रोहा: ऐन पावसाळ्यापूर्वी तालुक्यातील बऱ्याच गावांत व ठिकठिकाणी शेतात असलेल्या विजेच्या खांबांची खूपच दुरवस्था झालेली आहे. तालुक्यातील भालगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कांडणे खुर्द गावातील विजेच्या खांबांची अवस्था तर खूपच बिकट झालेली पाहावयास मिळते. येथील नागरिकांनी वारंवार तक्रार करून देखील कोणत्याही प्रकारची डागडुज्जी करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळ्यातही जर या खांबांची अशीच अवस्था राहिली तर येथील नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल. येथील नागरिकांशी संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात मागील दोन वर्षांपासून संबंधित प्रकरणाचा पाठपुरावा केला असूनही अजूनही यावर तोडगा निघालेला नाही. त्यानंतर युवा सह्याद्रीने स्थानिक वायरमन वाटवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वरिष्ठांकडे याचा अहवाल सादर केल्याचं सांगितलं. रोहा महावितरणाचे वरिष्ठ अधिकारी मानकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी संबंधित ठेकेदाराला २५० विजेचे खांब दुरुस्थीचे काम दिले असून कांडणे खुर्द सारख्या भागात जिथे खूपच दुरावस्था झाली आहे, अश्या ठिकाणी येणाऱ्या आठवड्यात काम पूर्ण करणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच उरलेल्या ठिकाणीही पाऊस सुरु होण्याच्या आधी सर्व दुरुस्थीची कामे पूर्ण केली जातील असे आश्वासन देण्यात आले. येत्या ४-५ दिवसांत कोकण किनारपट्टीवर पाऊस येऊन ठेपणार असल्याची चिन्हे सध्याच्या वातावरणावरून दिसत आहेत. अश्या परिस्थितीत महावितरण किती लवकर हि कामे पूर्ण करेल हे येणाऱ्या काही दिवसांतच समजेल.]]>