केरळा, मुंबईसमोर दुखापतीची समस्या

मुंबई, दिनांक 13 ऑक्‍टोबर 2016: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये शुक्रवारी कोचीमधील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर केरळा ब्लास्टर्स आणि मुंबई सिटी एफसी यांच्यात सामना होत आहेत. या लढतीत दोन्ही संघांना कर्णधारांच्या अनुपस्थितीत खेळावे लागेल. मुंबईचा कर्णधार दिएगो फोर्लान याने पहिल्या दोन विजयांमध्ये प्रभावी कामगिरी केली. नॉर्थईस्टविरुद्धच्या लढतीत तो खेळला नाही. यानंतर तो संघाबरोबर केरळा सुद्धा गेलेला नाही. मुंबईचे प्रशिक्षक अलेक्‍झांड्रे गुईमाराएस यांनी सांगितले की, दिएगो संघाबरोबर गेलेला नाही. आमच्या वैद्यकीय तज्ज्ञांसह तो तंदुरुस्तीसाठी प्रयत्नशील आहे. तो लवकरात लवकर उपलब्ध होईल अशी आम्हाला आशा आहे. केरळासमोर सुद्धा दुखापतींचे प्रश्नचिन्ह आहे. मागील सामन्यात नेतृत्व करणारा सेड्रीक हेंगबार्ट याला दुखापतीमुळे मध्येच मैदान सोडावे लागले. मुंबईविरुद्ध महत्त्वाच्या लढतीसाठी तंदुरुस्त व्हायचे असेल तर त्याला मेहनत घ्यावी लागेल. त्याच्याविषयी विचारले असता कल्पना नसल्याचे केरळाचे प्रशिक्षक स्टीव कॉप्पेल यांनी सांगितले. ते म्हणाले की, आम्ही अखेरच्या मिनिटापर्यंत त्याची तंदुरुस्त आजमावून पाहू. मागील सामन्यात दुखापत झाली तेव्हा तो खेळू शकणार नाही असे मला वाटले होते, पण तो लढवय्या आहे. तो तंदुरुस्तीसाठी कसून प्रयत्न करीत आहे. केरळाच्या सुदैवाने मार्की खेळाडू ऍरॉन ह्यूजेस आंतरराष्ट्रीय पातळीवरील वेळापत्रक संपवून परतला आहे. तो खेळण्याची अपेक्षा आहे. यंदाच्या युरो स्पर्धेत त्याने उत्तर आयर्लंडला दुसरी फेरी गाठून देण्यात मोलाची कामगिरी बजावली होती. केरळाला पहिल्या तीन सामन्यांमधून केवळ एक गुण मिळाला आहे. अद्याप गोल करू न शकलेला हा एकमेव संघ आहे. प्रत्येक सामन्याला 55 हजार प्रेक्षकांचे समर्थन मिळत असूनही त्यांना कामगिरी उंचावता आलेली नाही. कॉप्पेल यांनी सांगितले की, आमचे खेळाडू कसून प्रयत्न करीत आहेत आणि लवकर नशीब पालटण्याची आम्हाला आशा आहे. खेळाडूंना जबाबदारीची पूर्ण जाणीव आहे. अप्रतिम प्रेक्षकांना पर्वणी देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी खेळाडू सर्वस्व पणास लावतील आणि विजयाची मेजवानी देतील. आम्ही विजयाच्या नजीक आलो आहोत असे मला व्यक्तिशः वाटते. आम्ही पुनरागमन करून पाच किंवा सहा सामने जिंकू शकतो. मुंबई सिटीने यंदाच्या मोसमात आपल्या मोहिमेला उत्साहवर्धक प्रारंभ केला आहे. हा संघ अद्याप अपराजित आहे. तीन सामन्यांतून त्यांनी सात गुण कमावले आहेत. या टप्यास नऊ गुणांचे लक्ष्य असल्याचे गुईमाराएस यांनी सांगितले असले तरी त्यांच्यासाठी ही स्थिती नक्कीच समाधानकारक आहे. कोस्टारिकाचे गुईमाराएस यांनी सांगितले की, नऊ गुण असते तर मला आवडले असते. आम्ही कमाल गुण कमावण्याच्या उद्देशाने खेळलो, पण शेवटी खेळामध्ये असे होत असते. गुणांपेक्षा कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असते. मोसमपूर्व तयारीसाठी आम्ही केलेल्या प्रयत्नांचे फळ आता दिसत आहे आणि याचा मला आनंद आहे. मुंबई सिटीने पहिले तीन सामने पुणे आणि मुंबईसारख्या तुलनेने छोट्या स्टेडिअमवर खेळले. आता केरळामधील चाहत्यांच्या जोरदार उपस्थितीला त्यांना सामोरे जावे लागेल. 55 हजार प्रेक्षकांचा केरळाला पाठिंबा असेल. प्रतिस्पर्ध्याच्या या बलस्थानाची गुईमाराएस यांना जाणीव आहे. ते म्हणाले की, अशा वातावरणात आम्ही प्रथमच खेळणार आहोत, पण माझ्या खेळाडूंनी आत्मविश्वास प्रदर्शित केला आहे. मी सरस नाही तरी किमान तुल्यबळ कामगिरीची आशा ठेवली आहे.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *