सध्या देशाच्या राजकारणात श्रीराम मंदिराचा मुद्दा हा वणव्यासारखा पेट घेताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी आयोध्येमध्ये श्रीराम मंदिर निर्माणाची घोषणा करताच सर्वच तथाकथित हिंदुत्ववादी पक्षांना घाम फुटले. प्रवीण तोगडिया यांच्या हो ला हो देत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील आगीत तेल ओतून श्रीराम मंदिराचा मुद्दा ज्वलंत केला. मुळात काय खरेच भाजप, शिवसेना इत्यादी स्वताला हिंदुत्ववादी समजणाऱ्या राजकीय पक्षांना प्रभू श्रीराम यांच्या मंदिर निर्माणाची तळमळ आहे, की हा निवडणूक जूमला आहे हे येणारा काळच सांगेल.
(श्रीराम मंदिर निर्माण निवडणूक जुमला)
होय, श्रीराम मंदिर हा मुद्दा येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांतील मतांसाठी चालविण्यात आलेला नियोजित जुमलाच आहे. आणि हे सांगावयास कोणत्याही ज्योतिषाची आवश्यकता नाही. त्याला कारणही तसेच आहे. देशातील ज्या तमाम हिंदूंनी भाजपला ज्या आशेने बहुमतांनी निवडून दिले, त्या भाजप व शिवसेना या मित्रपक्षांनी मागील ४ वर्षांत श्रीराम मंदिर उभारणीसाठी कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत हे देशातील तमाम हिंदू समाज जाणून आहे. तसेच वाढती महागाई, बेरोजगारी, प्राथमिक सुविधा, तसेच विकासाच्या बाबतीत देखील सरकारची कामगिरी निराशाजनक आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि हिंदू मंदिरांचे सरकारीकरण यामुळे आधीच नाराज झालेल्या हिंदू मतदारांना चुचकारण्याचे काम सद्या भाजप आणि समविचारी तथाकथित हिंदुत्ववादी पक्ष करताना दिसत आहे. मुळात देशातील समस्त हिंदु जनता ही सरकारवर नाराज झाली आहे हे तथाकथित स्वतःला हिंदुत्ववादी समजणाऱ्या ह्या पक्षांना ठाऊक आहेच. त्यामुळेच आता कोणत्या तोंडाने हिंदू जनतेपर्यंत मतांचा जोगवा मागायला जायचे हा यक्ष प्रश्न या तथाकथित हिंदुत्ववादी पक्षांना पडला आहे. आणि म्हणूनच आता यांनी प्रभू श्रीराम मंदिराचा मुद्दा पुन्हा पोखरून काढला आहे.
यात आश्चर्याची बाब म्हणजे भाजपची मातृसंस्था असलेल्या आरएसएसने आता श्रीराम मंदिराच्या प्रकरणात उडी घेतली आहे. याला कारण शिवसेनेची आक्रमकता समजते. मुळात श्रीराम मंदिराचा मुद्दा भाजपने सुमारे ३० वर्षांपूर्वी उचलला होता. त्यानंतरच ते सत्तेच्या सिंहासनावर आरूढ होऊ शकले. असे असले तरी केंद्रात बहुमताची सत्ता मिळवून देखील श्रीराम मंदिर उभारणीसाठी आरएसएस ने चुप्पी साधली होती. गेली ४ वर्षे झोपी गेलेली आरएसएस आता जागी झाली आहे. कारण त्यांना हिंदूंची मते पुन्हा हवीत, सत्तेच्या सिंहासनावर आरूढ होण्यासाठी. परंतु हिंदू समाज आता जागरूक झाला आहे. तो आता भाजप तथा इतर हिंदुत्ववादी राजकीय पक्षांवर मुळीच विश्वास ठेवणार नाही. हे भाजप, आरएसएस तथा शिवसेना देखील पूर्णपणे ओळखून आहे. म्हणूनच आता यांनी श्रीराम मंदिराचे राजकारण सुरू केले आहे. हेतू इतकाच की, हिंदूंची मते कोणत्याही प्रकारे लाटायचीच.
आता या निवडणूक जुमल्याला हिंदू समाज किती भुळतो आहे की, या तथाकथित हिंदुत्ववादी धूर्त राजकीय पक्षांच्या नेत्यांची सत्तेची स्वप्ने धुळीस मिळवितो हे येणारा काळच दाखवून देईल. हिंदू समाजाने या धूर्त राजकारण्यांचे सत्तेचे डाव हाणून पाडायचे की, भावनिक होऊन पुन्हा या अत्याचारी सरकारला सत्तेच्या सिंहासनावर बसवायचे याचा विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे.
जय हिंद…!
अरुण आत्माराम माळी
संपादक:- युवा सह्याद्री
]]>