बटलरचा झंझावत, मुंबईच्या आशा संपुष्टात?

बटलरच्या नाबाद ९४ धावांनी ठेवलं राजस्थान रॉयल्सचं आयपीएल मधील आव्हान जिवंत. मुंबई इंडियन्सचा केला सात गडी राखत पराभव. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आपल्या शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली असताना सामन्यागणिक रोमांच वाढत चालला आहे. प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेत होणारा बदल तळाच्या संघांना कधी वर तर कधी खाली पोचवत आहे. स्पर्धेच्या ४७ व्या सामान्यत मुंबईकर अजिंक्य रहाणेने राजस्थान रॉयल्ससाठी नाणेफेक जिंकत रोहित शर्माला फलंदाजीसाठी आमंत्रीत केले. मुंबईसाठी संमिश्र अशी सुरुवात करून देणाऱ्या सूर्यकुमार यादव व एव्हीन लेविस यांनी मुंबईला चौथ्यांदा अर्धशतकीय भागीदारी रचून दिली. त्यांना उत्तम साथ दिली ती राजस्थान रॉयल्सच्या क्षेत्ररक्षकांनी. दुसऱ्याच षटकात नऊ धावांवर यादवला गौथमने धवल कुलकर्णीच्या गोलंदाजीवर तर पुढच्या षटकात स्टुअर्ट बिन्नीने जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर लेविसला पाच धावांवर जीवनदान दिले. याच जोडीने पुढे ६४ चेंडूंत ८७ धावांची भरभक्कम भागीदारी रचली. पावरप्लेपर्यंत ८.५ च्या सरासरीने ५१ तर दहा षटकानंतर ८६ अशी चांगली सुरुवात दिल्यानंतर मुंबईच्या गाडीला ब्रेक लावला तो जोफ्रा आर्चरने. ११ व्या षटकात आखूड टप्प्याच्या चेंडूवर सूर्यकुमार यादवला (३१ चेंडू ३८ धावा) चकमा देत मुंबईला पहिला धक्का दिला. पुढच्याच चेंडूवर आर्चरने मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला शून्यावर बाद करीत मुंबईला चांगलाच हादरा दिला. रोहित शर्माचं यंदाच्या आयपीएलमधील हा तिसरा भोपळा ठरला तर राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या दोन्ही सामन्यांत तो पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. रोहितच्या या अपयशानंतर १५ चेंडूच्या अंतरावर लेविस ४२ चेंडूंत ६० धावा करून तंबूत परतला. धवल कुलकर्णीच्या गोलंदाजीवर डीप पॉईंटला संजू सॅमसनकडे झेल देत तो तंबूत परतला. ईशान किशनलाही या तीन सलग धक्क्यांनंतर सावरता आलं नाही आणो तोही झटपट बाद झाला. ११ चेंडूंत एका चौकारासह तो केवळ १२ धावाच करू शकला. चांगल्या सुरुवातीनंतर मुंबई इंडियन्सचा स्कोर १९० ते २०० चा पल्ला सहज गाठेल असे दिसत असताना राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी चपळाई दाखवत मुंबईच्या फलंदाजांना चांगलेच रडवले. १५ ते १८ या चार षटकांत रॉयल्सच्या गोलंदाजांनी केवळ १७ धावा देत एक गडी बाद केला. या २४ चेंडूंत आठ निर्धाव व १३ एकेरी धाव मुंबई इंडियन्सला करण्यात आली. आणि याच गोलंदाजीच्या जोरावर राजस्थानने मुंबई इंडियन्सला १६८ धावांत रोखले. हार्दिक पांड्यांने शेवटी केलेल्या २१ चेंडूंत ३६ धावा मुंबईला समाधानकारक धावसंख्या उभारण्यास महत्वपूर्ण ठरल्या. रॉयल्सकडून आर्चर, बेन स्टोक्स यांना प्रत्येकी दोन तर धवल कुलकर्णी, जयदेव उनादकत यांना प्रत्येकी एक गडी बाद करता आला. संजू सॅमसनने रॉयल्सच्या डावात तीन अप्रतिम झेल पकडले हेही विशेष. धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या राजस्थान रॉयल्सने पहिल्याच षटकात गडी गमावल्यानंतर सावध पवित्र घेतला. बुमराने डी’आर्ची शॉर्टला ईशान किशन किशनकडे झेल देण्यास भाग पाडले आणि मुंबईला पहिली सफलता मिळवून दिली. दुसरा सलामीवीर जोस बटलरने आपला सुरेख फॉर्म चालू ठेवत मुंबईच्या गोलंदाजांची येथेच्छ धुलाई केली. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या अजिंक्य रहाणेने त्याला उत्तम साथ देत राजस्थानचं प्रेशर खूपच कमी केलं. रोहित शर्माच्या फलंदाजीतील अपयशानंतर त्याच्या नेतृत्वातही कमतरता जाणवून आली. बुमरा, मॅकग्लेनेघन याच्या जोडीला हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या व मयांक मार्कंडे यांना अधून-मधून गोलंदाजी करवीत होता. बेन कटिंग सारख्या प्रभावी गोलंदाजाला अगदी शेवटपर्यंत एकदाही चेंडू सोपवला नाही. कदाचित याचाच फायदा बटलरने घेत एक शानदार खेळी प्रदर्शित केली. अजिंक्य रहाणेने ३६ चेंडूंत चार चौकारांच्या साहाय्याने ३७ धावा करीत बटलरने एका बाजूने उत्तम साथ दिली. रहाणेला हार्दिकने सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद करीत मुंबईसाठी छोटीशी आशा निर्माण केली. राजस्थानच्या आजच्या डावाचा वैशिष्ठ्य ठरलं ते जोस बटलरची तुफानी फलंदाजी. मागील चार सामन्यांत सलामीला येत सलग चार अर्धशतके झळकावणाऱ्या बटलरने आपला फॉर्म कायम ठेवत आजही एक तुफानी खेळी केली. मागील सामन्यात चेन्नई सुपर किंग्स सारख्या तगड्या संघाविरुद्ध पाठलाग करताना नाबाद ९५ तर आजही नाबाद ९४ धावांची खेळी करीत राजस्थानला दोन षटके व सात गडी राखून विजय मिळवून दिला. त्याच्या या ८९ मिनिटे व ५३ चेंडूच्या खेळीत नऊ चौकार व पाच षटकारांचा समावेश होता. संजू सॅमसननेही १४ चेंडूंत २ चौकार व २ षटकार खेचत २६ धावांचं योगदान दिलं. संक्षिप्त धावफलक: मुंबई इंडियन्स १६८/६ (२०) – लेविस ६०(४२), सूर्यकुमार ३८(३१), आर्चर २-१६ (४), स्टोक्स २-२६ (४) राजस्थान रॉयल्स १७१/३ (१८) – बटलर ९४*(५३), रहाणे ३७ (३६), हार्दिक २-५२ (४), बुमरा १-३४ (३) राजस्थान रॉयल्स १२ चेंडू व ७ गडी राखून विजयी]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *