स्टॉपेज टाईम गोलमुळे नॉर्थईस्टने चेन्नईयीनला रोखले

चेन्नई, दिनांक 26 नोव्हेंबर 2016: सामन्याच्या “स्टॉपेज टाईम’मधील गोलमुळे नॉर्थईस्ट युनायटेडने हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत शनिवारी पराभव टाळला, त्याचवेळी त्यांनी गतविजेत्या चेन्नईयीन एफसीला विजयापासून दूर ठेवले. सामना येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. रंगतदार ठरलेला हा सामना गोलबरोबरी राहिला. एकूण सहा गोल झालेल्या लढतीत दोन्ही संघांनी प्रत्येकी तीन गोल नोंदविले. “स्टॉपेज टाईम’मधील शेवटच्या मिनिटास नॉर्थईस्टच्या खाती तिसऱ्या गोलची भर पडली. सौविक घोषच्या भेदक हेडरमुळे नॉर्थईस्टने बरोबरीचा एक गुण प्राप्त करण्यात यश मिळविले. निकोलस वेलेझच्या “असिस्ट’वर सौविकने प्रेक्षणीय हेडरवर अगदी जवळून प्रतिस्पर्धी गोलरक्षकाला चेंडू अडविण्याची संधी दिली नाही. आजच्या एका गुणामुळे नॉर्थईस्ट युनायटेडला गुणतक्‍यात प्रगती साधता आली, तसेच आणखी दोन सामने बाकी असलेल्या या संघाचे उपांत्य फेरीचा आशाही कायम राहिल्या. त्यांचे 12 सामन्यानंतर 15 गुण झाले आहेत. ते आता पाचव्या स्थानी आले आहेत. स्पर्धेतील तेराव्या सामन्यात मिळालेल्या एका गुणामुळे चेन्नईयीन एफसीच्या उपांत्य फेरीतील आशांना जबर धक्का बसला आहे. त्यांचेही 15 गुण झाले आहेत, पण कमजोर गोलसरासरीत ते सातव्या क्रमांकावर घसरले आहेत. नॉर्थईस्ट युनायटेड, पुणे सिटी व चेन्नईयीन एफसीचे समान गुण झाले आहेत. यंदाच्या आयएसएल स्पर्धेतील दुसरी हॅटट्रिक नोंदविण्याचा मान ओमागबेमी याने आज मिळविला. यापूर्वी मुंबई सिटीच्या दिएगो फॉर्लानने केरळा ब्लास्टर्सविरुद्ध यावेळच्या स्पर्धेतील पहिली हॅटट्रिक नोंदविली होती. ओमागबेमी याने अनुक्रमे 34, 45 व 81व्या मिनिटाला चेंडूला गोलजाळीची अचूक दिशा दाखविली. पाहुण्या नॉर्थईस्टचे पहिले दोन्ही गोल निकोलस वेलेझ याने नोंदविले. त्याने 38व्या, तसेच 51व्या मिनिटाला अचूक नेमबाजी केली. उत्तरार्धात नियमित गोलरक्षक सुब्रत पॉल याची दुखापत गुवाहाटीत संघासाठी महागात पडली. उपांत्य फेरीसाठी इच्छुक असलेल्या चेन्नईयीन एफसी, तसेच नॉर्थईस्ट युनायटेड यांच्यातील आजचा सामना चांगलाच रंगला. पूर्वार्धात यजमान संघाने 2-1 अशी आघाडी होती, त्यांना पाहुण्या संघाने तेवढीच तुल्यबळ लढत दिली. नायजेरियन खेळाडू मॅकफेर्लिन दुदू ओमागबेमी याच्या दोन गोलांमुळे पहिल्या 45 मिनिटांच्या खेळात चेन्नईयीन एफसीचे पारडे वरचढ ठरले, तर अर्जेंटिनाचा खेळाडू निकोलस वेलेझ याने नॉर्थईस्ट युनायटेडची पिछाडी कमी केली. पूर्वार्धातील तिन्ही गोल अकरा मिनिटांच्या अंतराने झाले. सामन्याच्या सुरवातीस नॉर्थईस्टचे नियोजन विस्कटले. दुखापतीमुळे त्यांच्या गुस्ताव लाझारेटी याला मैदान सोडावे लागले, त्याची जागा वेलिंग्टन प्रायोरी याने धेतली. अर्ध्या तासाच्या खेळानंतर चेन्नईयीनने आघाडी मिळविली. मेहराजुद्दीन वाडूच्या सुरेख “असिस्ट’वर मॅकफेर्लिन दुदू ओमागबेमी याचा भेदक हेडर नॉर्थईस्टचा अनुभवी गोलरक्षक सुब्रत पॉलसाठी अवघड ठरला. नंतर लगेच चार मिनिटांनी नॉर्थईस्टने बरोबरी साधली. निकोलस वेलेझने अप्रतिम कौशल्य प्रदर्शित करताना चेन्नईयीनचा बचाव कमजोर ठरविला. चेंडूवर ताबा राखत त्याने यजमान संघाच्या रिंगणात जोरदार मुसंडी मारली. त्याच्या ताकदवान फटक्‍यासमोर चेन्नईयीनचा गोलरक्षक करणजित सिंग हतबल ठरला. पूर्वार्धाच्या शेवटच्या मिनिटास दुदू ओमागबेमीने सामन्यातील आपला दुसरा गोल करत चेन्नईयीनला आघाडी मिळवून दिली. डाव्या बगलेत जेरी लालरिनझुआला चांगलीच मुसंडी मारली. नंतर त्याने दुदूला क्रॉसपास दिला. गोलरिंगणात असलेल्या या नायजेरियन खेळाडूने चाणाक्षपणे गोलरक्षक सुब्रतचा बचाव भेदला. उत्तरार्धाची सुरवातही पूर्वार्धातील खेळाप्रमाणेच आक्रमक ठरली. विश्रांतीनंतर खेळू सुरू होऊन सहा मिनिटे उलटलेली असताना नॉर्थईस्टने बरोबरी साधली. वेलेझ याचा हा सामन्यातील दुसरा गोल ठरला. चेन्नईयीनचा गोलरक्षक करणजित सिंगला यावेळी दक्षता दाखविता आली नाही. नॉर्थईस्टच्या फनाई लालरेम्पुईया याच्या क्रॉसपासवर चेंडू चेन्नईयीनचा खेळाडू एलि साबिया याला आपटून वेलेझकडे गेला. यावेळी त्याने चेंडूला साबियाच्या पायामधून फटका मारत चेंडूला गोलजाळीची दिशा दाखविली. यावेळी चेंडू अडविताना करणजितचा कमालीचा गोंधळ उडाल्याने पाहुण्या संघाचे फावले. त्यानंतर 61व्या मिनिटाला नॉथईस्टचा गोलरक्षक सुब्रतच्या दक्षतेमुळे चेन्नईयीनला आघाडी घेता आली नाही. उजव्या बगलेतून सियाम हंगलने मारलेला ताकदवान फटका सुब्रतने अप्रतिमपणे अडविला. मात्र तंदुरुस्ती अभावी सुब्रतला 77व्या मिनिटाला मैदान सोडावे लागले आणि त्याची जागा बदली गोलरक्षक पराम्बा रेहेनेश याने घेतली. नॉर्थईस्टने गोलरक्षक बदलल्यानंतर लगेच चार मिनिटांनी चेन्नईयीनच्या दुदू याने हॅटट्रिक नोंदवत संघाला आघाडीवर नेले. सामना संपण्यास नऊ मिनिटे बाकी असताना राफाएल आगुस्तो याने मध्यक्षेत्रातून दिलेल्या पासवर बर्नार्ड मेंडी याने चेंडू नियंत्रित केला. त्याने गोलरिंगणात आलेल्या दुदूला चेंडू दिला. नायजेरियन खेळाडू चेंडूवर ताबा मिळवू शकला नाही, परंतु यावेळी गोलरक्षक रेहेनेशचा बचाव चुकला आणि दुदूने चेंडूला योग्य दिशा दाखविली.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *