बुमराने केला गड सर, भारताने राखेल मालिकेतील आव्हान कायम

नागपूर(भास्कर गाणेकर): शेवटच्या षटकात इंग्लंडला सामना जिंकण्यासाठी ८ धावांची गरज असताना जसप्रीत बुमराने टिच्चून मारा करीत केवळ २ धावा देत अटीतटीच्या सामन्यात ५ धावांनी विजया मिळवत मालिकेतील आव्हान कायम ठेवले. १९ व्या षटकातील नेहराच्या गोलंदाजीवर १६ धावा खर्च केल्याने भारत सामना गमावेल कि काय असे वाटत असताना ‘डेथ ओव्हर’ स्पेशालिस्ट बुमराने आपली जादू दाखवीत नागपूरच्या प्रेक्षकांना खुश केले. पहिला सामना गमावणाऱ्या भारतीय संघाला मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी आजच्या सामन्यात विजय आवश्यक होता. इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यापूर्वी नागपूरच्या मैदानावर झालेल्या १० सामन्यांपैकी ७ सामन्यांत पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने सामना जिंकला असूनही इंग्लंडने पाठलाग करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माच्या अनुपस्थित के. एल. राहुलच्या जोडीला पुन्हा एकदा कर्णधार विराट कोहली सलामीला आला आणि नागपूरच्या सपाट खेळपट्टीवर वेगाने धावा जमावण्यास सुरुवात केली. कोहलीने सुरुवातीच्या षटकांत वेगाने धावा जमवल्या परंतु एक मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. त्या नंतर आलेल्या सुरेश रैनालाही आज विशेष करता आले नाही. वेगाने धावा जमवण्याच्या दबावात तोही एक मोठा फटका मारत असताना बाद झाला. भारताच्या फलंदाजांना रोखण्यात इंग्लंड संघ आज पुन्हा एकदा यशस्वी झाला आणि ठराविक अंतराने त्यांनी भारताला धक्के दिले. दुसरीकडे सलामीवीर राहुलने खेळपट्टीवर तग धरीत आपले कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले आणि भारताला १०० धावांचा टप्पा गाठून दिला. मनीष पांडेने संयमी फलंदाजी करीत राहुलला चांगली साथ दिली. भारताने आपल्या निर्धारित २० षतकांत ८ गड्यांच्या मोबदल्यात १४४ धाव केल्या. भारतातर्फे राहुलने सर्वाधिक ७१ तर इंग्लंडातर्फे ख्रिस जॉर्डनने ३ गडी बाद केले. मालिकेत १-० ने आघाडीवर असलेल्या इंग्लंड संघाने आक्रमक सुरुवात केली. परंतु आशिष नेहराच्या अनुभवासमोर नवखे इंग्लिश फलंदाज टिकू शकले नाही. चौथ्या षटकात दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडत इंग्लंडला अडचणीत आणले. मधल्या फळीतील जो रूट, कर्णधार मॉर्गन व बेन स्टोक्स यांनी आक्रमक व संयमी फलंदाजी करीत सामन्यात पुन्हा एकदा रस आणला. अमित मिश्राने मॉर्गनला बाद करीत इंग्लंडला तिसरा धक्का दिला तर नेहराने १७ व्या षटकात स्टोक्सला बाद करीत सामना अधिक रोमांचक केला. शेवटच्या १२ चेंडूत २४ धावांची गरज असताना जोस बटलर व जो रूट यांनी १९ व्या षटकात तब्बल १६ धावा कुटल्या आणि भारताला पराभवाकडे झेपावले. शेवटच्या षटकात ८ धावा पाहिजे असताना जसप्रीत बुमराने अचूक टप्पा टाकीत केवळ दोन धावा खर्च केल्या आणि बटलर-रूट जोडीला बाद करीत भारताला ५ धावांनी सामना जिंकून दिला. बुमराला सामनावीर घोषित करण्यात आले. मालिकेतील शेवटचा सामना १ फेब्रुवारीला बंगळुरू येथे होईल.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *