किल्ले जयगड

रत्नागिरी जिल्ह्यामधील दंतूर असलेला सागरी किनारा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करीत असतो. रत्नागिरी बरोबर पावस आणि गणपतीपुळे ही धार्मिक स्थळेही नेहमीच भाविकांसाठी श्रद्धास्थाने ठरली आहेत. गणपतीपुळेच्या ऊत्तरेला जयगडाचा किल्ला हा उत्तम असूनही मोजकेच पर्यटक इकडे फिरकतात.

मुंबई-पणजी महामार्गावरील संगमेश्वर हे गाव ओलांडल्यावर घाटाच्या माथ्यावर निवळी फाटा लागतो. येथून जयगडला अथवा गणपतीपुळे येथे जाण्यासाठी गाडीमार्ग आहे. तसेच रत्नागिरीकडून गणपतीपुळे मालगुंड मार्गेही जयगड गाठता येतो. जयगडाचा किल्ला पठारावर आहे. पठार समुद्रात काहीसे आत घुसलेले असल्यामुळे याच्या तिन्ही बाजूंना सागराने घेरलेले आहे. येथेच शाल्मी ही नदी सागराला येऊन मिळते. त्यामुळे नैसर्गिक आणि सुरक्षित असे बंदर म्हणून जयगड पुर्वीपासून प्रसिद्ध आहे.

जयगड हे गाव किल्ल्याच्या दक्षिणेकडील उतारावर वसलेले आहे. जयगड हे गाव सध्या जिंदाल औष्णिक प्रकल्पामुळे बरेच प्रसिद्धीला आले आहे. जयगड गावात जाणार्या फाट्यापासून आपण पाच मिनिटांमध्ये जयगडाच्या बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ येवून पोहोचतो.

सध्या बालेकिल्ल्याचा संपुर्ण परिसर तारेची जाळी लावून संरक्षित केलेला आहे. प्रवेशद्वाराच्या बाहेर ७/८ फूट खोलीचा खंदक आहे. हा कातळ कोरीव खंदक असून तो पाण्याने भरण्यासाठी बणविलेला नाही. त्यामुळे तो कायमच कोरडा असतो. शत्रु तटाला येवुन भिडू नये म्हणून हा खंदक बालेकिल्ल्याभोवती खोदलेला आहे. प्रवेशद्वाराच्या डावीकडून तटबंदीला वळसा घालून गेलेला खंदक पार खालपर्यंत नेलेला आहे. उजवीकडील बाजुला खंदकाला एक प्रवेशद्वारही केलेले आहे. खंदकाला प्रवेशद्वार असलेली ही रचना वेगळ्या प्रकारची आहे.

दोन बुरूजांमध्ये लपवलेला दरवाजा आहे. प्रवेशद्वारावर पुर्वी नगारखाना असावा अशी त्याची रचना आहे. काही वर्षांपुर्वीपर्यंत या नगारखान्याच्या जागेत एक ऊत्तम विश्रामगृहही बांधलेले होते. सध्या ते बंद केल्यामुळे पुर्णपणे मोडकळीस आलेले आहे.

दरवाजावर कमलपुष्पे कोरलेली आहेत. दरवाजामध्ये पहारेकर्यांच्या देवड्या आहेत. आत आल्यावर तटबंदीच्या जाण्यासाठी पायर्यांचा मार्ग दिसतो. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग असे मार्ग केले आहेत. तटबंदीच्या मधल्या जागेत एक तीन मजली उंच इमारत आपले लक्ष वेधून घेत आहे. या भव्य इमारतीचे छत नष्ट झालेले आहे. याला वाडा अथवा राजवाडा असेही म्हणतात. काही जण याला कान्होजी आंग्रे यांचा वाडा असेही म्हणतात. या वाड्या शेजारीच पाण्याची मोठी विहीर आहे. मात्र ती झाडा-झुडपांनी पुर्णपणे झाकली गेली आहे. बाजुलाच गणपतीचे मंदिर आहे. गणपती मंदिरासमोर लहानशी दीपमाळ आहे. दीपमाळेजवळच जयबाचे स्मारक आहे. तटाला लागुनच असलेले हे स्मारक जयबाच्या बलिदानाची स्मृती म्हणून उभारलेले आहे. जयगडाची बांधणी करताना त्याचा तट वारंवार ढालळत होता. त्याचे बांधकाम पक्के व्हावे म्हणून नरबळी द्यावा लागेल अशी लोकांची समजुत होती. तटबंदीसाठी जयबा तयार झाला. त्याला तटबंदीमध्ये जीवंत चिणून तटाचे बांधकाम पुर्ण करण्यात आले. जयबाच्या या त्यागपुर्ण बळीदानामुळे तटबंदी ऊभी राहीली म्हणून गडाचे नाव जयगड ठेवण्यात आले अशी कथा प्रसिद्ध आहे.

तटबंदीवरुन पुर्ण गडफेरी करता येते. गडावरुन समुद्राकडील देखावा ऊत्तम दिसतो. तटबंदीमधील बुरुज गोलाकार असून, त्यामध्ये जागोजाग मार्याच्या जागा केलेल्या आहेत. बुरुजावर तोफांसाठी केलेली सोय दिसते, मात्र तोफा आढळत नाहीत. गडफेरी करण्यासाठी तास-दीड तासाचा अवधी पुरेसा आहे. दरवाजाच्या बाहेरील खंदकामध्ये दरवाजातून आत गेल्यावर खंदकाच्या टोकाकडील भागात पायर्या आहेत. येथून खालच्या भागात जाता येते. खाली जांभ्या दगडाने कोरलेली गुहा आहे. यात मोहमाया देवीचे मंदिर असून, ही ग्रामस्थ असलेल्या घाटगे यांची कुलदेवता आहे. समुद्रकाठापर्यंत उतरल्यावर एक लहान दरवाजा तसेच बुरुजही पाहायला मिळतात.

समुद्रकाठचा पडकोटाचा भाग पाहून आपण डांबरी सडकेने धक्क्याकडे येवू शकतो व येथून आपण करहाटेश्वर मंदिराकडेही जावू शकतो…..

प्रमोद मांडे (महान्युज मधून साभार)

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *