दिल्लीप्रमाणेच नॉर्थईस्टही विजयासाठी आतूर

दिल्ली, दिनांक 14 ऑक्टोबर 2016: दिल्ली डायनॅमोजचे प्रशिक्षक जियानल्यूका झँब्रोट्टा यांनी आपल्या संघाच्या समर्थकांना खास आमंत्रण पाठविले आहे. हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शनिवारी दिल्लीची नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध लढत होईल. घरच्या मैदानावरील या सामन्याच्यावेळी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या खेळाडूंना पाठिंबा द्यावा अशी त्यांची अपेक्षा आहे. दिल्लीचा संघ अद्याप अपराजित आहे. ते घरच्या मैदानावर मोसमात प्रथमच खेळतील, पण पहिल्या दोन मोसमांप्रमाणेच यावेळी सुद्धा प्रतिस्पर्ध्याचे पाठिराखे जास्त असण्याची अपेक्षा आहे. नॉर्थईस्टच्या संघाला दिल्लीत चांगला पाठिंबा मिळतो. झँब्रोट्टा यांना म्हणूनच या बाबतीत प्रतिस्पर्ध्याशी बरोबरी होणे महत्त्वाचे वाटते. इटलीचे विश्वकरंडक विजेते झँब्रोट्टा म्हणाले की, आम्हाला दिल्लीच्या समर्थकांची अर्थातच गरज आहे. म्हणूनच मी त्यांना खास आमंत्रण पाठवित आहे. आम्हाला त्यांचा पाठिंबा हवा आहे. केरळमध्ये आम्ही 60 हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत पहिला सामना खेळलो. ते वातावरण दडपून टाकणारे होते. खेळाडूंच्यादृष्टिने चांगल्या वातावरणात खेळणे उत्साहवर्धक असते. प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावरील पहिल्या दोन सामन्यांत दिल्लीकडे चार गुण आहेत. आयएसएलचे सामने कमी कालावधीत वेगाने होत असल्यामुळे संतुलन राखणे महत्त्वाचे असल्याचे झँब्रोट्टा यांना वाटते. ते म्हणाले की, केरळाविरुद्ध आम्हाला काही अडचणींना सामोरे जावे लागले, कारण चेन्नईविरुद्धच्या लढतीनंतर लगेच हा सामना झाला. आम्ही नॉर्थईस्टविरुद्ध सर्वोत्तम खेळ करायचा प्रयत्न करू. एकाच पातळीचा खेळ सर्व काळ करणे कठिण असते, पण खेळाडूंनी आक्रमण आणि बचावावर लक्ष केंद्रीत करणे महत्त्वाचे असते. नॉर्थईस्ट युनायटेड एफसीचे प्रशिक्षक नेलो विंगाडा यांनी सांगितले की, आम्हाला मागील सामन्यात सुमारे तासभर केवळ दहा खेळाडूंनिशी खेळावे लागले. त्यामुळे यातून खेळाडूंनी लवकर सावरणे आवश्यक आहे. पुणे सिटीविरुद्ध निर्मल छेत्रीला लाल कार्ड दाखविण्यात आले. त्यामुळे नॉर्थईस्टला धक्का बसला. यानंतरही नॉर्थईस्टने लय कायम राखत निसटता विजय मिळविला. उत्तरार्धात पुणे सिटीचा सुद्धा एक खेळाडू कमी झाला. पोर्तुगालचे विंगाडा म्हणाले की, तासभर एक खेळाडू कमी असताना खेळल्यामुळे आमची बरीच एनर्जी खर्च झाली, पण मला संघाची जिगर ठाऊक आहे. चांगल्या कामगिरीसाठी खेळाडू प्रयत्नशील राहतील. सुरवातीपासून सगळ्या संघांची कामगिरी उंचावत असल्याचे आपल्याला दिसून आले आहे. नॉर्थईस्ट संघासाठी ही वेगवान मोहीम आहे. आम्ही आताच्याच टप्यास चार सामने खेळलो आहोत, पण म्हणून ही काही सबब होऊ शकणार नाही. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या चांगल्या संघाविरुद्ध आम्हाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. नॉर्थईस्ट चार सामन्यांतून नऊ गुण मिळवून आघाडीवर आहेत. दिल्लीचा संघ दोन सामन्यांतून चार गुण मिळवून चौथ्या स्थानावर आहे.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *