लाला लजपतराय यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने !

ब्रिटिशांच्या दडपशाहीस प्राणपणाने विरोध करणारे लाला लजपतराय !

काँग्रेसमधील मवाळ गटाच्या शांततामय मार्गाने मागणी करणे आणि मिळेल ते पदरात पाडून घेणे, या लाचार नीतीला विटलेल्या जनतेला लाला लजपतराय यांनी नवी दिशा दिली. क्षात्रतेजयुक्त विचारांचा प्रसार करून लाल-बाल-पाल या त्रिकुटाने संपूर्ण देशात नवचैतन्य निर्माण केले. स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या चतु:सूत्रीचा संबंध भारतियांना अवगत करून ब्रिटिशांना सळो कि पळो करून सोडले. लाला लजपतराय यांनी कायदेमंडळात जाऊन ब्रिटिशांच्या दडपशाहीस विरोध केला, त्याविषयी जनतेने त्यांना पंजाब केसरी किताबाने गौरवले.
हिंदुत्व हाच राष्ट्रीय चळवळीचा पाया असावा, असे आग्रही प्रतिपादन करणारे लाला लजपतराय !
आत्मनिर्भरता आणि स्वमदत या गोष्टी राजकीय स्वातंत्र्यापेक्षा श्रेष्ठ प्रतीच्या आहेत. त्या केवळ आध्यात्मिकतेतूनच प्राप्त होऊ शकतात, असे त्यांनी सांगितले. राजकीय स्वातंत्र्यप्राप्तीसाठी क्रांतिकार्यासमवेत युवकांना अध्यात्ममार्ग सांगणार्‍या योगी अरविंदांना त्यांनी पाठिंबा दिला आणि आध्यात्मिक राष्ट्रवादाचे समर्थन केले. हिंदुहितासाठी कार्य करणार्‍या हिंदु महासभेचेही ते सदस्य होते.
स्वातंत्र्य चळवळीच्या यज्ञात आहुती देण्यासाठी शेकडो युवक सिद्ध करणारे लाला लजपतराय !
प्रशासनामध्ये सुधारणा सुचवण्यासाठी नेमलेल्या सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय प्रतिनिधी नसल्यामुळे आणि कमिशनने सादर केलेला अहवाल अन्यायकारक असल्याने लाला लजपतराय यांनी सायमन कमिशनविरोधात तीव्र निदर्शने केली. त्या वेळी ब्रिटीश पोलिसांनी केलेल्या लाठीमारामध्ये लाला लजपतराय हुतात्मा झाले. याचा सूड उगवण्यासाठी क्रांतिकारक भगतसिंग आणि त्यांच्या सहकार्‍यांनी इंग्रज अधिकारी साँडर्सची हत्या केली. या घटनेने सशस्त्र क्रांतिकार्यास प्रेरणा मिळाली आणि शेकडो युवक ब्रिटीश राजवट उलथवून टाकण्यासाठी सिद्ध झाले. – श्री. संकल्प झांजुर्णे, सातारा सौजन्य:- सनातन प्रभात]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *