हैद्राबादी बॉलर्सनि उडवली मुंबईची दाणादाण

सचिन तेंडुलकरच्या वाढदिवशी मुंबई इंडियन्सला मिळाला आणखी एक पराभव, सनरायजर्सने केले ३१ धावांनी पराभूत फलंदाजीसाठी पूरक असलेल्या वानखेडच्या खेळपट्टीवर मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी ११९ धावांचं माफक आव्हान पेलताना हैद्राबादच्या परिपक्व गोलंदाजीसमोर शरणागती पत्करली आणि सहापैकी पाच सामन्यांत पराभव स्वीकारत यंदाच्या आयपीएलमध्ये आव्हान धोक्यात आणलं.१९ व्या षटकात ८७ धावांवर गारद होत मुंबई इंडियन्सला ३१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. आयकॉन सचिन तेंडुलकरच्या वाढदिवशी पाहावं तसं लक मुंबई इंडियन्सला नसलं तरी सनरायजर्स हैद्राबादविरुद्ध रोहित शर्माने नाणेफेक जिंकत पाहुण्यांना फलंदाजीस आमंत्रित केलं. दुखापतीतून सावरलेला शिखर धवन आज फिट होता तर दीपक हुड्डा, भुवनेशवर कुमार यांना बेंचवर बसावं लागलं. पाचपैकी चार सामने जरी गमावले असले तरी मुंबई इंडियन्सने संघ निवडीत सातत्य ठेवत सुरुवातीची नऊ षटके वेगवान गोलंदाजांकडून करवून घेतली. केन विलियम्सनने धवनसोबत डावाची सुरुवात केली. दुसऱ्या षटकातील मॅकग्लेनेगघनचा तिसरा चेंडू धवनच्या गुढग्याला जोरदार आदळला आणि पुन्हा एकदा बाहेर जावं लागेल कि काय अशी परिस्थिती झाली. मिचेल मॅकग्लेनेगघनने पुढच्याच चेंडूवर धवनचा (५) त्रिफळा उडवत मुंबईला दमदार सुरुवात करून दिली. मुंबईच्या वेगवान गोलंदाजांनी रोहित शर्माचा विश्वास सार्थ ठरावीत टिच्चून गोलंदाजी करीत पावरप्लेपर्यंत चार बाद ५१ अशी केली. वृद्धिमान सहा (०), मनीष पांडे (१६), शाकिब अल हसन (२) यांच्या ठराविक अंतरावर बाद होण्याने हैद्राबाद दहा षटकांअखेरीस पाच बाद ८२ वर पोहोचला. यात भर ती चांगली फलंदाजी करणारा केव्ह विलियम्सनची. पहिले तीन सामने जिंकून धमाक्यात सुरुवात करणाऱ्या सनरायजर्स हैद्राबादला मात्र या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी चांगलेच रडवले. पहिले पाच फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर मधल्या ओव्हर्समध्ये मुंबईने आणखी टिच्चून गोलंदाजी करीत हैद्राबादला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं. सहाव्या क्रमांकावर आलेल्या युसूफ पठाणकडून काहीशी फटकेबाजी अपेक्षित होती परंतु त्यानेही सावध पवित्रा घेतला. आणखी भर म्हणजे एका बाजूने ठराविक अंतराने गडी बाद होत गेले. यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंतच्या २२ सामन्यांत तब्बल ३१२ षटकारांची आतिषबाजी झाली असताना हैद्राबादच्या डावामध्ये युसूफ पठाणच्या बॅटमधून निघालेला एकाच षटकाराचा समावेश होता. मुंबईकडून मॅकग्लेनेगघन, हार्दिक पांड्या, मयांक मार्कंडे यांनी प्रत्येकी २ तर जसप्रीत बुमरा व मुस्तफिझूर रहमान यांना प्रत्येकी एक गडी बाद करता आला. उरलेले दोन फलंदाजांनी आत्मसमर्पण करीत मुंबईला मदत केली. १९ व्या षटकात सनरायजर्स हैद्राबाद ११८ धावांवर बाद झाला आणि मुंबईला जिंकण्यासाठी एक सोपी संधी दिली. धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या मुंबई इंडियन्सचीही चांगलीच दमझाक झाली. ११९ धावांचं माफक लक्ष्य मुंबई आरामात पार करेल असेल वाटले होते. पण हैद्राबादच्या गोलंदाजांनी अगदी सुरुवातीपासूनच मुंबईवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. इव्हीन लेविस (५), ईशान किशन (०) व रोहित शर्मा (२) हे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्याने मुंबईच्या मजबूत फलंदाजीचा कणाच मोडला. चौथ्या गड्यासाठी सूर्यकुमार यादव व कृणाल पांड्या या जोडीने ३९ चेंडूंत ४० धावांची भागीदारी रचित मुंबईचं आव्हान कायम ठेवलं. यादव-कृणालची भागीदारी पाहता मुंबई इंडियन्स सामना जिंकेल असे वाटत असताना हैदराबादचे गोलंदाज मुंबईच्या फलंदाजांवर चांगलेच तुटून पडले. विशेषतः स्पिनर्स. मोहम्मद नबी व शाकिब अल हसन यांनी सहा षटकांत ३९ धावा देत दोन गडी बाद केले. खरी कमाल केली ती रशीद खान व सिद्धार्थ कौल या जोडीने. रशीद खानने चार षटकांत एन निर्धाव षटक टाकत केवळ ११ धावांत पोलार्ड व कृणालला चालते केले. दुसरीकडे कौलने आपल्या चार षटकांत २३ धावा देत हार्दिक पांड्या, मॅकग्लेनेगघन व मार्कंडे यांना तंबूत धाडले. सनरायजर्सच्या या धडाक्यासमोर मुंबईकरांनी अगदी सपशेल नांगी टाकली. मुंबईच्या फलंदाजांचे चुकीचे शॉट सिलेक्शन खुपच महाग पडले. मागचे दोन सामने गमावलेल्या सनरायजर्स हैद्राबादला आजच्या विजयाने काहीसा आत्मविशास परत मिळाला तर दुसरीकडे सहापैकी पाच सामने गमावलेल्या मुंबई इंडियन्सला उरलेल्या सामन्यांत चमत्काराची अपेक्षा असेल. मुंबईकडून सूर्यकुमार यादव (३४) व कृणाल पांड्या (२४) यांचा अपवाद वगळता एकही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *