गतविजेत्या चेन्नईयीनची "टॉपर' नॉर्थईस्टवर मात

गुवाहाटी, दिनांक 20 ऑक्‍टोबर 2016: विश्रांतीनंतरच्या चौथ्या मिनिटाला डेव्हिड सुसी याने नोंदविलेल्या गोलमुळे गतविजेत्या चेन्नईयीन एफसीने हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत अव्वल स्थानावरील नॉर्थईस्ट युनायटेडला हरविले. येथील इंदिरा गांधी ऍथलेटिक स्टेडियमवर झालेला हा सामना पाहुण्या संघाने 1-0 अशा फरकाने जिंकला. सामन्यातील निर्णायक गोल 49व्या मिनिटाला इटालियन स्ट्रायकर सुसी याने नोंदविला. त्या बळावर चेन्नईयीनला यंदाच्या स्पर्धेतील दुसरा विजय नोंदविता आला. गुवाहाटीत त्यांचा हा पहिलाच विजय आहे. मार्को माटेराझी यांच्या मार्गदर्शनाखालील गतविजेत्यांचे आता चार सामन्यांतून सात गुण झाले आहेत. हा संघ तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. नॉर्थईस्ट युनायटेडचा हा घरच्या मैदानावरील यंदाचा पहिलाच पराभव ठरला. त्यांची ही एकंदरीत दुसरी हार असून सहा सामन्यांतून 10 गुण कायम राहिले आहेत. पराभवामुळे अव्वल स्थानावर फरक पडलेला नसून नॉर्थईस्ट युनायटेड संघ मुंबई सिटी एफसीपेक्षा दोन गुणांनी पुढे आहे. शेवटच्या 15 मिनिटांच्या खेळात नॉर्थईस्टला वारंवार कॉर्नर मिळाले, मात्र त्याला लाभ यजमानांना उठविता आला नाही. चेन्नईयीनचा बचाव भक्कम ठरला. बचावफळीत बर्नार्ड मेंडी, तसेच गोलरक्षक करणजित सिंग यांनी उत्तरार्धात बजावलेली दक्ष कामगिरी पाहुण्या संघासाठी निर्णायक ठरली. त्यामुळे त्यांची आघाडीही अबाधित राहिली. सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये कात्सुमी युसाच्या फ्रीकिकवर एमिलियानो अल्फारोचा हेडर गोलपट्टीवरून गेल्याने चेन्नईयीनचा विजय पक्का झाला. पूर्वार्धात मैदान सोडलेल्या निकोलस वेलेझ याची अनुपस्थिती नॉर्थईस्टला उत्तरार्धात तीव्रतेने जाणवली. विश्रांतीनंतरच्या चौथ्या मिनिटाला चेन्नईयीन एफसीने आघाडी संपादली. डेव्हिड सुसी याने नोंदविलेला हा गोल डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. यंदाच्या मोसमातील सर्वोत्तम गोलपैकी एक ठरावा असाच होता. सियाम हंगलच्या “असिस्ट’वर सुसीने चेंडू नियंत्रित केला. यावेळी इटालियन स्ट्रायकर गोल करेल अशी कोणाचीच अपेक्षा नव्हती. तो गोलपोस्टसमोरही नव्हता. अशा अवस्थेत त्याने सणसणीत फटक्‍यावर नॉर्थईस्टचा गोलरक्षक सुब्रत पॉल याला सपशेल चकविले. सामन्याच्या 62व्या मिनिटाला नॉर्थईस्ट बरोबरी साधू शकला असता, परंतु यावेळी होलिचरण नरझारी चेन्नईयीनचा बचाव भेदू शकला नाही. कात्सुमी युसा याने डाव्या बगलेतून क्रॉस पासवर नरझारी याला गोल करण्याची सुरेख संधी होती, मात्र जेरी लालरिनझुआला याने योग्यवेळी उपस्थिती जाणवून देत चेंडूला रोखले. उत्तरार्धात खेळ रंगतदार ठरला, खेळाडूही संयम गमावू लागले. मात्र रेफरींवर रेड कार्ड दाखविण्याची पाळी आली नाही. 68व्या मिनिटाला नॉर्थईस्टचा यशस्वी खेळाडू एमिलियाने अल्फारो गोल करण्याच्या अगदी जवळ आला होता. चेन्नईयीनचा बचावपटू बर्नार्ड मेंडीने वेळीच अल्फारोस अडथळा आणून संघाला आघाडी अबाधित राखली. सामन्याची शेवटची दहा मिनिटे बाकी असताना नॉर्थईस्टचे दोन चांगले प्रयत्न हुकले. होलिचरण नरझारीचा हेडर मेंडीने फोल ठरविला, तर सुमीत पास्सीचा भेदक हेडक गोलरक्षक करणजितने झेपावत उत्कृष्टपणे अडविला. सामन्याच्या पहिल्या दहा मिनिटांच्या खेळात विशेष काहीच घडले नाही, मात्र नंतर खेळात रंगत भरू लागली. 16व्या मिनिटाला चेन्नईयीनला आघाडी घेण्याची चांगली संधी होती. बलजित साहनी ताकदवान फटका मारू शकला नाही, त्यामुळे गोलरक्षक सुब्रतला चेंडू अडविण्यास फारसे प्रयास पडले नाहीत. 29व्या मिनिटाला चेन्नईयीनला पुन्हा एकदा सदोष नेमबाजी नडली. मॉरिझियो पेलिसोच्या आक्रमक फटक्‍यावर गोलरक्षक सुब्रत पॉलची दक्षता निर्णायक ठरली.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *