"एटीके" च्या विजयाने गोव्याला जबर धक्का

मडगाव, दिनांक 24 नोव्हेंबर 2016: सामन्याच्या इंज्युरी टाईममधील गोलवर ऍटलेटिको द कोलकता (एटीके) संघाने हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत निसटता विजय प्राप्त करून गुणतक्‍त्यात दुसरा क्रमांक मिळविला. त्यांनी एफसी गोवा संघावर 2-1 अशी मात केली. त्यामुळे यजमान संघाच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशांना जबर धक्का बसला आहे. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या लढतीत एफसी गोवाला विजयाची नितांत आवश्‍यकता होती. विश्रांतीला कोलकता संघ 1-0 असा आघाडीवर होता. अटीतटीच्या या लढतीत एफसी गोवा संघाने उत्तरार्धात खेळ उंचावला, परंतु अंतिम टप्प्यात गोल स्वीकारल्यामुळे त्यांना सामना गमवावा लागला. इंज्युरी टाईममधील खेळ सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच मिनिटाला स्टीफन पियरसनने अचूक लक्ष्य साधले. सामीग दौतीने तोलूनमापून दिलेल्या क्रॉसपासवर पियरसन याने एफसी गोवाचा स्वप्नभंग केला. यावेळी चेंडू गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनीच्या पायाखालून गोलजाळीत गेला. त्यापूर्वी 28व्या मिनिटाला होजे मॉलिना यांच्या मार्गदर्शनाखालील कोलकता संघास ज्युआन बेलेन्कोसो याने आघाडीवर नेले होते. सामन्याच्या 80व्या मिनिटास मंदार राव देसाईच्या गोलमुळे एफसी गोवाने बरोबरी साधत गुणाची आशा कायम राखली होती. ऍटलेटिको द कोलकता संघाचा हा यंदाच्या स्पर्धेतील चौथा विजय ठरला. त्यांचे 12 सामन्यांतून 18 गुण झाले असून गुणतक्‍त्यात त्यांना दुसरा क्रमांक मिळाला आहे. पहिल्या स्थानावरील मुंबई सिटीपेक्षा त्यांचे चार गुण कमी आहेत. एफसी गोवाला यंदा घरच्या मैदानावर चौथा पराभव पत्करावा लागला. एकंदरीत त्यांचा हा 12 लढतीतील सातवा पराभव आहे. 11 गुणांसह त्यांचे तळाचे आठवे स्थान कायम राहिले. आयएसएल स्पर्धेच्या इतिहास कोलकताने एफसी गोवावर नोंदविलेला हा तिसरा विजय ठरला. पूर्वार्धातील खेळात तुलनेत ऍटलेटिको द कोलकता संघाने वर्चस्व राखले. एफसी गोवाला सूर मिळविण्यासाठी वेळ लागला, तोपर्यंत पाहुण्या संघाने आघाडी घेतली होती. सामन्याच्या सुरवातीपासूनच कोलकताने आक्रमणावर भर दिला. अकराव्या मिनिटाला त्यांच्या हावियर लारा ग्रान्डे याने एफसी गोवाचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याची परीक्षा पाहिली. त्यापूर्वी सातव्या मिनिटाला लारा याने एफसी गोवाच्या रिंगणात मुसंडी मारली होती. सामन्याच्या 28व्या मिनिटाला पाहुण्या संघास यश मिळाले. जुआन बेलेन्कोसो याचा हेडर यजमानांसाठी धोकादायक ठरला. अबिनाश रुईदास याच्या क्रॉस पासवर बेलेन्कोसो याने कोलकत्यास आघाडीवर नेले, यावेळी स्टेडियमवर एकच सन्नाटा पसरला. पहिल्या गोलनंतर पुन्हा कोलकताने आक्रमण रचले, परंतु 31व्या मिनिटाला स्टीफन पियरसन याला गोव्याची बचावफळी भेदता आली नाही. उत्तरार्धात एफसी गोवाने व्यूहरचना बदलत आक्रमण अधिक धारदार केले. विश्रांतीनंतरच्या सहाव्या मिनिटाला गोव्याची संधी हुकली होती. त्यांच्या मंदार राव देसाईचा क्रॉस पासवर चेंडू दिशाहीन करण्याच्या प्रयत्नात कोलकत्याच्या रॉबर्ट लाल्थलामुआना याने जवळपास स्वयंगोल केला होता, परंतु निर्णायक क्षणी चेंडू गोलपोस्टला आपटला. एफसी गोवाचे प्रशिक्षक झिको यांनी दोन बदल करताना रॉबिन सिंग व राजू गायकवाड यांना मैदानात उतरविले. रॉबिनने कीनन आल्मेदाची, तर राजूने देबब्रत रॉयची जागा घेतली. हे बदल यशस्वी ठरले. दुसरीकडे विंगर रोमियो फर्नांडिसनेही एफसी गोवाच्या आक्रमणाची गती वाढविली होती. 68व्या मिनिटाला रोमियोचा चांगला प्रयत्न वाया गेला. 74व्या मिनिटाला एफसी गोवा संघाला बरोबरी साधण्याची सुरेख संधी होती. राजू गायकवाडच्या क्रॉस पासवर कोलकताच्या अरनाब मोंडलने चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र एफसी गोवाच्या राफाएल कुएल्होचा फटका दिशाहीन ठरला. सामना संपण्यास दहा मिनिटे बाकी असताना मंदार राव देसाईने एफसी गोवास बरोबरी साधून दिली, यावेळी स्टेडियमवर एकच जल्लोष झाला. राफाएल कुएल्होने यावेळी मंदारला गोल करण्याची अप्रतिम संधी प्राप्त करून दिली. मंदारने मारलेला ताकदवान फटका कोलकताचा खेळाडू प्रीतम कोटल याच्या पायामधून पुढे सरकला व थेट गोलजाळीत गेला. यावेळी गोलरक्षक देबजित मजुमदारला अजिबात अंदाज आला नाही.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *