प्रेक्षकांच्या आनंदावर पावसाचे विरजन

विश्वचषक स्पर्धा २०१९: भारत वि. न्यूझीलंड उपांत्य फेरीत पावसाचा लपंडाव, उर्वरित सामना उद्या खेळवणार

मँचेस्टर: आठवड्याचा दुसरा दिवस, विश्वचषक स्पर्धेचा उपांत्य फेरीचा पहिलाच सामना, कोहली-विलियम्सन पुन्हा एकदा आमनेसामने, मैदानही खचाखच भरलेलं. प्रतीक्षा होती ती एका हाय-वोल्टेज मुकाबल्याची. ढगाळ वातावरणात सामना सुरूही झाला. भारताने चांगली सुरुवातही केली. पण वरूणराजाने काहीतरी वेगळेच ठरवले होते. न्यूझीलंडच्या डावातील ४७व्या षटकात पावसाने आपला जोर वाढवला आणि सामना थांबण्यात आला. स्थानिक वेळेनुसार बरोबर दुपारी २ वाजता पावसाने सुरुवात केली. अधूनमधून पाऊस येत-जात होता. कव्हर्सही टाकल्या जात होत्या, काढल्या जात होत्या. पण पावसाने सव्वा सहाच्या दरम्यान आपला जोर वाढवला आणि पंचांनी आजच्या दिवसाचा खेळ संपल्याचं घोषित केलं. सामन्याला अतिरिक्त दिवस असल्यामुळे सामना उद्या (दि. १० जुलै) पुन्हा सुरु करण्याचं घोषित करण्यात आलं.

आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत किवींचा कर्णधार केन विलियम्सनने नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लावत भारताला क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरवले. भूवनेश्वर कुमार व जसप्रीत बुमरा यांनी आपले पहिले-पहिले षटक निर्धाव टाकत भारतालाही चांगली सुरुवात करून दिली. किवींना पहिली धाव घेण्यासाठी १७व्या चेंडूची वाट पाहावी लागली तर डावातील पहिला चौकार ४८व्या चेंडूवर म्हणजेच आठव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर लगावला. तत्पूर्वी, भारताने आपल्या पहिल्याच चेंडूवर रिव्हू गमावत प्रेक्षकांचा हिरमोड केला. भुवनेश्वरचा डाव्या यष्टीचा बाहेर जाणाऱ्या चेंडूंचा अंदाज आला नाही आणि कोहलीने तो रिव्हू गमावला. पण बुमराने आपल्या दुसऱ्याच षटकात आऊट-ऑफ-फॉर्म मार्टिन गुप्टिलला (१) दुसऱ्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या कोहलीकडे झेल देण्यास भाग पाडले. गुप्टिलची या विश्वचषकातील हि पाचवी एकेरी धाव ठरली. किवींचा सावध पवित्रा अगदी पहिल्या पावरप्लेपर्यंत राहिला. पहिल्या दहा षटकांत न्यूझीलंडने केवळ एक बाद २७ धावाच फलकावर लावल्या होत्या, ज्या या स्पर्धेतील निच्चांक ठरल्या. गमतीची बाब म्हणजे या पावरप्लेमध्ये तब्बल ४२ चेंडू निर्धाव होते.

पहिला गडी बाद झाल्यानंतर किवींनी सावधरीत्या खेळण्यास सुरुवात केली. येथील ढगाळ हवामान, नवी खेळपट्टी यांचा अंदाज घेत विलियम्सन व हेन्री निकोलस (२८) यांनी दुसऱ्या गड्यासाठी ८९ चेंडूंत ६८ व रॉस टेलर आणि विलियम्सन यांनी १०२ चेंडूंत ६५ धावांची भागीदारी केली. दरम्यान, विलियम्सन व टेलर यांनी वैयक्तिक अर्धशतके लगावत संघाला तारले. विलियम्सनने ९५ चेंडूंत सहा चौकार लगावत ६७ धावा केल्या तर पावसाचा व्यत्यय येण्यापूर्वी रॉस टेलर ८५ चेंडूंत तीन चौकार व एक षटकार ठोकत ६७ धावांवर नाबाद होता.

भारतासाठी सर्वच गोलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे गोलंदाजी करत किवींनी मोठे फटके मारून दिले नाही. बुमरा, भुवनेश्वर व रवींद्र जडेजा यांनी चारच्याही कमी सरासरीने धाव देत न्यूझीलंडला मोठ्या धावसंख्येपासून रोखले. पाचही गोलंदाजांनी प्रत्येकी एक बळी मिळवत न्यूझीलंडला ४६.१ षटकांत २११ धावा करून दिल्या. सामना थांबण्यापूर्वी टेलर ६७ टॉम लॅथम तीन धावांवर नाबाद होता.

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *