केरळाची दिल्लीशी गोलशून्य बरोबरी

कोची, दिनांक 9 ऑक्‍टोबर 2016: हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत केरळा ब्लास्टर्स आणि दिल्ली डायनॅमोज संघाला संधी साधता आली नाही. यामुळे सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. रविवारी येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेल्या या सामन्यातून दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. केरळा ब्लास्टर्सला घरच्या मैदानावर मोठा पाठिंबा होता, मात्र त्यांना सदोष आक्रमणामुळे गोल करण्यापासून दूर राहावे लागले. दिल्ली डायनॅमोज संघालाही धारदार खेळ करता आला नाही. शेवटच्या पाच मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांनी आक्रमण तेज केले, तरीही त्यांना गोलजाळीचा वेध घेता आला नाही. केरळा ब्लास्टर्सचा प्रमुख खेळाडू मायकेल चोप्रा याचे अपयश त्यांचे प्रशिक्षक स्टीव कोपेल यांना चिंतित करणारे ठरले. “इंज्युरी टाईम’च्या सहा मिनिटांतही विशेष काही घडले नाही. दिल्लीच्या आक्रमकांना केरळा ब्लास्टर्सचा बचावपटू संदेश झिंगान अडथळा ठरला. केरळा ब्लास्टर्सने आजच्या एका गुणासह खाते खोलले. पहिले दोन्ही सामने गमावलेल्या केरळा ब्लास्टर्सच्या खाती आता तीन सामन्यातून एक गुण जमा झाला आहे. मागील सामन्यात चेन्नईत विजय नोंदवून कोचीत आलेल्या दिल्लीचे दोन सामन्यांतून चार गुण झाले आहेत. या वर्षीच्या स्पर्धेत एकही गोल न झालेला हा पहिलाच सामना ठरला. पूर्वार्धातील खेळात केरळा ब्लास्टर्स आणि दिल्ली डायनॅमोज यांनी चांगल्या चाली रचल्या आणि संधीही प्राप्त केल्या, परंतु दोन्ही संघांना गोल करणे जमले नाही. केरळाने सुरवातीला दिल्लीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रतिस्पर्ध्यांचा बचाव भक्कम ठरला. विश्रांतीला एक मिनिट बाकी असताना केरळा ब्लास्टर्सला गोल करण्याची अगदी सोपी संधी होती. मात्र त्यांच्या मायकेल चोप्रा याला समोर फक्त गोलरक्षक टोनी डोब्लास असताना अचूक फटका मारता आला नाही. उत्तरार्धाच्या सुरवातीस दिल्लीला गोलरक्षक टोनी डोब्लास याच्या सेवेस मुकावे लागले. तंदुरुस्तीअभावी त्याला मैदान सोडावे लागले. त्याची जागा बदली गोलरक्षक सोईराम पोईरेई याने घेतली. 65व्या मिनिटाला दिल्लीचा गोलरक्षक पोईरेई जाग्यावर नसताना चोप्राला हेडरने लक्ष्य साधण्याची संधी होती, त्याचा फटका दिशाहीन ठरला, पण तो ऑफसाईड असल्यामुळे मोठे नुकसान झाले नाही. 69व्या मिनिटाला दिल्लीच्या बदारा बादजी याने केरळा ब्लास्टर्सच्या गोलरिंगणात मुसंडी मारली होती, मात्र संदेश झिंगान याने दिल्लीच्या खेळाडूस “ऑफसाईड’मध्ये अडकविले. 80व्या मिनिटाला पुन्हा एकदा केरळा ब्लास्टर्सची संधी चुकली. केर्व्हन्स बेलफोर्ट याने दिलेल्या अप्रतिम पासवर चोप्राने दिल्लीच्या रिंगणात जोरदार मुसंडी मारली. मात्र फटका मारण्यात उशीर झाल्यामुळे प्रयत्न वाया गेला.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *