दिल्ली डायनॅमोज ठरले एफसी गोवाला भारी, उत्तरार्धात चार मिनिटांत दोन गोल नोंदवून पूर्ण तीन गुणांची कमाई

मडगाव, दिनांक 30 ऑक्‍टोबर 2016: सामन्याच्या उत्तरार्धात चार मिनिटांत दोन गोल नोंदवून दिल्ली डायनॅमोजने एफसी गोवा संघाच्या आव्हानातील हवा काढली. हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत पाहुण्या संघाने 2-0 असा चमकदार विजय मिळविला. त्यामुळे यजमान संघाला घरच्या मैदानावर सलग तिसरा पराभव पत्करावा लागला. फातोर्डा-मडगाव येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर रविवारी झालेल्या या सामन्यात गोलशून्य पूर्वार्धानंतर दोन्ही गोल उत्तरार्धातील खेळात झाले. दिल्ली डायनॅमोजचा ब्राझीलियन स्ट्रायकर मार्सेलो लैते परेरा (मार्सेलिन्हो) आजच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने एफसी गोवाच्या बचावास खिंडार पाडताना पहिला गोल नोंदविला, तर दुसरा गोल त्याच्याच “असिस्ट’वर झाला. एफसी गोवाला आज सदोष नेमबाजी चांगलीच भोवली. दिल्लीचा बचावपटू अनास इदाथोडिका याची कामगिरीही उल्लेखनीय ठरली. मार्सेलो लैते परेरा याने 72व्या मिनिटाला यजमान संघाला धक्का दिला. त्याने यंदाच्या स्पर्धेतील वैयक्तिक चौथा गोल नोंदविला, तर या वर्षीच्या स्पर्धेतील हा पन्नासावा गोल ठरला. घानाच्या रिचर्ड गादझे याने दिल्लीच्या खाती दुसऱ्या गोलची भर टाकत एफसी गोवाची स्थिती आणखीनच बिकट केली. त्याने 76व्या मिनिटाला दिल्लीची आघाडी फुगविली. दिल्ली डायनॅमोजने गोव्यात प्रथमच विजय मिळविला. त्यांचा हा यंदाच्या स्पर्धेतील दुसरा विजय ठरला. जियानल्युका झांब्रोटा यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचे सात सामन्यांतून दहा गुण झाले आहेत. त्यांनी तिसऱ्या क्रमांकावर उडी घेतली आहे. एफसी पुणे सिटी आणि केरळा ब्लास्टर्सविरुद्ध घरच्या मैदानावर पराभूत झालेल्या एफसी गोवाला आज आणखी एक पराभव पत्करावा लागला. त्यांचा हा एकंदरीत पाचवा पराभव ठरला. सात सामन्यानंतर झिको यांच्या मार्गदर्शनाखालील गतउपविजेत्यांचे फक्त चार गुण असून ते तळाच्या आठव्या क्रमांकावर आहेत. अंतोनिओ सांताना याने उंचावरून दिलेल्या चेंडूवर मार्सेलो याने चेंडूवर ताबा मिळविला. यावेळी त्याने चेंडू नियंत्रणाचे सुरेख कौशल्य प्रदर्शित केले. त्याने डाव्या बगलेत एफसी गोवाच्या बचावपटूंना गुंगारा देत गोलरिंगणातून डाव्या पायाच्या सणसणीत फटक्‍यावर गोलरक्षकाला सावरू दिले नाही. दुसऱ्या गोलच्या वेळेस दिल्लीच्या केन लुईस याने डाव्या बगलेतून फ्लोरॅंट मलुडा याने सुंदर पास दिला. मलुडा चेंडूसह गोलरिंगणात घुसला. त्याने चेंडू मार्सेलो लैते परेराच्या स्वाधीन केला. मार्सेलोने स्वतः फटका न मारता रिचर्ड गादझेकडे चेंडू दिला. घानाच्या खेळाडूने यावेळी गोलरक्षकाला चकविण्याचे काम आरामात बजावले. पूर्वार्धातील खेळात दोन्ही संघांनी आकर्षक खेळ केला, परंतु सदोष नेमबाजीमुळे गोलशून्य बरोबरीची कोंडी कायम राहिली. एफसी गोवा संघाचा खेळ जास्त आक्रमक होता, त्यांनी वारंवार दिल्लीच्या रिंगणात मुसंडी मारली. मंदार राव देसाईला गोल करण्याची सुवर्णसंधी होती, परंतु त्याला ताकदवान फटका गोलपोस्टला आपटला. दिल्लीच्या रिचर्ड गादझे यानेही एफसी गोवाचा बचाव भेदण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यालाही यश मिळाले नाही. सामन्याच्या पाचव्याच मिनिटाला एफसी गोवा संघाला आघाडी घेण्याची संधी होती. राफाएल कुएल्होचा फटका गोलरेषेवर वेळीच अनास इदाथोडिका याने अडविल्यामुळे दिल्लीवरील संकट टळले. सोळाव्या मिनिटाला ज्युलिओ सीझरचा फटका गोलपट्टीवरून गेल्यामुळे एफसी गोवाचे खाते कोरेच राहिले. 13व्या मिनिटाला गादझे याने 30 यार्डावरून सणसणीत फटका मारला, परंतु एफसी गोवाचा गोलरक्षक सुभाशिष रॉय चौधरी दक्ष होता. 26व्या मिनिटाला मंदारला नशिबाची साथ मिळाली नाही. 29व्या मिनिटाला ब्रुनो पेलिसरी याच्या पासवर गादझे गोलरक्षक सुभाशिषला चकवू शकला नाही.पूर्वार्धातील शेवटच्या मिनिटाला एफसी गोवाचा गोलरक्षक सुभाशिष रॉय चौधरी याने रिचर्ड गादझे याचा आणखी एक फटका अप्रतिमपणे अडविल्यामुळे गोलफरक कोराच राहिला. सामना संपण्यास पाच मिनिटे बाकी असताना एफसी गोवाला पिछाडी कमी करता आली असती, परंतु रिचार्लीसनचा धोकादायक प्रयत्न दिल्लीच्या अनास इदाथोडिका याने वेळीच रोखला. सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये दिल्लीने तिसरा गोल जवळपास नोंदविला होता. मार्सेलो लैते परेराच्या क्रॉस पासवर बदारा बादजी याने एफसी गोवाच्या बचावातील त्रुटीचा लाभ उठविला होता, मात्र त्याला फटका गोलरक्षक सुभाशिष रॉय चौधरीने रोखला.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *