लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाच दादा, इंग्लंडचे आव्हान धोक्यात?

लॉर्ड्स (लंडन):  ढगाळ वातावरणात सुरु झालेल्या या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर डेव्हिड वॉर्नर व ऍरॉन फिंच या जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत आणखी एक शतकीय भागीदारी रचली. ऑस्ट्रेलियासाठी जवळजवळ सर्वच सामन्यात चांगली सुरुवात करून देणाऱ्या या जोडीने सहाच्या आसपास धावगतीने संघाला शंभरी गाठून दिली. डेव्हिड वॉर्नरने आपले आणखी एक अर्धशतक झळकावत स्पर्धेतील ५०० धावांचा पल्लाही गाठला तर फिंचने या विश्वचषक स्पर्धेतील आपले दुसरे शतक लगावत इंग्लंडच्या गोलंदाजांचा कस काढला. दोन्ही फलंदाज ज्या धावगतीने धावा काढत होते, त्यावरून असे वाटत होते कि ऑस्ट्रेलिया ३५० धावांचा पल्ला सहज गाठेल. फिंच (१००), उस्मान ख्वाजा (२३) व डेव्हिड वॉर्नर (५३) हे ठराविक अंतरावर बाद झाल्याने मधल्या षटकांत धावांची गती मंदावली.

३६व्या षटकात फिंच बाद झाल्यावर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने तडाखाफडकी फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला खरा परंतु मार्क वूडच्या गोलंदाजीवर चेंडू तटवण्याच्या नादात तो विकेटकिपर जोस बटलकडे झेल देत तंबूत परतला. त्याने आठ चेंडूंत एक चौकार व एक षटकार खेचत १२ धावा केल्या.

मॅक्सवेल बाद झाल्यानंतर स्टोयनीस (८), स्मिथ (३८) व पॅट कमिन्स (१) हे झटपट बाद झाल्यानंतर उरलेली जबाबदारी अलेक्स कॅरीवर आली. त्याने एकेरी-दुहेरी व अधूनमधून चेंडूला सीमारेषेपलीकडे धाडत पाच चौकार खेचत नाबाद ३८ धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने समाधानकारक २८५ धावांचा पल्ला गाठला. इंग्लडकडून ख्रिस वोक्सने सर्वाधिक दोन तर आर्चर, वूड, स्टोक्स व मोईन अली यांना प्रत्येकी एक-एक गडी बाद करता आला.

धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या यजमानांची सुरुवात अडखळत झाली. डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर जेसन बेहनड्रॉफने जेम्स विन्सचा शून्यावर त्रिफळा उडवीत ऑसीजना दणक्यात सुरुवात करून दिली. मागील तीन-चार वर्षांपासून जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी असलेल्या इंग्लंडला मात्र ऑस्ट्रेलियाने आपल्या जाळ्यात चांगलेच अडकवले. जो रूट (८), कर्णधार मॉर्गन (४) हेही स्वस्तात परतल्याने यजमानांची अवस्था सहाव्या षटकात तीन बाद २६ अशी झाली. तर दुसरीकडे काहीसा स्थिरावलेला जॉनी बेएरस्टोही (२७) बेहनड्रॉफनेचा शिकार होत इंग्लंडला चार बाद ५३ अश्या अवस्थेत सोडून गेला.

पाकिस्तान, श्रीलंका यांच्याविरुद्ध सामना गमावलेल्या इंग्लंडला स्पर्धेतील आव्हान टिकून ठेवण्यासाठी या सामन्यात विजय आवश्यक होता. परंतु कसलेल्या ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीपुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी सपशेल हार पत्करली. बेन स्टोक्स (८९), जोस बटलर (२५), ख्रिस वोक्स (२६) यांनी दरम्यानच्या काळात संघर्ष करण्याचा प्रयत्न केला, परंतु ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांपुढे त्यांचा निभाव लागला नाही. बेहनड्रॉफ व मिचेल स्टार्क यांच्या प्रभावी माऱ्यासमोर इंग्लंडच्या शेपटानेही अक्षरशः शरणागती पत्करली. बेहनड्रॉफने आपल्या दहा षटकांत ४४ धावा देत पाच बाली घेतले. मिचेल स्टार्कने ४५व्या षटकात आदिल रशिदला (२५) स्टोयनीसकरवी झेलबाद करीत स्पर्धेतील आपला सहावा विजय नोंदवत गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली. ४५व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर इंग्लंड संघ २११ धावांवर सर्वबाद होत ऑस्ट्रेलियाने सामना ६४ धावा व ३२ चेंडू राखत जिंकला. तर दुसरीकडे इंग्लडचे आव्हान काहीशे धोक्यात आले आहे.

संक्षिप्त धावफलक:
ऑस्ट्रेलिया २८५/७ – फिंच १००(११६), वॉर्नर ५३(६१), वोक्स १०-०-४६-२

इंग्लंड २११/१० (४४.४) – स्टोक्स ८९(११५), बेएरस्टो २७(३९), बेहरेनड्रॉफ १०-०-४४-५
ऑस्ट्रेलिया ६४ धावांनी विजयी

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *