केक कापण्याची प्रथा बंद व्हावी ! – अभिनेता अमिताभ बच्चन यांचे आवाहन

पाश्‍चात्त्यांच्या विकृतीच्या विरोधात आवाहन करणारे अमिताभ बच्चन यांचे अभिनंदन ! चित्रपट अभिनेत्यांचे अनुकरण करणारे नागरिक अमिताभ बच्चन यांच्या आवाहनानुसार कृती करतील का ? मुंबई – ११ ऑक्टोबरला प्रसिद्ध चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांचा ७४ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी त्यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी वार्तालाप केला. विविध विषयांवर त्यांनी त्यांचे मत मांडले. यात त्यांनी वाढदिवसाच्या दिवशी केक कापण्याच्या प्रथेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आणि ती बंद होण्याचे आवाहन केले. त्यांच्यासाठी आणण्यात आलेला केक त्यांनी कापण्याचेही या वेळी टाळले. अमिताभ बच्चन म्हणाले की, मी पूर्वी केक कापत होतो; मात्र आता मी तो कापण्याच्या विरोधात आहे. मी ही प्रथा बंद करण्याचे आवाहन केले आहे; कारण आम्हाला माहिती नाही की वाढदिवसाला केक का आणला जातो ? आणि केकच का आणला जातो ? त्यावर मेणबत्ती का लावली जाते ? मग तिला पेटवले का जाते ? पेटवल्यावर ती विझवली का जाते ? मग त्याच्यावर चाकू चालवून त्याचे तुकडे केले जातात आणि ते इतरांना खायला दिले जातात. आता आणखी एक प्रथा चालू झाली आहे ती म्हणजे केक त्या व्यक्तीच्या तोंडवळ्यावर फासला जातो. हे कशासाठी केले जाते ते आम्हाला समजलेले नाही. “वाढदिवस कसा साजरा कराल !” वाढदिवस साजरा करण्याची पद्धत १. वाढदिवसाच्या दिवशी अभ्यंगस्नान करून नवीन कपडे घालावेत. २. आई-वडील, तसेच वडीलधार्‍या व्यक्‍ती यांना नमस्कार करावा. ३. देवाची मनोभावे पूजा करावी. ४. ज्याचा वाढदिवस असेल, त्याचे औक्षण करावे. ५. औक्षण झाल्यावर कुलदेवता किंवा उपास्यदेवता यांचे स्मरण करून वाढदिवस असलेल्याच्या डोक्यावर तीन वेळा अक्षता टाकाव्यात.१ ६. वाढदिवस असलेल्याला खाण्यास गोड पदार्थ द्यावा. ७. वाढदिवस असलेल्यांसाठी मंगलकामना करणारी प्रार्थना करावी. ८. त्याला एखादी भेटवस्तू द्यावी; पण ती देतांना अपेक्षा किंवा कर्तेपणा बाळगू नये. (संकलन:- श्री. उदयजी धुरी, सनातन संस्था)]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *