केरळा आणि नॉर्थईस्ट आज आमनेसामने, दोन्ही संघांसाठी विश्वकरंडक अंतिम सामन्याइतके महत्त्व

कोची, दिनांक 3 डिसेंबर 2016: केरळा ब्लास्टर्स एफसी आणि नॉर्थईस्ट युनायटेड एफसी यांच्यात येथील नेहरू स्टेडियमवर रविवारी हिरो इंडियन सुपर लीगचा सामना होईल. 90 मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांचे भवितव्य ठरेल. ही लढत दोन्ही संघांसाठी विश्वकरंडक अंतिम सामन्याइतकी महत्त्वाची असल्याची प्रतिक्रिया नॉर्थईस्टचे प्रशिक्षक नेलो विंगाडा यांनी व्यक्त केली आहे. उपांत्य फेरीतील अखेरच्या स्थानासाठी या दोन संघांमध्ये चुरस आहे. केरळाला केवळ बरोबरीची गरज आहे. घरच्या मैदानावर लढत होणे त्यांच्या जमेची बाजू असेल. मुख्य म्हणजे त्यांनी येथे सलग चार सामने जिंकले आहेत. केरळाचे प्रशिक्षक स्टीव कॉप्पेल यांनी सांगितले की, आम्ही फक्त खेळतो. बरोबरी साधण्यासाठी कसे खेळायचे हे मला माहीत नाही. आम्ही खेळून जिंकण्याचा प्रयत्न करतो. सामना पुढे सरकतो तसे लोक निर्णयाप्रत येतात. प्रशिक्षक दृष्टिकोन बदलण्याच्या प्रयत्नात राहतील. खेळ होत जाईल तसे परिणाम जाणवतील. सुरवातीला मात्र आम्ही जिंकण्यासाठीच प्रयत्न करू. आम्ही हाच दृष्टिकोन ठेवू शकतो. केरळाने घरच्या मैदानावर भक्कम कामगिरी केली असली तरी प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर त्यांना सातत्य राखता आलेले नाही. मुंबई सिटी एफसीविरुद्ध 0-5 असा पराभव झाला तेव्हा फार मोठी नामुष्की ओढवल्याचे कॉप्पेल यांनी मान्य केले. घरच्या मैदानावर मात्र ते आरामात खेळू शकतात. त्यातही कोचीला यंदाच्या अंतिम सामन्याचे यजमानपद बहाल करण्यात आले आहे. कॉप्पेल म्हणाले की, आम्ही खेळलेल्या मैदानांमध्ये सर्वोत्तम वातावरण कोचीत आहे. सर्वाधिक प्रेक्षक, सर्वोत्तम वातावरणनिर्मितीमुळे संयोजन समितीचा कोचीच्या निवडीचा निर्णय उचित वाटतो. केरळमध्ये फुटबॉलवर प्रेम केले जाते. आम्ही अंतिम फेरीत असू किंवा नाही लोक अंतिम सामन्याला भरभरून प्रतिसाद देतील आणि प्रत्येकासाठीच सामना प्रेक्षणीय ठरेल याची मला खात्री आहे. मध्यरक्षक मेहताब होसेन जायबंदी असूनही केरळाला घरच्या मैदानावर अंतिम फेरी खेळण्याची आशा बाळगायची असेल तर त्यांना आधी नॉर्थईस्टला रोखावे लागेल. नॉर्थईस्टला गेल्या दोन मोसमांत एकदाही उपांत्य फेरी गाठता आलेली नाही. त्यामुळे तीन प्रयत्नांत पहिल्यांदाच ही कामगिरी करण्याचा त्यांचाही तेवढाच निर्धार आहे. विंगाया यांनी सांगितले की, उद्या अप्रतिम वातावरण असेल याची मला खात्री आहे. आव्हान संपेल त्या एका संघासाठी कठोर स्थिती निर्माण होईल, पण अखेरीस फुटबॉलचे हेच वैशिष्ट्य असते. आम्ही पुरेसा दर्जेदार खेळ केला आणि यापूर्वीच पात्र ठरायला हवे होते असे तुम्ही म्हणून शकाल, पण फुटबॉलमध्ये केवळ कामगिरीला नव्हे तर निकालास महत्त्व असते. उद्या आण्ही एका कारणासाठीच खेळू आणि ते म्हणजे निकाल. तुम्हाला माहीत आहे की कामगिरी विसरली जाते आणि लक्षात ठेवला जातो तो निकाल. सामना रंगतदार ठरेल अशी मला आशा आहे. केरळाला सुमारे 55 हजार प्रेक्षकांचा पाठिंबा मिळेल आणि ही त्यांच्या जमेची बाजू असल्याची जाणीव विंगाडा यांना आहे. यानंतरही आपल्या संघाच्या संधीविषयी त्यांना पुरेपूर कल्पना आहे. ते म्हणाले की, केरळासाठी 50 हजार ते 55 हजार प्रेक्षकांचा पाठिंबा ही जमेची बाजू असेल, पण शेवटी मैदानावरील खेळाडू सामने जिंकतात. आमच्यासाठी हे खडतर असेल, कारण आम्हाला विजय अनिवार्य आहे, पण आम्ही येथे जिंकण्यासाठीच आलो आहोत. योगायोग म्हणजे हे दोन संघ यंदा उद्‌घाटनाचा सामना खेळले होते. एक ऑक्‍टोबर रोजी झालेल्या लढतीत गुवाहाटीमध्ये नॉर्थईस्टने एका गोलने बाजी मारली होती.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *