भारताने केला कॅनडाचा फडशा पार, उपांत्यपूर्व फेरीत धडक

चौथ्या सत्रात केलेल्या चारगोलच्या जोरावर भारताने साखळी सामन्यातील शेवटच्या सामन्यात कॅनडावर ५-१ असा विजय मिळवूनथेट उपांत्यपूर्व फेरी गाठली.

भुवनेश्वर: पहिल्या तीन सत्रामधील सुमार कामगिरीचा दवाब मागे झटकत भारताच्या हॉकी संघाने दमदार कमबॅक करीत शेवटच्या सत्रात तब्बल चार गोल करीत कॅनडाचा ५-१ ने धुव्वा उडवीत ‘क’ गटातील आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात विजय मिळवीत पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीचं थेट तिकीट मिळवलं. तिसऱ्या क्वार्टरमध्ये कॅनडाच्या वॅन सोनने ३९व्या मिनिटाला गोल करीत भारताची १-१ बरोबरी केली. तेव्हा बॅकफूटवर असलेल्या भारतीय संघाला चांगलेच अडचणीत टाकले. अश्या परिस्थिती युवा जोश असलेल्या भारत संघाने एका वेगळ्याच खेळाचं प्रदर्शन करीत कॅनडाचा अक्षरशः धुव्वा उडवला. भारताच्या ललित उपाध्यायने या चौथ्या सत्रात केलेल्या दोन गोलचा भारताला चांगला फायदा झाला.

सलामीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेवर ५-० असा विजय संपादन केलेल्या भारतीय संघाला साखळी सामान्याच्या आपल्या दुसऱ्या सामन्यात २०१६ ऑलिम्पिकच्या सिल्वर मेडलिस्ट बेल्जीयमसोबत बरोबरीचा सामना करावा लागला. स्पर्धेच्या नियमाप्रमाणे थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यासाठी भारताला आजच्या सामन्यात कॅनडावर मोठा विजय आवश्यक होता. तर हा सामना होण्याच्या आधी बेल्जीयमने दक्षिण आफ्रिकेचा ५-१ असा धुव्वा उडवला होता. त्यामुळे सामना सुरु होण्याच्या आधीच भारतावर दवाब होता. आणि हा दवाब भारताला पहिल्या तीन सत्रांत जाणवलाही.

हरमनप्रीतने १२व्या मिनिटाला भारताला खाते खोलून देत प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या कलिंगा स्टेडियमवर एकच जल्लोष केला. देशाच्या कानाकोपऱ्यातून सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना शनिवारच्या संध्याकाळी भारतीय संघाकडून विजयाची आशा होती. आणि आपल्या प्रेक्षकांना खुश करण्यासाठी संपूर्ण संघ जीवापाड प्रयत्न करताना दिसत होता. पहिल्या गोलच्या आघाडीनंतर कॅनडाने आपला बचाव आणखीच मजबूत करीत भारताच्या आक्रमण फळीला चेंडूवर ताबा मिळवण्यासाठी अक्षरशः झुंझवले. भारतीय खेळाडूंना त्यांनी जणू रडवलेच. याचा दवाब भारतीय बचाव फळीवर जाणवला आणि तिसऱ्या क्वार्टरमध्ये ३९ मिनिटाला कॅनडाने बरोबरी साधली.

शेवटच्या १५ मिनिटांत भारताला मोठ्या विजयासाठी कमीतकमी तीन गोल आवश्यक होते. दोन गोलवरही भारत बेल्जीयमच्या पुढे राहिला असता. पण आरामात उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी भारताला तीन गोलची गरज होती. चौथ्या क्वार्टरच्या पहिल्याच मिनिटात भारताचा उपकर्णधार चिंगलेसनाने गोल धाडीत यजमानांना २-१ अशी आघाडी मिळवून दिली. पुढच्याच मिनिटात ललित उपाध्ययने गोल करीत भारताची आघाडी ३-१ अशी वाढवली. आणखी चार मिनिटांनी अमित रोहिदासने गोल करीत आघाडी ४-१ अशी आणली व सामना संपण्यासाठी तीन मिनिटे शिल्लक असताना ललितने आणखी एक गोल करीत संघाला ५-१ अश्या सुरक्षित स्थितीत आणले. भारताने हा सामना ५-१ अश्या फरकाने जिंकत उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश मिळवला. ‘क’ गटात भारताने तीनपैकी दोन सामन्यांत दोन विजय व एका बरोबरीसह अव्वल स्थान मिळवले.

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *