्द मंत्री महोदयांनी मंत्रालय किंवा कुठेही वातानुकुलीत कार्यालयातील कक्षात न बसता स्वत: बाजार समितीत फिरून अडचणी समजावून घेतल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.

साभार: महान्यूज

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *