फोर्लानच्या गैरहजेरीत मुंबईला घरच्या मैदानाचा दिलासा

मुंबई, दिनांक 12 डिसेंबर 2016: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये मंगळवारी मुंबई सिटीची अ‍ॅटलेटीको डी कोलकता संघाशी लढत होत आहे. उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्यात मुंबईला 2-3 असे पराभूत व्हावे लागले. त्यातच दिएगो फोर्लान खेळू शकणार नाही. अशावेळी घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मुंबईला होईल. उरुग्वेचा फोर्लान 2010 मधील विश्‍वकरंडक स्पर्धेतील गोल्डन बूट पुरस्कार विजेता आहे. त्याला दोन पिवळ्या कार्डमुळे बंदीला सामोरे जावे लागले आहे. त्याचे पाच पैकी चार गोल मुंबई फुटबॉल एरीनावर झाले आहेत. फोर्लान खेळला नसताना मुंबईला एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यांना मुंबईत एटीकेविरुद्ध 1-1 अशी बरोबरी साधावी लागली. फोर्लान हा नियोजीत चालींमध्ये तरबेज आहे. त्याचे पहिल्या टप्यातील दोन्ही गोल असेच केले होते. तो मध्य फळलाही साथ देऊ शकतो. मुंबईचे प्रशिक्षक अलेक्झांड्रे गुईमाराएस यांनी सांगितले की, फोर्लानच्या गैरहजेरीचा फटका बसणार का याविषयी मी भाकित करू शकत नाही. सामना झाल्यानंतरच आपण चर्चा करू शकतो. तो ज्या सामन्यात खेळला नाही त्यात आमची कामगिरी चांगली झाली. एटीकेविरुद्ध हे घडले. त्याच्याऐवजी जो कुणी खेळेल तो सर्वोत्तम प्रयत्न करेल याविषयी मला शंका नाही. मुंबईसाठी चित्र अगदीच निराशाजनक नाही. त्यांनी घरच्या मैदानावर चांगली कामगिरी केली आहे. यात त्यांच्या बचाव फळीचे योगदान चांगले आहे. घरच्या मैदानावर त्यांच्याविरुद्ध केवळ तीन गोल झाले आहेत. सर्व संघांमध्ये हे प्रमाण सर्वांत कमी आहे. घरच्या मैदानावर त्यांनी चार सामन्यांत एकही गोल होऊ दिलेला नाही आणि ही सुद्धा सर्वोत्तम कामगिरी आहे. गुईमाराएस यांनी सांगितले की, घरच्या प्रेक्षकांसमोर खेळण्यास खेळाडू आतूर आहे. आमची कामगिरी चांगली झाली आहे. उद्या स्टेडियम खचाखच भरलेले असेल अशी मला आशा आहे. प्रेक्षक आम्हाला सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रेरीत करतील. आम्हाला धुर्तपणे खेळ करावा लागेल. आम्हाला आत्मघातकी खेळ करून चालणार नाही. तिन्ही स्पर्धांत उपांत्य फेरी गाठलेला एटीके हा एकमेव संघ आहे. गेल्या मोसमाच चेन्नईयीनविरुद्ध त्यांना उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले होते. यावेळी अशी निराशा टाळण्याचा त्यांचा निर्धार आहे. पाहुण्या संघासाठी एक जमेची बाजू म्हणजे त्यांना केवळ बरोबरी चालू शकते. यानंतरही आपला संघ बचावावर भर देणार नाही असे प्रशिक्षक होजे मॉलीना यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, कोलकत्यामधील विजयामुळे आमच्यासाठी काहीही बदलले नाही. आम्ही वेगळ्या पद्धतीने खेळणार नाही. आमचे पारडे किंचीत जड असल्याचे ठाऊक आहे, पण आम्हाला शांतचित्ताने खेळावे लागेल. उद्याचा सामना कसा होतो यावर प्रत्येक गोष्ट अवलंबून आहे. आयएसएलमध्ये एटीकेला आतापर्यंत प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर एकही गोल करता आलेला नाही. यावेळी बरोबरी झाली तरी चालू शकेल. एटीकेला घरच्या मैदानावर केवळ आठ गुण मिळविता आले आहे. आयएसएलमध्ये उपांत्य फेरी गाठलेल्या संघांमध्ये ते सर्वाधिक कमी आहेत. अर्थात प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर त्यांनी भक्कम खेळ केला आहे. आयएसएल इतिहासात प्रथमच त्यांनी बाहेर 12 गुण मिळविले आहेत. मॉलीना यांनी सांगितले की, 15 पैकी लिगमधील केवळ दोन सामने गमावणे नक्कीच चांगले आहे, पण उद्याचा सामना वेगळा असेल. पूर्वी आम्ही काय केले याला महत्त्व नसेल. आम्ही अंतिम फेरी गाठली तर त्यात उद्याची कामगिरी महत्त्वाची असेल. आम्ही आधी चांगले खेळलो म्हणून उद्या चांगलेच खेळू असे नाही. मी भूतकाळात नव्हे तर वर्तमानकाळात जगतो.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *