चेन्नईयीन एफसीने नोंदविला पहिला विजय गतविजेत्यांची दोन गोलांनी बाजी, एफसी गोवाचा सलग तिसरा पराभव

चेन्नई, दिनांक 13 ऑक्‍टोबर 2016: चेन्नईयीन एफसीने हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी चमकदार विजय मिळविला. यंदाच्या स्पर्धेत गतविजेत्यांनी जिंकलेला हा पहिलाच सामना ठरला. पूर्वार्धात दोन गोल नोंदवत त्यांनी एफसी गोवाला नमविले. गतउपविजेत्यांना सलग तिसरा पराभव स्वीकारावा लागला. चेन्नईयीन एफसीचा पहिला गोल 15व्या मिनिटास हॅन्स म्युल्डर याने, तर दुसरा गोल 26व्या मिनिटास मेहराजुद्दीन वाडू याने नोंदविला. म्युल्डर याचा हा यंदाच्या आयएसएल स्पर्धेतील दुसरा गोल ठरला. गतमोसमातील आयएसएल स्पर्धेच्या अंतिम लढतीत चेन्नईयीनने एफसी गोवाला हरविले होते. आजही मार्को माटेराझी याच्या मार्गदर्शनाखालील संघाने एफसी गोवाविरुद्ध विजयी मालिका कायम राखली. चेन्नईयीनच्या म्युल्डर याने आज शानदार खेळ केला. सामन्यात तीन गुणांची कमाई केल्याने चेन्नईयीनची स्पर्धेतील स्थितीही सुधारली आहे. त्यांचे तीन सामन्यांतून चार गुण झाले आहेत. तिसऱ्या पराभवामुळे स्पर्धेत अजूनपर्यंत एकही गुण न नोंदविलेला एफसी गोवा हा एकमेव संघ आहे. उत्तरार्धात संधी साधल्या असत्या, तर यजमान संघाला आणखी मोठा विजय मिळाला असता. चेन्नईयीन एफसीचा भक्कम बचाव आज एफसी गोवासाठी भारी ठरला. एफसी गोवा संघाच्या बचावफळीतील त्रुटींचा लाभ उठवत चेन्नईयीन एफसीने पूर्वार्धात आपली स्थिती बळकट केली. राफाएल आगुस्तोच्या “असिस्ट’वर एफसी गोवाचा कर्णधार आणि बचावफळीतील प्रमुख खेळाडू लुसियो याला गुंगारा देत म्युल्डरने चेन्नईयीनला आघाडीवर नेले. यावेळी एफसी गोवाचा बचाव साफ उघडा पडला. नऊ मिनिटानंतर पुन्हा एकदा एफसी गोवाच्या बचावफळीस भगदाड पडले. बलजित साहनीच्या “असिस्ट’वर वाडूच्या शानदार क्रॉसपासवर चेंडू एफसी गोवाचा बचावपटू राफाएल दुमास याला आपटून गोलजाळीत गेला. यावेळी गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी हतबलपणे चेंडूकडे पाहण्यावाचून काहीच करू शकला नाही. दोन गोलांच्या पिछाडीनंतर एफसी गोवाने विश्रांतीपर्यंत गोल करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश मिळाले नाही. 36व्या मिनिटाला साहिल ताव्होरा याच्या अप्रतिम पासवर राफाएल कुएल्होचा हेडर दिशाहीन ठरला. विश्रांतीला तीन मिनिटे बाकी असताना राफाएल कुएल्होचा फटका पुन्हा चुकला. सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला एफसी गोवास गोल करण्याची संधी होती. गोलरक्षक करणजित सिंग व एली साबिया यांच्यातील गोंधळाचा लाभ एफसी गोवाला उठविता आला नाही. उत्तरार्धातील पहिल्याच मिनिटास एफसी गोवा संघाचे प्रशिक्षक झिको यांनी बचावफळीतील लुसियो याला बदलून रिचार्लीसन याला मैदानात पाठविले. त्यामुळे कर्णधाराचा “आर्मबॅंड’ होफ्रे याच्याकडे आला. विश्रांतीनंतरच्या चौथ्या मिनिटाला एफसी गोवाने पुन्हा एकदा गोलसाठी प्रयत्न केला. राफाएल दुमासच्या पासवर राफाएल कुएल्होने चेंडू नियंत्रित केला, परंतु त्याला फटका योग्य दिशा राखू शकला नाही. सामन्याच्या 71व्या मिनिटास एफसी गोवा संघाचा प्रयत्न हुकला. यावेळी रिचार्लीसनचा प्रयत्न कमजोर ठरला. त्यानंतर चेन्नईयीनने जोरदार प्रतिआक्रमण रचताना एफसी गोवाच्या रिंगणात मुसंडी मारली. म्युल्डरच्या “असिस्ट’वर डेव्हिड झुसी याचा प्रयत्न वेळीच रोखला गेला. त्यामुळे चेन्नईयीनची आघाडी दोन गोलांपुरती मर्यादित राहिली. 78व्या मिनिटाला तिसरा गोल नोंदविण्याची चेन्नईयीनची संधी थोडक्‍यात हुकली. हॅन्स म्युल्डरच्या “असिस्ट’वर बलजित साहनी याला गोलरक्षकाला चकविण्याऐवजी फटका दिशाहीन मारला. सामना संपण्यास एक मिनिट बाकी असताना एफसी गोवाच्या त्रिनदाद गोन्साल्विसने गोलसाठी प्रयत्न केला, परंतु दक्ष गोलरक्षक करणजित सिंगने चेंडूचा अंदाज बांधत फटका अडविला.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *