बुमरा, मधल्या फळीने रोखला हैद्राबादचा विजयी रथ, मुंबईने जिंकला सलग दुसरा सामना

मुंबईच्या गोलंदाजांचा अचूक टप्पा व मधल्या फळीने केलेली शिस्तबद्ध फलंदाजी मुंबईला तंगड्या हैद्राबाद विरुद्ध महत्वाचा सामना जिंकून दिला. फॉर्मात असलेल्या नितीश राणाने आजची मोक्याच्या क्षणी फलंदाजी करीत मुंबईला तिसऱ्या स्थानी आणून ठेवले. मुंबई: रविवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध अटीतटीचा सामना जिंकून आत्मविश्वास वाढलेल्या मुंबईने आजची सनरायर्स हैद्राबाद विरुद्ध नाणेफेक जिंकून पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सर्वात अनुभवी हरभजन सिंगकरवी गोलंदाजीची सलामी केली. हरभजननेही आपल्या कर्णधाराला नाराज न करता टिच्चून गोलंदाजी करीत विस्फोटक डेव्हिड वॉर्नर व शिखर धवन यांना खुलून फलंदाजी करण्यास अंकुश घातले. डेव्हिड वॉर्नर म्हटला कि समोर येतो तो त्याचा घातक व विस्फोटक अंदाज. पण आजच्या पावरप्ले मध्ये उपस्थित प्रेक्षकांना असे काहीच दिसून आले नाही. मुंबईच्या हरभजन, मलिंगा व बुमराने पहिल्या सहा षटकांमध्ये केवळ ३४ धावा देत मुंबईसाठी चांगली सुरुवात दिली. पंचांनी केली मोठी चूक हैद्राबादच्या पावरप्लेच्या शेवटच्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरने बुमराला पॉईंट व थर्ड-मॅन च्या मध्ये चौकार लगावला व सातव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पुन्हा एकदा स्ट्राईक घेतली. आय. पी. एल. च्या इतिहासात अशी घटना बहुदा पहिल्यांदाच झाली असावी. पंच सी. के. नंदन यांनी मागच्या सामन्यातही मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याला चुकीचा निर्णय देऊन बाद घोषित केले होते. आय. पी. एल. सारख्या तगड्या स्पर्धेत पंचांकडून अश्या प्रकारच्या मोठ्या चुका वारंवार होणे ही एक लांच्छनास्पद गोष्ट आहे असेच म्हणावे लागेल. हैदराबादची संथ पण सावध सुरुवात पावरप्ले झाल्यानंतर हैद्राबादच्या सलामीवीरांनी जणू आपला खेळच बदलला. १५ चेंडूंत केवळ ७ धावा करणाऱ्या धवनने सातव्या षटकात २ चौकार व एका षटकारासह खेळलेल्या ५ चेंडूंत तब्बल १४ धावा कुठल्या. यावेळी त्याचा शिकार ठरला तो मिचेल मॅकग्लेघन. मागच्या सामन्यात चमकलेल्या पांड्या ब्रदर्सना आठव्या षटकात पुन्हा एकदा एक संधी मिळाली, परंतु हार्दिकच्या गोलंदाजीवर कृणालने घेतलेला झेल रिप्ले मध्ये नाबाद ठरवण्यात आला आणि मुंबईला जागी झालेली आशा निराशेत बदलली. मुंबईला पहिला गडी बाद करण्यासाठी तब्बल ११ व्या षटकाची वाट पाहावी लागली. पहिल्याच चेंडूवर षटकार खेचून एक रिव्हर्स स्वीप मारण्याच्या नादात वॉर्नर बाद झाला. किपर पार्थिव पटेलने उत्तम प्रकारे चेंडूवर नाराज ठेवून छानशी उडी मारत हा झेल टिपला. वॉर्नरने ५३ मिनिटे फलंदाजी करीत ७ षटकार व २ चौकारांसह ४९ धावा केल्या. अचूक टप्पा व भेदक मारा पुढच्या काही षटकांत पटापट धावा घेण्याच्या नादात हैद्राबादच्या खेळाडूंची काहीशी दमछाक झाली. १३ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर दीपक हुडा ९ धावांवर बाद झाला तर सलामीवीर शिखर धवन १५ व्या षटकात मॅकग्लेघनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला. त्याने ४३ चेंडूंत ४८ धावा केल्या. युवराज सिंगही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. हार्दिक पांड्याने त्याला पुढच्याच षटकात बोल्ड करीत हैद्राबादला चौथा धक्का दिला. युवराज ७ चेंडूंचा सामना करीत केवळ ५ धावा करू शकला. वॉर्नर-धवन नंतर बेन कटिंग चा अपवाद वगळता एकही फलंदाजाला खेळपट्टीवर १० पेक्षा जास्त चेंडू खेळता आले नाही. जवळजवळ प्रत्येक सामन्यात मोठी धावसंख्या होत असलेल्या मुंबईच्या वानखेडेवर मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी, विशेषतः वेगवान गोलंदाजांनी अचूक टप्पा व अचूक निशाणा साधत हैद्राबादच्या तगड्या फलंदाजीला डोकं वर काढू दिलं नाही. हैदराबादने २० षटके खेळून काढत ८ गडी गमावत धावफलकावर १५८ धावा जमवल्या. मुंबईतर्फे जसप्रीत बुमराने २१ चेधावांत ३, हरभजन सिंगने २३ धावा देत २ तर मलिंगा, मॅकग्लेघन व हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एक बळी टिपले. मुंबईची आक्रमक सुरुवात जवळजवळ आठच्या सरासरीने धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या मुंबई इंडियन्सने हैद्राबादच्या तुलनेत काहीशी आक्रमक सुरुवात केली. पावरप्लेमध्ये एकीकडे हैद्राबादचा रनरेट सहाच्या खाली होता तर इकडे मुंबईने पहिल्या सहा षटकांत १० च्या सरासरीने तब्बल ६१ धावा कुठल्या. दरम्यान मुंबईने आपले आघाडीचे दोन फलंदाज गमावले. सलामीवीर बटलर नेहराच्या स्लो चेंडूवर त्रिफळाचित झाला तर रोहित शर्माला नवख्या रशीद खानने पायचीत पकडले. बटलरने ११ चेंडूंत १४ तर रोहित ४ चेंडूंत केवळ ४ धावांचं योगदान देऊ शकला. मधल्या फळीची घोडदौड कायम सलामीच्या फलंदाजांकडून आतापर्यंत समाधानकारक अशी सुरुवात न मिळलेल्या मुंबई संघाला मधल्या फळीने वेळोवेळी तारले आहे. आजच्या सामन्यातही मुंबईच्या मधल्या फळीने पद्धतशीर फलंदाजीचा नजराणा उपस्थित प्रेक्षकांना पेश केला. ४१ धावांवर दोन फलंदाज बाद झाल्यानंतर मागच्या सामन्याचा शिल्पकार नवोदित नितीश राणाने पुन्हा एकदा फलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. आक्रमकता, संयमपणा, चालाखगिरी अगदी अचूकपणे दाखवत आणखी एक साजेशी खेळी केली. पोलार्ड बाद झाल्यानंतर युवा कृणाल पांड्याने नितीश राणासह सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. कृणालने बेन कटिंग व आशिष नेहरा यांची चांगलीच धुलाई केली. पाचव्या गड्यासाठी ३१ चेंडूंत झालेल्या ३८ धावांच्या भागीदारीत कृणालने एकट्याने ३७ धावा ठोकल्या. मिड विकेटला एक मोठा फटका मारण्याच्या नादात तो भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर कटिंगकडे झेल देऊन बाद झाला. त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विजयी फटका मारण्याच्या नादात राणाही बोल्ड झाला. त्याने ३६ चेंडूत तब्बल ६९ मिनिटे फलंदाजी करीत ३ चौकार व २ षटकार खेचत ४५ धावा केल्या. या वेळेस मुंबईला जिंकण्यासाठी केवळ ४ धावांची गरज होती. हरभजन सिंगने आठव्या क्रमांकावर येऊन १९ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर विजयी धाव घेत मुंबईला सामना ४ गडी व ८ चेंडू राखून जिंकून दिला. बुमराला सामनावीर घोषित करण्यात आलं.याचा विजयाबरोबर मुंबईने गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली. मुंबईचा पुढचा सामना परवा १४ तारखेला विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध होईल. संक्षिप्त धावफलक: सनरायर्स हैद्राबाद: १५८/८ (२०) वॉर्नर ४९(३४), धवन ४८(४३) । बुमरा ३-२४(४), हरभजन २-२३(४) मुंबई इंडियन्स: १५९/६(१८.४) राणा ४५(३६), पार्थिव ३९(२४) । भुवनेश्वर ३-२१(४), हुडा १-१८(२) मुंबई ४ गडी व ८ चेंडू राखून विजयी सामन्यातील काही ठळक आकडेवारी

  • मुंबई इंडियन्स साठी रोहित शर्माचा सलग १०० वा सामना, आय. पी. एल. मध्ये एकाच संघासाठी सलग जास्त सामना खेळणारा तिसरा फलंदाज. इतर फलंदाज – सुरेश रैना (१३२ चेन्नई सुपर किंग्स), विराट कोहली (१२९ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)
  • डेव्हिड वॉर्नरचे आय. पी. एल. मध्ये ३५० चौकार. गंभीर (४३७), रैना (३६७), कोहली (३५९), शिखर धवन (३५८) नंतर असा पराक्रम करणारा पाचवा फलंदाज
  • हरभजनचे वानखेडेवर टी-२० मध्ये ५० बळी, एकाच मैदानावर टी-२० मध्ये ५० बळी घेणारा पहिला भारतीय
  • पार्थिव पटेलच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये २००० धावा पूर्ण. एवढ्या धावा करणारा तो २६ वा फलंदाज ठरला
]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *