कप्तान पोलार्डने केली मुंबईची नैया पार

सरावाच्या वेळेस झालेल्या छोट्याश्या दुखापतीनंतर मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला विश्रांती देत कायरान पोलार्डवर संघाची जबाबदारी दिली. तर तब्बल पाच वर्षे (१५१४ दिवस) संघात केवळ राखीव खेळाडू म्हणून वावरणाऱ्या मुंबईकर सिद्धेश लाडला मुंबई इंडियन्सने प्रदीर्घ काळानंतर शेवटी संधी दिली. हार्दिक पांड्या व सिद्धेश लाड यांना एकाच वेळी मुंबई इंडियन्सने आपल्या चमूत घेतल्यानंतरही सिद्धेश लाडला सामना खेळण्यास तब्बल पाच वर्षे वाट पाहावी लागली. शिवाय, मुंबई इंडियन्सची धुरा संभाळणारा पोलार्ड हा सातवा कर्णधार ठरला.

पहिल्या चार षटकांत केवळ २० धावा फलकावर लगावल्यानंतर किंग्स इलेव्हन पंजाबचे सलामीवीर के. एल. राहुल व ख्रिस गेल यांनी आपला तडाखा चालू केला. दोन्ही सलामीवीरांचं वानखेडे मैदान हे फेव्हरेट असल्यामुळे सुरुवातीस खेळपट्टीचा व मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा अंदाज घेतल्यानंतर दोंघांनीही आपले हात खुले केले. पाचव्या षटकात गेलने जेसन बेहेनड्रॉफला तीन षटकार व एक चौकार खेचत २३ धावा कुटल्या. सातव्या षटकात राहुलनेही अलझारी जोसेफला एक चौकार व एक षटकार खेचत १३ धावा ठोकल्या. मुंबईच्या सर्वच प्रमुख गोलंदाजांनावर आक्रमण करीत पंजाबच्या सलामीवीरांनी एकहाती आपले वर्चस्व गाजवले. दोघांनी आपले वैयक्तिक अर्धशकात झळकावत संघाला ११व्या षटकात शंभरी गाठून दिली. १३व्या षटकात गेलला काहीसं अस्वस्थ वाटू लागलं आणि फिजिओच्या उपचारानंतर पुढच्याच चेंडूवर मिड-विकेटला षटकार मारण्याच्या नादात बेहेनड्रॉफच्या गोलंदाजीवर कृणाल पांड्याकरवी झेलबाद देत तंबूत परतला. तत्पूर्वी त्याने ३६ चेंडूंत तीन चौकार व तब्बल सात षटकार खेचत ६३ धावांचं योगदान दिलं.

इंडियन प्रीमियर लीगमध्ये कामगिरीत सातत्य दाखवणारा के. एल. राहुल आज पुन्हा एकदा चमकला. गेलच्या साथीने शतकीय भागीदारी रचल्यानंतर राहुलने आपला तुफानी हल्ला सुरु केला. ४१ चेंडूंत अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने मिळेल त्या चेंडूंवर आक्रमण करण्यास सुरुवात केली. हार्दिक पांड्याच्या १९व्या षटकात एक चौकार व तीन षटकार खेचत त्याने धावसंख्या वाढवण्यास मदत केली. त्याने ६४ चेंडूंत सहा चौकार व तितकेच षटकार खेचत नाबाद १०० धावंच योगदान देत संघाला १९७ धावांचा पल्ला गाठून दिला. मुंबईकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक दोन बळी टिपले. पण त्याने आपल्या चार षटकांत तब्बल ५७ धावा दिल्या.

धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या मुंबईची सुरुवात काहीशी गडाडली. आपला पहिलाच सामना खेळात असलेल्या सिद्धेश लाडने पहिल्याच षटकात अंकित राजपूतच्या चेंडूवर फाईन लेगला षटकार खेचत इंडियन प्रीमियर लीगमध्ये आपला चांगलंच आगाज केला. पुढच्या चेंडुवरही त्याने चौकार लगावत वानखेडेच्या मैदानावरील प्रेक्षकांना चांगलेच मंत्रमुग्ध केले. पण त्याचा आनंद मोहम्मद शमीने जास्त काळ टिकू दिला नाही. चौथ्या षटकात लाडचा लेग स्टम्प उडवत मुंबई इंडियन्सला पहिला धक्का दिला. लाडने १३ चेंडू खेळात १५ धावा केल्या. त्यांनतर आलेला सूर्यकुमार यादव (२१) व सलामीवीर क्विंटन डीकॉक (२४) यांना मोठी धावसंख्या उभारण्यात यश आलं नाही.इशान किशनही (७) धावांवर बाद झाल्याने मुंबईचा संघ चांगलाच अडचणीत आला. पोलार्ड व हार्दिक पांड्याने पाचव्या गड्यासाठी ४१ धावांची भागीदारी करीत मुंबईच्या आशा पुन्हा पल्लवित केल्या.

शेवटचे षटक, जिंकण्यासाठी १५ धावांची आवश्यकता. पहिल्याच चेंडूवर ११ धावा, पुढच्याच चेंडूवर पोलार्ड बाद. सामना आला तो चार चेंडू चार धावा. पण आपल्या चिवट वृत्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबई इंडियन्सच्या तळाच्या फलंदाजांनी केलेली कामचलाऊ फलंदाजीच्या जोरावर मुंबईने पंजाबला शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेत पराभूत केले. पोलार्डने केलेली ८३ धावांच्या खेळीने सामन्याचे चित्र बदलले.

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *