एटीके, नॉर्थईस्टसमोर खेळ उंचावण्याचे आव्हान

कोलकता, दिनांक 16 नोव्हेंबर 2016: अॅटलेटीको डी कोलकता आणि नॉर्थईस्ट युनायटेड एफसी यांच्यात हिरो इंडियन सुपर लिगमध्ये गुरुवारी लढत होत आहे. उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी संघर्ष करणाऱ्या या संघांसमोर खेळ उंचावण्याचे आव्हान आहे. त्यासाठी थोडे धोके पत्करणे त्यांना भाग पडेल. यंदाच्या आयएसएलमध्ये या दोन संघांमध्ये तीन गुण आणि तीन क्रमांकांचा फरक आहे, मात्र रबिंद्र सरोवर स्टेडियमवर तीन गुण कमावल्यास पारडे पलटू शकते याची दोन्ही संघांच्या प्रशिक्षकांना कल्पना आहे. 2014 मध्ये पहिली आयएसएल जिंकलेल्या एटीकेने यंदा पहिल्या पाच सामन्यांत अपराजित मालिका राखली. त्यांची वाटचाल चांगली सुरू होती, पण गेल्या चार सामन्यांत त्यांना दोन पराभव पत्करावे लागले. आता यापुढे धक्का बसल्यास उपांत्य फेरीची संधी निसटू शकते याची त्यांना जाणीव आहे. मागील सामन्यात त्यांना स्थान भक्कम करण्याची संधी होती, पण दिल्ली डायनॅमोजवर दहा जणांसह खेळण्याची वेळ येऊनही एटीकेने त्यांना बरोबरी साधू दिली. एटीकेचे प्रशिक्षक होजे मॉलीना 2-2 अशा बरोबरीविषयी म्हणाले की, पूर्वार्धात आम्ही चांगला खेळ केला, पण दुसऱ्या सत्रात तशी चुरस दाखवू शकलो नाही. आता एटीकेपेक्षा तीन गुणांची जास्त गरज नॉर्थईस्टला आहे. नॉर्थईस्टने पहिल्या चार पैकी तीन लढती जिंकून मोहीमेची सुरवात चांगली केली, पण गेल्या पाच सामन्यांत त्यांना एकही विजय नोंदविता आलेला नाही. नॉर्थईस्टसाठी चिंतेची बाब म्हणजे त्यांच्या आघाडी फळीला धडाका दाखविता आला नसून केवळ तीनच खेळाडू गोल करू शकले आहेत. यंदा आतापर्यंत सहभागी संघांमध्ये ही संख्या सर्वांत कमी आहे. नेलो विंगाडा प्रशिक्षक असलेल्या संघासाठी मागील सामन्यात एफसी गोवाविरुद्ध झालेला पराभव वेदनादायक ठरला. आघाडी घेतल्यानंतर तसेच प्रतिस्पर्ध्यावर दहा जणांसह खेळण्याची वेळ येऊनही नॉर्थईस्टला फायदा उठविता आला नाही. पोर्तुगालच्या या प्रशिक्षकांनी पराभवाची जबाबदारी स्विकारली, पण ते हार मानण्यास तयार नाहीत. ते म्हणाले की, हा पराभव माझ्यासाठी धक्कादायक ठरला. तीन गुण कमावण्याची फार चांगली संधी आम्ही दवडली. या पराभवानंतर संघाचे मनोधैर्य नक्कीच खचले आहे, पण आतापर्यंत कुणीच उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले नसल्यामुळे आम्ही संपलेलो नाहीत. क्लबसाठी संघाने उपांत्य फेरी गाठावी असे माझे ध्येय आहे, पण गोव्याकडून हरल्यामुळे आमची दोन पावले पिछेहाट झाली. सलग चार सामने हरलेला नॉर्थईस्ट हा एकमेव संघ आहे, पण सर्वाधिक गोल केलेला एमिलीयनो अल्फारो आणि महत्त्वाचा मध्यरक्षक रोमॅरीक हे दोघे सघात परतल्यामुळे त्यांचा उत्साह वाढला आहे. अल्फारो मागील सामन्यासाठी निलंबीत होता, तर जायबंदी झाल्यामुळे रोमॅरीक केवळ 79व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून गोव्याविरुद्ध खेळू शकला. आता हे दोघे महत्त्वाचा वाटा उचलण्याची अपेक्षा आहे. नॉर्थईस्ट नऊ सामन्यांतून दहा गुणांसह सातव्या स्थानावर आहे. जिंकल्यास ते पहिल्या चारमध्ये जाऊ शकतात. तसे झाल्यास पुन्हा मागे पडायचे नाही यासाठी विंगाडा प्रयत्नशील असतील.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *