नॉर्थ ईस्टचा मुंबईला तडाखा, मुंबईची पराभवाची हॅट-ट्रिक

मुंबई सिटी एफसी विरुद्ध नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी यांच्यातील सामन्यात यजमान मुंबईला ०-२ ने पराभव स्वीकारावा लागला.

मुंबई: ‘जीतेगा भाय जीतेगा, नॉर्थ ईस्ट जीतेगा’, ‘रॉलीन, रॉलीन…’ अश्या जयघोषाने नॉर्थ ईस्ट युनायटेडच्या समर्थकांनी अडीच हजाराच्या वर उपस्थित मुंबई फुटबॉल अरेनावर दुमदुमून सोडलेला एक स्टॅन्ड आपल्या संघाच्या चांगलाच कामी आला. इंडियन सुपर लीगच्या ७५व्या सामन्यात यजमान मुंबई सिटी एफसीला आणखी एका पराभवाला सामोरे जावे लागले. शिवाय तीन सामन्यांत सलग तीन पराभव स्वीकारावे लागल्यामुळे त्यांच्या रणनीतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. नॉर्थ ईस्टने पहिल्या हाफमध्ये केलेल्या दोन गोलच्या जोरावर उत्तरार्धात झालेल्या गोलशून्य लढतीमुळे मुंबईला सामना ०-२ ने गमवावा लागला.

जर सुरुवात दणक्यात होत असेल तर त्याचा शेवटही बऱ्याचदा दणक्यातच होतो. सामन्याच्या अगदी चौथ्याच मिनिटाला मुंबईचा सर्वात यशस्वी व अनुभवी गोलकिपर अमरिंदर सिंग याला नॉर्थ ईस्ट युनायटेडच्या खेळाडूंनी चांगलेच चकवत गोल धाडीत संघाला दणक्यात सलामी दिली. हाच दणका ३३व्या मिनिटालाही देत आत्मविश्वासाने उंचावलेल्या मुंबई सिटी एफसीला देत पहिल्याच हाफमध्ये ०-२ ने पिछाडीवर नेले.

यंदाच्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) मध्ये सुरेख कामगिरी केलेल्या मुंबई सिटी एफसी संघाला मागच्या सामन्यात प्रमुख खेळाडू लुसियान गोयन याला मिळालेल्या रेड कार्डमुळे या सामन्यास मुकावे लागले. त्याच्या जागी मुंबईने अन्वर अलीला तर बिपीन सिंगच्या जागी इसोकोला अंतिम अकरामध्ये संधी दिली. मुंबईसाठी या सामन्यातील विजय अंतिम चारमध्ये जागा भक्कम करण्यास महत्वाचा होता तर दुसरीकडे नॉर्थ ईस्ट युनायटेडसाठीही हा सामना तितकाच महत्वाचा होता. पण मुंबईच्या बॉडी-लँग्वेजवरून पहिल्या हाफमध्ये एकंदरीतच ती स्फूर्ती दिसत नव्हती. खेळाडू काहीसे थकलेले, चेंडूवर ताबा मिळवण्यास असक्षम दिसत होते. आणि याचाच फायदा प्रतिस्पर्धी संघाने घेतला.

चौथ्या मिनिटाला नॉर्थ ईस्ट युनायटेडच्या किगान परेराच्या पासवर रॉलीन बोर्ग्सने अमरिंदरला चकवत नॉर्थ ईस्टचं खातं उघडून दिलं. सामन्यात पुनरामन करण्यास माहीर असलेल्या मुंबईला लगेचच नवव्या मिनिटाला तशी संधीही भेटली. पण ब्राझिलियन राफेल बास्टोसने लगावलेला चेंडू गोलपोस्ट बारच्या वरच्या टोकाला जाऊन आदळला आणि मुंबईला सामन्यात बरोबरी साधण्याची मिळालेली संधीही निसटली.

३३व्या मिनिटाला नॉर्थ ईस्टचा कर्णधार बार्थोलोमे ऑबेछेने पुन्हा एकदा अमरिंदरला चकवा देत आघाडी आणखी मजबूत केली. यावेळेसही मुंबईच्या खेळाडूंना तोंडात बोटं घालून विरुद्ध संघाच्या खेळाडूंचं सेलेब्रेशन पाहण्यावाचून पर्याय नव्हता. एकंदरीतच, नॉर्थ ईस्ट युनायटेडला तोडीस तोड उत्तर देणाऱ्या मुंबईला नशिबाची साथ म्हणा किंवा संघातील ताळमेळाचा अभाव म्हणा, पहिल्या हाफमध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूंनी चांगलंच रडवले.

दुसऱ्या हाफमध्ये मुंबईचे खेळाडू कमबॅक करतील अशी आशा त्यांचे कोच जॉर्ज पाउलो अलमेडीया यांना होती. मात्र नॉर्थ ईस्ट युनायटेडच्या बचावफळीने मुंबईच्या आक्रमणाला जश्यास तसे उत्तर दिले. परिणामी, मुंबईला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. ४७व्या मिनिटाला मुंबईच्या राफेल बास्टोसला आणखी संधी चालून आली होती परंतु ऑफ-साइडमुले याही संधीवर पाणी फिरले. दरम्यान, ५७व्या मिनिटाला मुंबईच्या रेणियार फर्नांडिसने दुरूनच एक चेंडू मार्को लिसुराला पास केला पण इथेही मुंबईचे नशीब नव्हते.

मुंबईने दुसऱ्या हाफच्या शेवट शेवटी आणखी आक्रमक पवित्र आजमावले, परंतु नॉर्थ ईस्टच्या तगड्या फळीसमोर त्यांचा निभाव लागू शकला नाही. खेळाडूंच्या ताळमेळाचा अभाव व अनुभवी खेळाडूंची कमतरता मुंबईलाचांगलीच महाग पडली असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. याच पराभवासह मुंबईने मागील तीनही सामने गमावले. मुंबई अजूनही आपल्या दुसऱ्या स्थानी कायम असली तरी उरलेल्या सामन्यांत सुरेख कामगिरी करून अंतिम चारमध्ये आपले स्थान भक्कम करण्याचा दवाब त्यांच्यावर नक्कीच असेल.

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *