अस्तित्वाच्या लढाईसाठी इंग्लंड सज्ज

क्रिकेट विश्वचषक स्पर्धा २०१९: वन डे फॉर चिल्ड्रन’ सामन्यात भारतीय संघ उरतणार भगव्या जर्सीत

बर्मिंघम: लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या दारुण पराभवांनंतर यजमान इंग्लडचे आयसीसी क्रिकेट विश्वचषकातील आव्हान धोक्यात आले आहे. स्पर्धेचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या इंग्लड संघावर स्पर्धेतून बाहेर होण्याची नामुष्की आली आहे. उद्या होणाऱ्या भारताविरुद्धच्या लढतीत ‘करो वा मरो’ अश्या स्थितीत उतरणाऱ्या इंग्लंड संघाला कोणत्याही परिस्थिती विजय आवश्यक आहे. आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत एक व दोन क्रमांकाच्या या संघांमध्ये उद्या होणारी लढत ही निश्चितच काट्याची ठरणार आहे.


उभय संघांमध्ये विश्वचषक स्पर्धेतील ही आठवी लढत असेल. झालेल्या सात लढतींत दोन्ही संघाचं पारडं समसमान आहे. प्रत्येकी तीन-तीन सामने जिंकलेल्या या संघांत २०११च्या स्पर्धेतील लढत ‘टाय’ झाली होती. बर्मिंघमच्या या मैदानावर झालेल्या १९९९च्या विश्वचषकातील लढतीत भारताने इंग्लडचा पराभव केला होता. मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने सौरव गांगुलीच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने यजमानांचा ६३ धावांनी पराभव केला होता.

धोनीचा फिरकी गोलंदाजीचा कसून सराव
अफगाणिस्तानविरुद्ध खेळलेल्या संथ खेळीने टीकेचे केंद्रस्थान बनलेला भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीने आज (दि. २९ जून) येथे फिरकी गोलंदाजीवर कसून सराव केला. अफगाणिस्तानविरुद्ध ५२ चेंडूंत केवळ २८ धावा केलेला धोनी स्पिनर्सविरुद्ध चाचपडत होता. रशीद खान व मुजीब-उर-रेहमान दोन अफगाणिस्तानच्या स्पिनर्सनी धोनीला अक्षरशः जखडून ठेवले होते. शिवाय, वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातही तो काहीसा अडखळत खेळताना दिसला. आज एजबॅस्टन येथील वार्विकशायर क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या भारताच्या सरावात धोनीने जवळजवळ ४५ मिनिटे फिरकी गोलंदाजांचा सामना केला. दोन स्पिनर्सनी धोनीला ऑफ स्पिन व लेग स्पिन अशी गोलंदाजी केली. उद्या होणाऱ्या सामन्यात इंग्लंडचे दोन गोलंदाज मोईन अली व आदिल रशीद धोनीला सतावण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. मागील काही दिवसांपासून धोनीची स्पिनर्सविरुद्धची कामगिरी पाहता इंग्लडचे हे दोन गोलंदाज धोनीला नक्कीच टार्गेट करतील. आणि याच अनुषंगाने भारताच्या प्रशिक्षकांनी धोनीचा दोन स्पिनर्सकडून कसून सराव करून घेतला.

भारतीय संघाचा विचार केला असता, गोलंदाजीत संघ चांगली कामगिरी करत आहे. जखमी भुवनेश्वर कुमारच्या जागी वर्णी लागलेल्या मोहम्मद शमीने अफगाणिस्तानविरुद्ध ४० धावांत चार तर वेस्ट इंडिजविरुद्ध १६ धावांत चार अश्या एकूण आठ विकेट्स मिळवल्या आहेत. तर जसप्रीत बुमराही मोक्याच्या क्षणी बळी मिळवत भारताच्या गोलंदाजीची धुरा सांभाळत आहे. दुसरीकडे दोन स्पिनर्सही आपली कामगिरी पार पाडत असल्याने गोलंदाजीची चिंता भारतासाठी उद्याच्या सामन्यात असेल असेच म्हणावे लागेल. दुसरीकडे भारतासाठी मधल्या फळीतील फलंदाजी चिंतेचा विषय बनला आहे. मागील सामन्यात जरी महेंद्र सिंग धोनीने चांगली फलंदाजी केली असली तरी त्याचा स्ट्राईक रेट भारतासाठी काहीसा चिंतादायक आहे. विराट कोहली जरी भारतासही धावा करत असला तरी मधल्या फळीतील केदार जाधव, विजय शंकर व हार्दिक पांड्या यांच्या बॅटमधून पाहिजे तश्या धावा आलेल्या नाहीत. शिवाय चांगली सुरुवात करूनही के एल राहुल मोठी इंनिंग करण्यास अपयशी ठरत आहे.


श्रीलंका व ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध सलगच्या सामन्यांत सोसाव्या लागलेल्या पराभवामुळे यजमानांचे आव्हान धोक्यात आले आहे. उद्याच्या सामन्यात जर त्यांचा पराभव झाला तर न्यूझीलंड विरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात त्यांना विजय आवश्यक आहे. अन्यथा यांच्यावर स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढावेल.


धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघ स्पर्धेत नेहमीच अडखळला आहे. पराभूत झालेल्या तिन्ही सामन्यांत ते धावांचा पाठलाग करताना हरले आहेत. वेस्ट इंडिजचा सामना सोडला तर इतर तीन सामन्यांत प्रथम फलंदाजी करताना ते जिंकले आहेत. त्यामुळे भारताविरुद्ध होणाऱ्या उद्याच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यावर ते भर देतील. पण एजबॅस्टनच्या मैदानाचा स्पर्धेतील इतिहास बघता येथे धावांचा पाठलाग करताना दोन्ही सामने जिंकले आहेत. जखमी जेसन रॉय उद्याच्या सामन्यात खेळणार असल्याची माहिती इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन याने पत्रकार परिषदेत दिली. रॉयच्या संघात परतल्याने इंग्लडची आघाडी नक्कीच मजबूत होणार आहे.

एक दिवस मुलांसाठी
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) व युनिसेफ यांच्या विद्यमानाने उद्या होणारा यजमान इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील सामना जगभरातील मुलांसाठी खास असेल. जगभरातील विद्यार्थ्यांमध्ये राहणीमानात सुधारणा व्हावी, प्राणघातक रोगांवरील लसीकरण, स्वच्छ पाणी, खेळात संधी मिळणे यांसारख्या गोष्टींचा प्रसार करण्याच्या उद्देशाने या सामन्याला चांगलेच महत्व असेल. उपांत्य फेरीसाठी महत्वाच्या असणाऱ्या या सामन्यात जगभरातील मुले उभय संघांना प्रोत्साहित करण्यासाठी मैदानात उपस्थित असणार आहेत. ‘वन डे फॉर चिल्ड्रन’ अशी संकल्पना घेऊन आयसीसी व युनिसेफ या सामन्याचे आयोजन करणार आहे.

जोफ्रा आर्चर व मार्क वूड यांचा अपवाद वगळता एकही इंग्लड गोलंदाजाला प्रभावी कामगिरी करता आली नाही. मोईन अली (पाच सामन्यांत पाच बळी) व आदिल रशीद (सात सामन्यांत सात बळी) या प्रमुख फिरकी गोलंदाजांची सुमार कामगिरी इंग्लंडची डोकेदुखी ठरली आहे. भारतीय फलंदाजांना रोखण्यासाठी इंग्लडच्या स्पिनर्सना उद्याच्या सामन्यात चांगली कामगिरी करावी लागेल अन्यथा केवळ आर्चर व वूड यांच्या भरवश्यावर राहत इंग्लड संघ भलताच अडचणीत येऊ शकतो.

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *