नेरुळ: सेक्टर दोन येथील हरि ओम शॉपिंग सेंटरच्या कोपर्यावर असणार्या महापालिकेच्या सार्वजनिक वाचनालयाची दुरावस्था झालेली असून महापालिका प्रशासनाचा तिकडे कानाडोळा झाल्याचे निदर्शनास आले आहे. स्थानिक रहीवाशांना या वाचनालयाचा उपयोग न होता त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगत शेतकरी कामगार पक्षाचे बेलापूर युवा अध्यक्ष विरेंद्र (गुरू) म्हात्रे यांनी सार्वजनिक वाचनालयाची लवकरात लवकर डागडूजी करावी अशी लेखी मागणी नेरूळ महापालिका विभाग अधिकार्यांकडे केली आहे.
नेरूळ येथील महापालिकेच्या सार्वजनिक वाचनालयाची दुरावस्था
२००५ साली नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून या सार्वजनिक वाचनालयाची निर्मिती केली. स्वच्छ सर्वेक्षण २०१८च्या माध्यमातून सर्व नवी मुंबई शहराची रंगरंगोटी महापालिका प्रशासनाने केली असताना पालिकेच्या या सार्वजनिक वाचनालयाची डागडूजी व रंगरंगोटी करण्यास महापालिका प्रशासनाने उदासिनता दाखविली असल्याचा संताप शेतकरी कामगार पक्षाचे युवा अध्यक्ष विरेंद्र (गुरू) म्हात्रे यांनी निवेदनातून व्यक्त केला आहे.
मागील तीन ते चार वर्षापासून या वाचनालयात एकही वर्तमानपत्र आलेले नाही. त्या ठिकाणी असलेली आसनव्यवस्था अपुरी असल्याने ज्येष्ठ नागरीकांना या वाचनालयाचा वापर करताही येत नाही. संध्याकाळच्या वेळी या वाचनालयाचा वापर अनधिकृत फेरीवाले करत असतात. पालिकेच्या वाचनालयाचा सध्या फेरीवाल्यांकडून वापर केला जात आहे. या वाचनालयाची लवकरात लवकर रंगरंगोटी करून ज्येष्ठ नागरिकांसाठी आसनव्यवस्था वाढविण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे युवा अध्यक्ष विरेंद्र (गुरू) म्हात्रे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
]]>