जमशेदपूरची किक मुंबईला भारी

संजू प्रधानचा आत्मघातकी गोल व बलवंत सिंगचा हरवलेला फॉर्म मुंबईला भारी पडला आणि नवख्या जमशेदपूर सिटी एफसी कडून घराच्या मैदानावर पराभव स्वीकारून बाद फेरी गाठण्याच्या आशा आणखी धूसर केल्या. आणखी एक घराच्या मैदानावर सामना आणि आणखी एक पराभव. मुंबई सिटी एफसीला जमशेदपूर एफसी कडून पराभवाची चव चाखावी लागली आणि बाद फेरीसाठी पात्र ठरण्यासाठी उरलेल्या सामन्यांत मोठी कसरत करावी लागेल हे नक्की. जमशेदपूरच्या बिकास जैरुची चपळाई मुंबईला खूपच महाग पडली आणि त्यात भर म्हणून संजू प्रधान आत्मघातकी केलेला गोल मुंबईच्या चांगलाच अंगलट आला. पहिला हाफ मुंबईच्या अंगलट अंतिम चारमध्ये दाखल होण्यासाठी अत्यंत महत्वाच्या या सामन्यात जिकडे मुंबई सिटी एफसीने मागच्या सामन्यात गोव्याचा पराभव करीत आशा जिवंत ठेवल्या होत्या तर दुसऱ्या बाजूला जमशेदपूर एफसीनेही बलाढ्य एटीकेला त्यांच्यात मैदानात पराभूत करीत आपलंही आव्हान जिवंत ठेवलं होतं. जिकडे मुंबईची यंदाच्या मोसमात घराच्या मैदानावर म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही तिथे भर कि काय स्वतःच गोल करीत जमशेदपूरला जणू ‘गिफ्ट’च दिलं. सामन्याचा विचार केला तर मुंबईने पहिल्या मिनिटापासूनच जमशेदपूरवर दबाव टाकायला सुरुवात केली. आकड्यांचा विचार करता मुंबईने सर्वाधिक वेळा चेंडूवर ताबा मिळवण्यात यश प्राप्त केलं. शिवाय २०७-१४१ अश्या फरकाने पासेसही केल्या. इतकं सर्व काही असूनही मुंबईने मोठी चूक केली आणि ३७ व्या मिनिटाला फारुख चौधरीच्या पासला रोखण्यासाठी पुढे सरसावलेले मुंबईकर खूपच कमी पडले आणि जमशेदपूरला गोल बहाल केला. या नाट्यमय घडामोडीत फारुखचा रोखण्यासाठी पुढे सरसावलेले मुंबईचा गोलकिपर अमरिंदर सिंग हुकला, त्याला कव्हर करण्यासाठी संजू प्रधान व मर्सियो रोझारियो आले. अगदी गोलपोस्टच्या जवळच हे सर्वकाही घडत असताना संजू प्रधानने चेंडू गोलपोस्टच्या बाहेत लाथाडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला परंतु त्याच्या पायाला लागून उडालेल्या चेंडूने थेट गोलपोस्टमध्ये झेप घेत जमशेदपूरचं खातं उघडलं. दरम्यान, जमशेदपूरच्या बचाव फळीने आपली सर्व ताकद लावत मुंबईच्या आक्रमणाला तोडीस तोड उत्तर दिलं. गोल करण्यासाठी त्यांनी दोन वेळेस सुरेख प्रयत्न केले तर मुंबईकडून चेंडू पळवण्यासही बऱ्याच वेळेस यशस्वी ठरले. पहिल्या हाफमध्ये ३२ व्य मिनिटाला जमशेदपूरच्या सौविक चक्रवर्तीला वगळता कोणालाही यलो कार्ड मिळालं नाही. दुसरा हाफ: बिकास जैरूची चपळाई ठरली मुंबईला भारी ८२ व्या मिनिटाला फारुख चौधरीच्या जागी आलेल्या बिकास जैरुने आपली चपळाई दाखवत मुंबईने केलेली बरोबरी मोडीत काढली आणि मुंबईला घराच्या मैदानावर आणखी एका पराभवाची चव चाखवली. पहिल्या हाफमध्ये केलेल्या चुकांचा मुंबई काहीतरी धडा घेईल आणि गोल करीत उपस्थित प्रेक्षकांना विजयाची पर्वणी देईल असे वाटत असताना याही हाफमध्ये मुंबई कमी पडला आणि आणखी एका पराभवाला सामोरे जावे लागले. तत्पूर्वी, ७९ व्या मिनिटाला मिळलेल्या कॉर्नरचा मुंबईने फायदा उचलीत थियागो सन्तोसच्या पासवर एव्हर्टोन सन्तोसने गोल करीत मुंबईला बरोबरी करून दिली. परंतु मुंबईचा यशस्वी गोलकिपर अमरिंदर सिंगच्या चुकांमुळे मुंबईला लगेच तीन मिनिटांनी गोल खावा लागला आणि अंतिम चारमध्ये जाण्याच्या आशा आणखी धूसर झाल्या. आजच्या सामन्यात आणखी एक गोष्ट मुंबई सिटी एफसीला हैराण करून सोडली ती म्हणजे स्टार फॉरवर्ड खेळाडू बलवंत सिंग याचा हरवलेला फॉर्म. बलवंतला बऱ्याच संध्या चालून आल्या. कित्येक वेळा तर सहज गोल करण्यासाठी त्याला चांगले पासही मिळाले. पण आज नशीब कमी होतं कि आणखी काय, बलवंत त्याच्या नेहमीच्या टचमध्ये अजिबात दिसला नाही. तर संजू प्रधानने केलेला एक किक गोलपोस्टच्या खांबाला लागून परतला. याच विजयाबरोबर जमशेदपूर एफसीने अंतिम चार संघांत आपलं स्थान पुन्हा एकदा कमावलं तर मुंबई सिटी एफसीला सहाव्या स्थानावर कायम राहिला. उरलेल्या पाच सामन्यांत मुंबईला कमीतकमी तीन विजयतरी नोंदवावे लागतील जेणेकरून त्यांना बाद फेरी गाठता येईल.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *