मुंबईची कोलकातावर मात, स्पर्धेतील आशा जिवंत

मुंबई: नऊमधले सहा सामने हरलेल्या मुंबई इंडियसने आपल्या आवडत्या प्रतिस्पर्धी कोलकाता नाईट रायडर्सवर १३ धावांनी विजय मिळवला आणि यंदाच्या मोसमातील आपले आव्हान जिवंत ठेवले. हार्दिक पांड्याची चतुर गोलंदाजी मुंबईसाठी पूरक ठरली. दहा षटकांनंतर कोलकाता नाईट रायडर्स दोन बाद ९१ अश्या मजबूत अवस्थेत. जिंकण्यासाठी अजून तितक्याच धावा हव्या होत्या. आणि मुख्य म्हणजे, रॉबिन उथप्पा व नितीश राणा हि जोडी ४७ चेंडूंत ६३ धावांची भागीदारी करून सेट झाली होती. दिनेश कार्तिकने विचारही केला नसेल कि अश्या चांगल्या अवस्थेत असूनही सामना १३ धावांनी गमवावा लागेल. १३ व्या षटकात मयांक मार्कंडेयच्या लेग ब्रेकवर उथप्पा फसला आणि कोलकाताला तिसरा धक्का बसला आणि सामना त्यांच्या हातातून निसटला. सलामीला आलेल्या क्रिस लिन व शुबमन गिल यांनी काहीशी आक्रमक फलंदाजी केली पण बुमराने तिसऱ्या षटकात लिनचा (१३ चेंडू १७ धावा) अडथळा दुर करीत कोलकाताला पहिला धक्का दिला. शुबमन गिलही (५ चेंडू ७ धावा) हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर कृणालकडे झेल देत बाद झाला आणि पावरप्लेमधेच कोलकाताला दुसरा धक्का बसला. मुंबई इंडियन्सला ‘डू ऑर डाय’ अश्या मुकाबल्यात १०-२० धावा धावफलकावर कमी असताना कोणत्याही परिस्थितीत अचूक टप्प्यात गोलंदाजी करणे आवश्यक होते. मुंबईच्या गोलंदाजांनी ही बाब मनावर घेत अगदी अचूक टप्पा टाकला. हार्दिक पांड्याने चार षटकांत केवळ १९ धावा देत सर्वाधिक दोन बळी घेतले. त्याला इतरही गोलंदाजांनी उत्तम साथ देत मुंबईला हा सामना जिंकण्यास मोलाची कामगिरी निभावली. कोलकातातर्फे कर्णधार दिनेश कार्तिकने (२६ चेंडूंत ३६ धावा) शेवटी केविलवाणा प्रयत्न केला परंतु त्याच्या प्रयत्नांना फारसं यश आलं नाही. तत्पूर्वी, नाणेफेक जिंकत कोलकाता नाईट रायडर्सच्या दिनेश कार्तिकने मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. फलंदाजीस पूरक असलेल्या वानखेडेच्या खेळपट्टीवर मुंबईच्या सलामीविरांनी अपेक्षेप्रमाणे सुरुवात करीत एका मोठ्या धावसंख्येचे संकेत दिले. मुंबईसाठी यंदाच्या मोसमात यशस्वी ठरलेली जोडी एव्हीन लेविस व सूर्यकुमार यादव यांनी धडाक्यात सुरुवात करीत ३२ चेंडूंतच संघाचं अर्धशतक झळकावलं. पावरप्ले अखेरीस संघ बिनबाद ५६ अश्या मजबूत स्थितीत येऊन पोचला होता. संघाच्या या सुरुवातीनंतर मुंबई इंडियन्स २०० चा पल्ला आरामात गाठेल असे वाटत होते, परंतु कोलकाताच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकांत चिवट गोलंदाजी करीत मुंबईला १८१ धावांत रोखलं. पहिल्या गड्यासाठी ५६ चेंडूंत ९१ धावांची जबरदस्त सलामी दिल्यानंतर आंद्रे रसेलने लेविसला आपल्या जाळ्यात अडकवले आणि मुंबईला पहिला धक्का दिला. लेविसने २८ चेंडूंत पाच चौकार व दोन षटकार खेचत ४३ धावांचं योगदान दिल. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या रोहित शर्माला आजही जम बसवता नाही. ११ चेंडूंत ११ धावांवर सुनील नरेनला मिड-विकेटला षटकार मारण्याच्या नादात तो झेलबाद झाला. कोलकाताच्या गोलंदाजांनी डावाच्या उत्तरार्धात प्रभावी मारा करीत मुंबईला एक-एक धावेसाठी रडवले. दरम्यान, मुंबईसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या सूर्यकुमार यादवने आजही एक शानदार अर्धशतक झळकावत उपस्थित मुंबईकर प्रेक्षकांना मनोरंजित केले. रसेलच्या गोलंदाजीवर दिनेश कार्तिककरवी झेलबाद होण्यापूर्वी त्याने ३९ चेंडूंत सात चौकार व दोन षटकार खेचत ५९ धावा केल्या. यंदाच्या आयपीएलमधील हे त्याचं चौथं अर्धशतक ठरलं तर सर्वाधिक धावा (ऑरेंज कॅप) करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी पोचला. कृणाल पांड्या (११ चेंडू १४ धावा) बाद झाल्यानंतर जेपी ड्युमिनी व हार्दिक पांड्या मोठे फटके खेळून संघाला कमीत कमी १९० धावांचा पल्ला तरी गाठून देतील असे वाटले होते परंतु ड्युमिनी (११ चेंडू १३ धावा) व हार्दिक पांड्या (२० चेंडू ३५ धावा) यांच्यावर अंकुश घालण्यास कोलकाताचे गोलंदाज काही अंशी यशस्वी ठरले. कोलकाताकरवी सुनील नरेन (३५ धावांत २) व आंद्रे रसेल (१२ धावांत २) यांना गडी बाद करण्यात यश आलं. उभय संघांतील मागील सात लढतीत मुंबई इंडियन्सने निर्विवाद वर्चस्व गाजवत कोलकाताला एकदाही जिंकण्याची संधी दिली नाही. २०१५ मध्ये मुंबईला स्वीकाराव्या लागलेल्या पराभवानंतर मुंबईने आतापर्यंतच्या सर्वच लढती कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध जिंकल्या आहेत.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *