केविलवाण्या श्रीलंकेवर भारताचा सहज विजय, मालिका ३-० ने खिशात

उनादकत, सुंदरचा सलामी पंच इंडियन प्रीमियर लीगमध्ये रायसिंग पुणे सुपरजायंट संघाकडून खेळताना सुरेख कामगिरी करणाऱ्या व आजच्या सामान्याकरवी भारतासाठी टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने सलामीला गोलंदाजी करीत भारताला चांगली सुरुवात करून दिली. वयाच्या केवळ १८ व्या वर्षी टी-२० मध्ये पदार्पण करणाऱ्या सुंदरने ना केवळ सर्वात युवा भारतीय होण्याचा मान मिळवला तर आपल्या पदार्पणाला साजेशी कामगिरी करीत मनही जिंकले. त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली ती त्याचा आय. पी. एल. संघाचा साथीदार जयदेव उनादकत याची. उनादकतने आपल्या पहिल्या व सामन्याच्या दुसऱ्या षटकात डिकवेलाला मोहम्मद सिराजकरवी बाद करीत भारताला पहिली सफलता मिळवून दिली. वानखेडेच्या सपाट खेळपट्टीवर उसळीचा फायदा घेत उनादकतने डिकवेलाला (१) आपल्या जाळ्यात अडकवलेले आणि श्रीलंकेला पहिला मोठा धक्का दिला. सुंदरनेही पुढच्याच षटकात कुसल परेराला (४) स्वतःच्याच गोलंदाजीवर फसवत भारताला दुसरी सफलता मिळवून दिली. आपल्या फिरकीची जादू दाखवत सुंदरने परेराला चकवले. लगेच चौथ्या षटकात उनादकतने अनुभवी उपुल थरंगाला (११) बाद करीत पाहुण्यांची अवस्था ३ बाद १८ अशी केली. पावरप्ले अखेरीस श्रीलंकेने ३ गडी गमावर ३७ धावा जमवल्या होत्या. केविलवाणी श्रीलंका, भारत वरचढ या मालिकेतील हा नऊवा व शेवटचा सामना. कसोटी मालिकेतील १-० पराभव, एकदिवसीय मालिकेतील २-१ पराभव आणि टी-२० मालिकेत अगोदरच २-० ने पिछाडीवर असलेल्या श्रीलंकेला या सामन्यातही गमावण्यासारखे काहीही नव्हते. वानखेडेसारख्या सपाट खेळपट्टीवर जिथे टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या तब्बल १९८ आहे, अश्या परिस्थितीत श्रीलंकेने मोठ्या धावसंख्येकडे झेप घेणे अपेक्षित होते. परंतु १८ धावांवर ३ गडी बाद झाल्यांनतर चौथ्या गड्यासाठी गुणरत्ने व समरविक्रमे यांची ३८ धावांची भागीदारी वगळता श्रीलंकेला एकही मोठी भागीदारी उभारता आली नाही. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दवाचा थोडा-थोडा परिणाम जाणवू लागला असतानाही त्याचा फायदा श्रीलंकेच्या फलंदाजांना घेता आला नाही. १६, १३, २६ अश्या मधल्या गड्यांसाठी छोट्या-छोट्या भागीदाऱ्या कामाला आल्या नाही. समरविक्रमे (२१), गुणरत्ने (३६), दसून शनाका (२९) यांचा अपवाद वगळता मधल्या फळीतील फलंदाजांना एकही मोठी खेळी करता आली नाही. दुसरीकडे भारताला टी-२० मध्ये ‘अनलकी’ असलेल्या वानखेडेच्या मैदानावर युवा गोलंदाजांनी मस्तपैकी साथ दिली. मोहम्मद सिराजचा अपवाद वगळता (१-४५) भारताच्या सर्वच गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. जयदेव उनादकतने तर ४ षटकांत केवळ १५ धावा देत २ गडी टिपले. त्याचा इकॉनॉमी रेट होता तो ३.७५. हार्दिक पांड्या (२-२५), सुंदर (१-२२), कुलदीप यादव (१-२२) यांनीही आपल्या कंजूस गोलंदाजीच्या बळावर श्रीलंकेच्या खेळाडूंना जखडून ठेवले. २० षटकांच्या समाप्तीनंतर श्रीलंकेला ७ गडी गमावत केवल १३७ धावाच करता आल्या. श्रीलंकेचं आक्रमक प्रतिउत्तर १३६ धावांचं माफक लक्ष पार करण्यास उतरलेल्या भारतीय संघाला श्रीलंकेच्या गोलंदाजांनी काही अंशी जखडून धरलं असं म्हटलं तरी वावगळ ठरणार नाही. पहिल्या दोन टी-२० सामन्यांत अर्धशतक झळकलेल्या के. एल. राहुलला आज मात्र म्हणावी तशी फलंदाजी करता आली नाही. चमिराच्या गोलंदाजीवर चौथ्या षटकात यष्टीचा अगदी मधोमध असलेल्या चेंडूला फ्लिक करण्याचा त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि भारताला पहिला गडी गमवावा लागला. दरम्यान राहुलने रिव्हिव्यू घेतलाही परंतु तिसऱ्या पंचांनी नाकारत राहुलला बाद घोषित केले. त्याला केवळ ४ धावा करता आल्या. मागच्या सामन्यात विस्फोटक शतक झळकावलेला भारताचा कर्णधार रोहित शर्मा आजही आपल्या लयमध्ये दिसत होता. तिसऱ्या षटकात धनंजयाला एक चौकार व एक षटकार, नंतर सहाव्या षटकात प्रदीपला सलग दोन चौकार ठोकत सामना लवकर संपवेल असे दिसत होते. परंतु पुढच्याच षटकात दिप स्केयरला शॉर्ट चेंडू टोलवण्याच्या नादात अंदाज चुकला आणि परेराकडे झेल देत बाद झाला. त्याने २० चेंडूंचा सामना करीत २७ धावा केल्या. दहा षटकांच्या अखेरीस भारताने सलामीची फलंदाज गमावत ५६ धावा केल्या होत्या. भारताचा विजयी पंच दहा षटके आणि ८० धावा. असे समीकरण आले ते शेवटच्या दहा षटकात. भारताच्या डावाच्या सुरुवातीस जिथे सातच्याही कमी सरासरीने धावा हव्या होत्या तिथे आठच्या सरासरीने धावांची गरज होती. सलामी जोडी तंबूत परतल्यानंतर मदार आली ती मनीष पांडे आणि युवा मुंबईकर श्रेयस अय्यरवर. या युवा जोडीने आपला आय. पी. एल. चा अनुभव पणाला लावत तिसऱ्या गड्यासाठी भारताला ३८ चेंडूंत ४२ धावांची महत्वपूर्ण आघाडी रचून लक्ष्याकडे नेले. पांडेने थेट गोलंदाजाकडे मारलेला चेंडू गोलंदाजाच्या हाताला लागून यष्टीवर आदळला आणि श्रेयस अय्यर धावबाद झाला. त्याने ३२ चेंडूंत ३० धावांच योगदान दिलं. गोलंदाजीत चमक दाखवलेल्या हार्दिक पांड्याला (४) मात्र आज फलंदाजीत फारशी चमक दाखवता आली नाही. चेंडूला तटवण्याच्या नादात डिकवेलाकडे झेल देत बाद झाला आणि भारताला आणखी एक धक्का बसला. दुसऱ्या बाजूने जॅम बसवून असलेला मनीष पांडे (३२) हि चमिराच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित होत भारताला पाचवा धक्का दिला. वानखेडे वर उपस्थित प्रेक्षक वर्ग जिथे धोनीला चौथ्या-पाचव्या क्रमांकावर खेळण्यासाठी पाहत होती तिथे धोनीला आज त्याच्या नेहमीच्या सातव्या क्रमांकावर पाठवण्यात आलं. दिनेश कार्तिकने धोनीसह उरलेसुरलेली कसर पूर्ण करीत भारताला चार चेंडू व पाच गडी राखत विजय मिळवून दिला. भारताने तीन सामान्यांची हि मालिका ३-० ने जिंकत यंदाच्या वर्षाची सांगता केली. दरम्यान रोहित शर्माच्या कर्णधार पदाच्या कारकिर्दीतील हि पहिलीच मालिका त्याने क्लीन-स्वीप करून दिली. भारताचा पुढचा दौरा असेल तो दक्षिण आफ्रिकेचा जो सुरु होतोय ५ जानेवारीपासून. संक्षिप्त धावफलक श्रीलंका १३८/७ (गुणरत्ने ३६, शनका २९, उनादकत २-१५, पांड्या २-२५) भारत १३९/५ (पांडे ३२, श्रेयस ३०, चमिरा २-२२, शनका २-२७) भारत ४ चेंडू व ५ गडी राखून विजयी]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *