राज ठाकरेंची वैचारिक उधळपट्टी

राज ठाकरे यांनी नुकतेच फेसबुक लाईव्ह वर संवाद साधताना हिंदवी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल अत्यंत आक्षेपार्ह असे विधान करून महाराष्ट्रातील तमाम शिवशंभू भक्तांचा व जनतेचा रोष ओढवून घेतला असून, ही अत्यंत संतापजनक व तितकीच शर्मनाक बाब आहे. राज ठाकरे यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या मनात राज ठाकरे यांच्या बाबतीत जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे.
फेसबुक लाईव्ह वर संवाद करताना राज ठाकरे म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज हे त्यांच्या वडिलांबरोबर अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बरोबर भांडण करून मोघलांना जाऊन मिळाले होते. पुढे जाऊन राज ठाकरे असेही म्हणाले की, ज्यांच्या सोबत लढताना छत्रपती शिवरायांची हयात गेली, त्यांना जाऊन तुम्ही मिळालात हे ही सत्यच आहे. मुळात छत्रपती संभाजी महाराज हे मुघलांच्या छावणीत का गेले हे महाराष्ट्रातीलच नव्हे, तर जगातील सर्वच शिवभक्त जाणून आहेत. स्वतः राज ठाकरे यांना देखील हे ठाऊक नसेल असे नाही. परंतु आता हिंदवी स्वराज्याच्या छत्रपतींवर टीका करून राज ठाकरे आता त्यांची अक्कल पाजलायला लागले आहेत. आजकाल हिंदू धर्माच्या विरोधात गरळ ओकून सत्तेचे राजकारण करण्याची संधी कोणताही राजकारणी सोडत नाही. राज ठाकरे देखील आता त्याच हिंदुद्रोही राज्यकर्त्यांच्या नादाने बेभान होऊन नको ते बरळू लागले आहेत.
मुळात राज ठाकरे यांची ओळख ही फक्त शिवसेनेमुळे आहे. तसे त्यांच्या स्वतःचे कर्तृत्व काहीच नाही. त्यांनी जर त्यांच्या नावामागील “ठाकरे” हे नाव काढून टाकल्यास त्यांना कुणी विचारणार देखील नाही. हिंदुह्रदसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या अंगाखांद्यावर खेळून लहानाचे मोठे झालेल्या राज ठाकरे यांनी स्वतः शिवसेनेबरोबर गद्दारी  करून स्वतंत्र पक्ष काढला. सत्तेसाठी फितूर होऊन स्वतःच्या काकांना अर्थातच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या राज ठाकरे यांना छत्रपतींचे नाव उच्चारायची लाज वाटली पाहिजे होती. महाराष्ट्रातील तमाम मनसे कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल अभद्र टिप्पणी करणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेमध्ये राहायचे की नाही याचा निर्णय घ्यायची वेळ आली आहे.
काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली, तेव्हा महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेच्या मनात एक आशेचा किरण दिसू लागला होता. राज ठाकरे यांनी हाती घेतलेल्या मराठी माणसाच्या मुद्द्यामुळे महाराष्ट्रातील लाखो मराठी जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेऊन त्यांच्या पक्षाला भरभरून प्रेम देऊन पहिल्याच निवडणुकीमध्ये १३ आमदार निवडून दिले होते. नाशिक सारख्या महानगरामध्ये पूर्ण बहुमताची सत्ता देखील यांच्या स्वाधीन करण्यात आली होती. राज ठाकरेंनी तसे अनेक मुद्दे हाताळले, परंतु त्यांच्या धरसोड वृत्तीमुळे त्यांनी कोणत्याही प्रश्नाला न्याय मिळवून दिला नाही. आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या सुज्ञ जनतेने राज ठाकरे यांना व पर्यायाने त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या महाराष्ट्राच्या राजकारणातून जवळपास हद्दपारच करून टाकले आहे. सद्या राज ठाकरे म्हणजे एक चेष्टेचा विषय बनला आहे.
महाराष्ट्राची जनता खरे पाहता खूपच सहनशील आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांचे फावले आहे. परंतु हीच जनता एक वेळ यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने केलेले पानिपत यातून राज ठाकरे यांनी धडा घेऊन आत्मचिंतन करण्याची सद्बुद्धी त्यांना प्राप्त होवो. मागे एकदा सीमा भागातील मराठी जनतेच्या बाबतीत अशीच काही तरी मुक्ताफळे त्यांनी उधळली होती. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल संतापजनक विधान करणाऱ्या राज ठाकरे यांनी त्वरित महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी जनतेची माफी मागावी, अन्यथा जनता यांना निवडणुकीत धडा शिकविल्याशिवाय  स्वस्थ बसणार नाही. तूर्तास इतकेच.
जय शिवशंभू, जय महाराष्ट्र
अरुण आत्माराम माळी
संपादक:- युवा सह्याद्री
]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *