जॅकीचंदच्या गोलमुळे मुंबई अग्रस्थानी यजमान नॉर्थईस्ट युनायटेडवर एका गोलने संघर्षमय विजय

गुवाहाटी, दिनांक 5 नोव्हेंबर 2016: जॅकीचंद सिंग याने पूर्वार्धात नोंदविलेल्या गोलच्या बळावर मुंबई सिटी एफसीने संघर्षमय विजय नोंदवत हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत अग्रस्थान मिळविले. शनिवारी त्यांनी येथील इंदिरा गांधी ऍथलेटिक स्टेडियमवर नॉर्थईस्ट युनायटेला एका गोलने हरविले. जॅकीचंदने 45व्या मिनिटाला नोंदविलेला गोल निर्णायक ठरला, त्यामुळे वेगवान आणि आक्रमक ठरलेल्या या सामन्यात मुंबई सिटीला पूर्ण तीन गुण मिळाले. त्यांचे नऊ सामन्यांतून 15 गुण झाले आहे. गुणतक्‍त्यात पहिला क्रमांक मिळविताना त्यांनी दिल्ली डायनॅमोजवर दोन गुणांची आघाडी घेतली आहे. मुंबई सिटीचा हा गुवाहाटीतील पहिलाच विजय ठरला. यंदाच्या स्पर्धेत नोंदविलेल्या चार विजयापैकी त्यांचा हा “अवे’ मैदानावरील तिसरा विजय आहे. मैदानावर आज सामन्याच्या कालावधीत खेळाडूंत तणावही दिसला. यजमान नॉर्थईस्ट युनायटेडला घरच्या मैदानावर तिसरा सामना गमवावा लागला. गुवाहाटीत यापूर्वी त्यांना चेन्नईयीन एफसी व ऍटलेटिको द कोलकता या संघांनी अगोदरच्या लढतीत हरविले होते. स्पर्धेतील चौथ्या पराभवामुळे नॉर्थईस्ट युनायटेडचे आठ सामन्यांतून 10 गुण, तसेच पाचवा क्रमांक कायम राहिला. स्टेडियमवर यजमान संघाला मोठा पाठिंबा होता, उत्तरार्धात त्यांनी पाहुण्यांची आघाडी भेदण्यासाठी जोरदार प्रयत्नही केले, परंतु मुंबई सिटीच्या भक्कम बचावामुळे त्यांना यश मिळाले नाही. गोलरक्षक आल्बिनो गोम्सची दक्षताही मुंबई सिटीसाठी मोलाची ठरली. पूर्वार्धाच्या शेवटच्या मिनिटास जॅकीचंद सिंगने मुंबई सिटीला आघाडी मिळवून दिली. सोनी नोर्दे याच्या “असिस्ट’वर या मणिपुरी खेळाडूने प्रतिस्पर्धी गोलरक्षक वेलिंग्टन गोम्स याला चकविले. यावेळी गोलरक्षकाची चूक यजमान संघाला चांगलीच महागात पडली. त्यांना आज नियमित गोलरक्षक सुब्रत पॉल याच्याविना खेळावे लागले. मागील लढतीतील दुखापतीमुळे भारताचा आंतरराष्ट्रीय गोलरक्षक मैदानात उतरू शकला नाही. आजचा सामना रंगतदार ठरलाच, त्याचबरोबर मैदानावर खेळाडूंतही जबरदस्त चुरस दिसून आली. त्यामुळे खेळाच्या दरम्यान तणावग्रस्त प्रसंगही उद्‌भवले. विश्रांतीनंतरच्या पहिल्याच मिनिटाला दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांना भिडले होते, परंतु प्रकरण वाढले नाही. मुंबईच्या लाल्हमांगैहसांगा राल्टे याने नॉर्थईस्टच्या कात्सुमी युसा याला मागून पाडले. त्याचा जपानी खेळाडूस राग आला. त्याने राल्टे याला छातीने धक्का दिला. त्यानंतर नॉर्थईस्टचा कर्णधार दिदियर झोकोरा याने राल्टे याला मैदानावर ढकलून पाडले. यावेळी रेफरींनी या प्रकरणात सामील असलेल्या तिघाही खेळाडूंना यलो कार्ड दाखविले. त्यापूर्वी 34व्या मिनिटाला नॉर्थईस्टचा कर्णधार झोकोरा आणि मुंबईचे व्यवस्थापक अलेक्‍झांड्रे ग्युईमारेस यांच्यात शाब्दिक चकमक झडली होती. मुंबई सिटीच्या जॅकीचंद सिंगने आज वारंवार नॉर्थईस्टच्या रिंगणात मुसंडी मारली होती. सामन्याच्या सहाव्या मिनिटास कर्णधार दिएगो फॉर्लानच्या पासवर जॅकीचंदचा प्रयत्न किंचित हुकला होता. त्यानंतर 29व्या मिनिटाला मुंबईचा गोलरक्षक आल्बिनो गोम्स याच्या दक्षतेमुळे नॉर्थईस्टला आघाडी घेता आली नाही. स्पर्धेत लक्षवेधक ठरलेल्या या गोलरक्षकाने एमिलियानो अल्फारो याचा फटका अडविताना चपळाईचे सुरेख प्रात्यक्षिक दाखविले. विश्रांतीला दोन मिनिटे बाकी असताना नॉर्थईस्टची आणखी एक चांगली संधी वाया गेली. झोकोरा याने दिलेल्या पासवर अल्फारो याने मुंबईचा बचाव चिरला होता, परंतु बचावपटू लुसियान गोईयान याच्या दक्षतेमुळे अल्फारो यशस्वी ठरला नाही. मुंबईला 57व्या मिनिटास मुंबईला आणखी एक गोल करण्याची संधी होती. दिएगो फॉर्लानच्या कॉर्नर फटक्‍यावर क्रिस्तियान व्हाडोत्झ याचा हेडर दिशाहीन ठरला. सामन्याच्या 65व्या मिनिटास मुंबईने आक्रमण अधिक तेज करण्याच्या उद्देशाने सोनी नोर्दे याला माघारी बोलावून मातियास डेफेडेरिको याला मैदानात पाठविले. 73व्या मिनिटाला दुखापतीमुळे जॅकीचंद सिंग याला मैदान सोडावे लागले. त्याची जागा आशुतोष मेहता याने घेतली. सामन्याच्या 73व्या मिनिटाला मुंबईचा गोलरक्षक आल्बिनो गोम्स याच्या दक्षतेमुळे नॉर्थईस्टचे आक्रमण फोल ठरले. त्याने सेईत्यासेन सिंगचा हेडर अडविताना कमालीची दक्षता दाखविली. त्यानंतर नॉर्थईस्ट पुन्हा आक्रमण केले, परंतु त्यांना यश मिळाले नाही. सामन्याच्या “स्टॉपेज टाईम’मध्ये मुंबई सिटीच्या राल्टे याने जबरदस्त फटका मारला होता, परंतु नॉर्थईस्टचा गोलरक्षक वेलिंग्टन गोम्सच्या दक्षतेमुळे हा प्रयत्न यशस्वी ठरला नाही.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *