जय हनुमान ग्रामस्थ मंडळ सावली, मुंबईचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

मुंबई: मुरुड तालुक्यातील सावली गावातील जय हनुमान ग्रामस्थ मंडळाच्या गावातील तरुण-तरुणींच्या पुढाकाराने साकारलेल्या संकल्पनेतून वरिष्ठांच्या हातभाराने चालू केलेल्या सामाजिक, कला, क्रीडा आणि शैक्षणिक कला गुणांना वाव देणारा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मुंबई सेंट्रल येथील रुशी मेहता हॉल येथे रविवारी (दि. १९ ऑगस्ट) रोजी पार पडला. मंडळाच्या सभासदांनी अहोरात्र मेहनत घेऊन अतिशय नियमबद्ध अशी आखणी आणि पूर्वतयारी केली होती. प्रमुख अतिथींच्या हस्ते दिपप्रज्वलन, गणेशपूजन आणि शिवरायांना वंदन करून सोहळ्याची सुरुवात झाली. २००५ साली स्थापना झालेल्या मंडळाचा १३ वर्षांचा प्रवास पडद्यावर दाखवत मंडळाची पुढची उद्दिष्ट्य दाखविण्यात आली. सावली गावाच्या आजूबाजूच्या गावातील शाळांत व आदिवासी भागात शालेय वस्तू वाटप करण्याचे सत्कर्म मंडळाने केले आहे. तसेच गावात पाणी समस्या, रस्ते बांधणी व गरजूंना आर्थिक मदत करण्यात देखील मंडळ नेहमीच पुढे राहिले आहे. सर्व मागील वर्षीचा आढावा घेतल्यानंतर मुख्य सोहळ्याची सुरुवात झाली. आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात लहान-थोरांसह सर्वांनीच आपली कला सादर करीत उपस्थित प्रेक्षकांसोबत पाहुण्यांचीही माने जिंकली. यात नृत्य, बालकलाकारांचे स्वरचित गीत, फ्युजन, मंगळागौर, लावणी, ग्रुप नृत्य, वक्तृत्व, अभिनय, खेळ असे अनेक कार्यक्रम सादर करण्यात आले. प्रमुख अतिथींच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा, १० वी, १२ वी उत्तीर्ण, पदवीधरांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर बालवाडी ते पदवीधर विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू वाटप करण्यात आले. मंडळाची ध्येय आणि भरारी खूप मोठी आहेत व अजून ती संपलेली नाही. सावली तसेच आजूबाजूच्या गावातील शाळेत आदिवासी गावात शालेय वस्तू वाटप करण्याचे, मुलांना प्रोत्साहन देण्याचे, नात्यांना घट्ट बांधण्याचे ध्येय उराशी बाळगून ह्या मंडळाची वाटचाल अशीच चालत राहणार असल्याचा संदेश या वेळेस या कार्यक्रमामार्फत देण्यात आला. कार्यक्रमास डॉ. अरुण चव्हाण (प्रोफेसर), श्री. उदय शेलार (शिवसेना-रोहा तालुका संपर्कप्रमुख), कु. भास्कर गाणेकर (क्रीडा पत्रकार), श्री. मुकेश भालेराव (म. न. से, वॉर्ड २१४), मा. श्री मदन मारुती चव्हाण साहेब (समाजसेवक) या पाहुण्यांनी उपस्थिती दर्शविली. डॉ. अरुण चव्हाण ह्यांनी विद्यार्थ्यांना तसेच पालकांना शैक्षणिक वाटचाल यशस्वी कशी राहते याबद्दल मार्गदर्शन केले. श्री. उदय शेलार यांनी मंडळ कसा असावा आणि शालेय वस्तूंचे मोल गरीब विद्यार्थ्याला किती असते हे पटवून देत समाजाच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या हातांना शक्य तेव्हा हात देईन असे आश्वासन दिले. श्री. मदन मारुती चव्हाण साहेब यांनी आपण असा नियमबद्ध आणि अप्रतिम सोहळा कधी पहिला नव्हता व असे कार्यक्रम कधीच संपू नये अशी प्रशंसा करीत यशस्वी कार्यक्रमाची पोचपावतीच दिली. मंडळाचे अध्यक्ष श्री. विश्वनाथ पाटील (वाघ्या) आणि त्यांच्या सर्व सभासदांनी अतिशय मेहनत घेऊन सुरेख असा सोहळा आयोजित केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री महेश शिवणे, संतोष कांबळे व प्रतीक्षा कांबळे यांनी अप्रतिमरीत्या पार पाडत सोहळ्यात चांगलीच रंगत आणली.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *