त्यानं बोलावलं, ते आले आणि त्यानं जिंकलं

पहिल्या सामन्यास प्रेक्षकांचा मिळालेला कमी प्रतिसाद सुनील छेत्रीला आवाहन करण्यास भाग पाडलं आणि त्याच्या आवाहनाला प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद भारतीय फुटबॉलमध्ये क्रांती घडविण्यास नक्कीच फलदायी ठरेल. आज गल्लीगल्लीत कुठल्याही शाळकरी मुलांना विचारलं कि तुमचा आवडता खेळ कोणता तर तुम्हाला चटकन उत्तर मिळेल ‘क्रिकेट’. उत्तरही साहजिकच आहे. कारण १९९६ नंतर क्रिकेटमध्ये जी उत्क्रांती झाली ती उल्लेखनीय आहे. जगमोहन दालमिया यांनी क्रिकेटसाठी जे काही केले ते नक्कीच प्रशंसनीय आहे. पण फुटबॉलचं काय? १ जून पासून मुंबईच्या मुंबई फुटबॉल अरेना येथे सुरु झालेल्या पहिल्याच सामन्यास प्रेक्षकांचा लाभलेला अभाव भारतीय फुटबॉलसाठी नक्कीच लांच्छनास्पद होता आणि त्यानंतर जे काही झाले ते आपणा सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. मागच्याच वर्षाची गोष्ट. ऑगस्ट महिन्यातील गोष्ट आहे हि. अंधेरीच्या डी. एन. नगर मेट्रो स्टेशनच्या बाहेर काही फुटबॉलवेडे ‘फॅन’ शहाजी राजे संकुलाकडे जात होते. त्याच दरम्यान मुंबईच्या पावसाने काहीसा जोरही धरला होता. आजूबाजूच्या परिसरात ये-जा करणारे लोक आपापसात पुटपुटत होते, “ते वेडे लोक इतक्या पावसात कुठला सामना बघायला चाललेत?” कारण क्रिकेटवेड्या भारतामध्ये आणि तेही मुंबईमध्ये फुटबॉलचा सामना आहे ते हाताच्या बोटावर मोजणाऱ्या लोकांनाच माहित होतं. सामना टीव्हीवर लाईव्ह दाखवला जाणार होता हेही लोकांना माहित नव्हतं. मग सांगा जर लोकांपर्यंत सामना कोणाचा आहे, सामन्यात कुठले स्टार खेळाडू आहेत हे लोकांना माहितीच नव्हतं तर प्रेक्षकही मैदानापर्यंत कसे पोचतील? आजच्या सोशल मीडियाच्या युगात एखादी गोष्ट ‘वायरल’ होणं तितकं काही कठीण नाही. किंवा एखाद्या गोष्टीचा प्रसार करणे सोशल मीडियावर अगदी सहज सोपे होऊन बसले आहे. आजकालच्या पहिली-दुसरीच्या मुलालाही कोणी युट्युबवर एखाद गाणं वाजवण्यास सांगितलं तरीही चटकन तो मुलगा हे करेल. पाहिल्यास सामन्याच्या प्रेक्षक वर्गाच्या अभावानंतर भारताचा ‘सुपरस्टार’ कर्णधार सुनील छेत्रीने सोशल मीडियाचा आधार घेत प्रेक्षकांना मैदानात येऊन सामना पाहण्याची एक प्रकारे विनंतीच केली. कारण जिथे क्रिकेट, कबड्डी, डब्लूडब्लूई सारख्या खेळांना उदंड प्रतिसाद मिळतो तिथे फुटबॉल सारख्या जगातील सर्वात लोकप्रिय खेळाला इतका वाईट प्रतिसाद भारतात मिळणं कदाचित छेत्रीला खटकलं आणि त्याला सोशल मीडियाचा आधार घ्यावा लागला. त्याने तमाम भारतीय प्रेक्षक वर्गाला त्याने आवाहन केले. त्याच्या या आवाहनाला क्रिकेट, बॉलिवूडसह इतर क्षेत्रातील मान्यवरांनी प्रचंड प्रतिसाद देत प्रेक्षकाना मैदानात येण्याची विनंती केली. ४ जून २०१८. निमित्त होतं कर्णधाराच्या १०० व्या आंतरराष्ट्रीय सामान्यचं. भारतासाठी सर्वाधिक गोल करणाऱ्या यादीत अगदी अव्वल स्थानी असलेल्या सुनील छेत्रीच्या आवाहनाला तमाम मुंबईकरांनी भरपूर प्रतिसाद देत मोर्चा थेट अंधेरीच्या मैदानाकडे वळवला. मुंबईत नुकत्याच चालू झालेल्या मान्सूनच्या रिमझिम पावसातही मुंबईकर मोठ्या हजेरीने उपस्थित राहिले आणि आपल्या लाडक्या कर्णधाराला दाद दिली. छेत्रीनेही आपल्या तमाम चाहत्यांना निराश न करता केनियाविरुद्ध झालेल्या सामन्यात दोन गोल झळकावत भारताला सामना ३-० अशा फरकाने जिंकून दिला. पहिल्या सामन्यातील हॅट-ट्रिकच्या जोरावरही त्याने चायनीस तैपेई विरुद्धचा सामना ५-० अश्या मोठ्या फरकाने भारताच्या खिशात घातला होता. या सामन्यातील आणखी एक महत्वाची बाब म्हणजे, प्रेक्षकांना उत्स्फूर्त करण्यासाठी एक युट्युब चॅनेलच्या मालकाने एक संपूर्ण स्टँडची तिकिटे खरेदी केली होती आणि  येणाऱ्या प्रेक्षकांना ‘फ्री-एन्ट्री’ दिली. सुनीलच्या या आवाहनाला तब्बल ९००० प्रेक्षकांनी दाद देत मैदानात हजेरी लावली. अभिषेक बच्चनसारख्या बॉलीवूड कलाकारानेही हजेरी लावत भारतीय फुटबॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एक काळ होता जेव्हा ४०,००० ते ४५,००० प्रेक्षक नेहरू कप सारख्या स्पर्धांना हाऊसफुल करून टाकायचे. शिवाय इंडियन सुपर लीग (आयएसएल) सारख्या लीगसाठी चेन्नयान एफसी विरुद्ध केरला ब्लास्टर्स एफसी या साऊथ इंडियन डर्बी साठीही प्रेक्षक वर्ग अगदी मोठ्या प्रमाणात हजेरी लावते. पण मग जेव्हा भारताचा सामना असतो तेव्हा मग प्रेक्षक वर पाठ का फिरवतो? युरोपियन, स्पॅनिश लीग सारख्या लीगना जिथे भारतीय फुटबॉल फॅन्स रात्र-रात्र जागून काढत सामन्याची मजा लुटतात मग देशाच्या सामन्यास हा अन्याय का? उत्तर सोपं आहे. भारतीय फुटबॉलचा प्रचार व प्रसार ज्या प्रकारे अपेक्षित आहे तितका प्रचार व प्रसार होताना दिसत नाही. हाच धागा जर भारतीय फुटबॉल महासंस्था व टीव्ही प्रसारणाने जर पकडला आणि जोमाने काम केले तर नक्कीच भारतीय फुटबॉल उंचीचे शिखर गाठेल.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *