मंदिरे तोडून हिंदूंच्या भावनांचा अनादर केल्यास जनआंदोलनाला सामोरे जावे लागेल-मंदाताई म्हात्रे

हिवाळी अधिवेशनात भाजपच्या आमदार, सौ. मंदा म्हात्रे यांची प्रशासनाला चेतावणी ! नवी मुंबई, ११ डिसेंबर (वार्ता.) – श्रद्धास्थाने असलेली मंदिरे तोडून शासनाने हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अनादर करू नये. अन्यथा प्रशासनाला जनआंदोलनाला सामोरे जावे लागेल, अशी चेतावणी भाजपच्या आमदार सौ. मंदा म्हात्रे यांनी प्रशासनाला दिली. नवी मुंबई येथील हिंदूंची मंदिरे अनधिकृत ठरवून पाडण्यात येत असल्याचे सूत्र आमदार सौ. मंदा म्हात्रे यांनी औचित्याच्या सूत्रांमध्ये उपस्थित केले. नवी मुंबई महापालिका आणि सिडको प्रशासन यांच्याकडून येथील मंदिरे अनधिकृत ठरवून पाडण्यात येत आहेत. याविषयी काही दिवसांपूर्वी नवी मुंबई मंदिर समितीच्या वतीने आमदार सौ. म्हात्रे यांची भेट घेऊन त्यांना याविषयी निवेदन देण्यात आले होते. यावर आमदार सौ. म्हात्रे यांनी अधिवेशनात आवाज उठवण्याचे आश्‍वासन नवी मुंबई मंदिर समितीच्या कार्यकर्त्यांना दिले होते. या वेळी आमदार सौ. मंदा म्हात्रे म्हणाल्या, “नवी मुंबई येथील आताची मंदिरे म्हणजे भूमीपुत्रांच्या पूर्वजांनी त्यांच्या शेताच्या बांधावरील केलेल्या मंदिरांचे पुनर्वसन होय. या सर्व मंदिरांचा लेखाजोखा मंदिर समितीच्या कार्यालयीन दस्तावैजांमध्ये उपलब्ध आहे. तरीही स्थानिक प्रशासन सदर मंदिरांचा पुरावा मंदिर कार्यकारिणीकडे मागत आहे. मंदिरे ही हिंदूंची श्रद्धास्थाने आहेत. बहुसंख्य हिंदु मंदिरात जाऊन पूजा-अर्चा करत असतात. श्रद्धेपोटी लोकसहभागातून निर्माण केलेल्या या पुरातन मंदिरांशी हिंदु समाजाचे भावनिक नाते निर्माण झाले आहे. त्यामुळे मंदिरांना नष्ट करणे म्हणजे हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर केलेला मोठा आघात ठरेल. ही मंदिरे अधिकृत असतांना शासन पुन्हा मंदिर समित्यांकडे पुरावे मागत आहे. संबंधित विभागाने मंदिरे अधिकृत असल्याचा पुरावा आयुक्त किंवा जिल्हाधिकारी पातळीवरून घेणे आवश्यक आहे. मंदिर अनधिकृत असले तरी भाविकांनी श्रद्धेने बांधलेली ही मंदिरे न तोडता ती अधिकृत करून घ्यायला हवीत. मंदिरे तोडून भाविकांच्या श्रद्धेचा अनादर करण्याचा प्रयत्न शासनाने करू नये.”]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *