मुंबईची राजकोटमध्ये 'सुपर ओव्हर', बुमराच्या अचूक टप्प्याने केला गुजरात लायन्सचा पराभव

राजकोट: आठपैकी केवळ दोन सामने गमावणाऱ्या मुंबई इंडियन्सला गुजरात लायन्सने १५४ धावांच्या माफक लक्ष्यासाठी रडवले खरे, परंतु मोसमातील टाय झालेल्या पहिल्याच सामन्यात ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराने टिच्चून गोलंदाजी करीत मुंबई इडियन्सला हातातून गेलेला विजय परत मिळवून दिला. १२ चेंडूंत १५ धावांची गरज, पाच गडी बाकी. अशी परिस्थिती असतानाही मुंबई इंडियन्स १२ चेंडूत पाचही गडी गमावत १४ धावा करू शकला आणि सामना ‘टाय’ झाला. सोपा असा विजय मुंबई इंडियन्सने मोठे फटाके मारण्याच्या नादात सोडला आणि गुजरातला कोणतीही संधी नसताना सामन्यात पुन्हा आणले. टाय झालेल्या सामन्यात ‘सुपर ओव्हर’ मध्ये मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा बाजी मारत अटीतटीचा विजय मिळवला आणि आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा खुश केले. मागच्या सामन्यातही पुणेविरुद्ध असाच पाठलाग करताना तीन धावांनी पराभव पत्करावा लागला होता. पण आजच्या सामन्यात भाग्य मुंबईच्या बाजूने होते असेच म्हणता येईल. गुजरातच्या आक्रमकतेला मुंबईचा ब्रेक रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध दिमाखात विजय मिळवलेल्या गुजरात लायन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मागच्या सामन्यास मुकलेले लसिथ मलिंगा व कृणाल पांड्या यांना आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने संधी दिली. गुजरात लायन्सने मागच्या  सामन्याची आपली सलामी जोडी ईशान किशन व ब्रेंडन मॅकुलम यांच्याकरवी डावाची सुरुवात केली. ईशान किशनने मुंबई इंडियन्सच्या वेगवान गोलंदाजांना चांगलेच झोपून काढले तर विस्फोटक मॅकुलम (६ धावा, ६ चेंडू, १ चौकार) मलिंगाला षटकार मारण्याच्या नादात त्रिफळाचित झाला. पुढच्याच षटकात ईशान किशनने मिचेल मॅक्लेनघनला एक षटकार व दोन चौकार खेचत तब्बल १५ धावा कुटल्या. चौथ्या षटकात पाचारण केलेल्या हरभजन सिंगचाही समाचार घेत ईशान किशनने दोन चौकार खेचत १० धावा ठोकल्या. पाचव्याच षटकात जसप्रीत बुमराकरवी चौथा गोलंदाज वापरण्याचा रोहित शर्माचा निर्णय काहीसा योग्य ठरला आणि गुजरातचा कर्णधार सुरेश रैनाला (१ धाव, ३ चेंडू) पोलार्डकडे झेल देत गुजरातला दुसरा धक्का दिला. बुमराने या षटकात केवल एकाच धाव दिली. पावरप्लेच्या शेवटच्या षटकात मलिंगाने फिंचचाही त्रिफळा उडवीत तिसरा धक्का दिला. फिंचला आपले खातेही उघडता आले नाही. समाधानकारक शेवट ठराविक अंतराने एकामागून एक धक्के बसणाऱ्या गुजरात लायन्सला मधल्या व तळाच्या फलंदाजांनी सावरले. मॅकुलम, रैना, फिंच, दिनेश कार्तिक स्वस्तात तंबूत परतल्यानंतर युवा ईशान किशनने एका बाजूने काहीसा तग धरला. बाद होण्यापूर्वी त्याने ४८ धावा (३५ चेंडू, ६ चौकार, २ षटकार) केल्या. अनुभवी हरभजनच्या फिरकीचा अचूक अंदाज न आल्याने  तो पोलार्डकडे झेल देऊन बाद झाला. किशन व्यतिरिक्त रवींद्र जडेजा (२८ धावा, २१ चेंडू), जेम्स फॉकनर (२१ धावा, २७ चेंडू), अँड्रू टाय (२५ धावा, १२ चेंडू) यांच्या खेळीच्या जोरावर गुजरात लायन्सने २० षटकांत नऊ गडी गमावत १५३ धावा केल्या. मुंबईकडून कृणाल पांड्याने सर्वाधिक ३ गडी टिपले. मुंबईची आक्रमक सलामी आक्रमक सलामीसाठी यंदाच्या मोसमात प्रसिद्ध असलेली पटेल-बटलर ही जोडी अपेक्षेप्रमाणे प्रतिस्पर्धी संघावर आक्रमक ठरली. पहिल्या तीन षटकांत तब्बल ४० धावा ठोकत मुंबई इंडियन्सला भरभक्कम सलामी दिली. बेसिल थंपी (१३), जेम्स फॉकनर (११), इरफान पठाण (१६) यांची येथेच्छ धुलाई करत या जोडीने जॅम धरला. चौथ्या षटकात फिरकी गोलंदाजांना आमंत्रित करीत मुंबईची धावगती काहीशी कमी करण्याचा रैनाने प्रयत्न केला. दरम्यान चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चुकामुक झाली आणि फॉकनरच्या पॉईंटवरून आलेल्या अचूक थ्रोने बटलरचा (९ धावा, ७ चेंडू, २ चौकार) बळी घेत मुंबई इंडियन्सला पहिला धक्का बसला. पार्थिव पटेलची झुंजार फलंदाजी चांगल्या सुरुवातीनंतर मुंबईला मधल्या फळीची चिकट फलंदाजीची आज कमतरता भासली. सलामीवीर पार्थिव पटेलने एका बाजूने किल्ला लढवीत संघाला लक्ष्यापर्यंत नेण्याचा प्रयन्त केला परंतु नितीश राणा (१९ धावा, १६ चेंडू), रोहित शर्मा (५ धावा, १३ चेंडू), पोलार्ड (१५ धावा, ११ चेंडू) यांच्या फलंदाजीचा फरक मुंबई इंडियन्सच्या पाठलागावर पडला. पटेल (७० धावा, ४४ चेंडू, ९ चौकार, १ षटकार) बाद झाल्यानंतर मुंबईचा डाव गडगडला. मुंबई इंडियन्सने आपले पाच गडी शेवटच्या दोन षटकांत गमावल्यानंतर सामना बरोबरीत सुटला. आजच्या सामन्यात मुंबईचे तब्बल चार फलंदाज धावबाद झाल्याचा फटका मुंबईला चांगलाच बसला. कृणाल पांड्याने २० चेंडूत २९ धावा करीत केविलवाणा प्रयत्न केला खरा परंतु त्याला इतर फलंदाजांकडून मदत न मिळाल्यामुळे शेवटच्या चेंडूवर सामना बरोबरीत सुटला. रवींद्र जडेजाने दोन अचूक निशाणे धरत गुजरात लायन्सला सामन्यात आणले. मोसमातील पहिली ‘सुपर ओव्हर’ यंदाच्या मोसमात दोन्ही संघाच्या समान धावा झाल्याने सामन्याचा निकाल सुपर ओव्हरने केला. मुंबईने सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करीत ११ धावा केल्या. पोलार्डने फॉकनरला एक चाकर व षटकार ठोकत सुरुवात चांगाई केली परंतु पुढील दोन चेंडूवर पोलार्ड पाठोपाठ जोस बटलरही बाद होत एक चेंडू बाकी ठेवत मुंबईला केवळ ११ धावा बनवता आल्या. मुंबई इंडियन्सने युवा जसप्री बुमराने नो बॉलने सुरुवात करीत गुजरात लायन्सला एक धावेने खाते खोलून दिले. एक चेंडूनंतर पुन्हा वाईड टाकत मुंबईच्या गोत्यात निराशा टाकली. परंतु अचूक यॉर्करसाठी प्रसिद्ध असलेल्या बुमराने अचूक टप्पा टाकत ब्रेंडन मॅकुलम व ऍरॉन फिंच यांसारख्या अनुभवी व या प्रकारातील कसलेल्या फलंदाजांना बांधून ठेवत मुंबईला विजयश्री खेचून आणले. १२ धावांचा लक्ष पार करणाऱ्या गुजरात लायन्सला ३ अतिरिक्त धावा मिळूनही केवळ सहाच धावा करता आल्या. मुंबईने या विजयासह नऊपैकी सात सामने जिंकत अंतिम चार संघांत आपले स्थान जवळजवळ पक्के केले आहे. मुंबई इंडियन्सचा पुढील सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध घराच्या वानखेडे मैदानावर महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर असेल.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *