विधानसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी लागणार २५ हजार अधिकारी व कर्मचारी

सोलापूर, (श्रीकृष्ण देशपांडे):- विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठीच्या कामासाठी सुमारे पंचवीस हजार अधिकारी व कर्मचारी लागणार आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने आराखडा आखायला सुरवात केली असून यासाठी आज जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या या बैठकीस सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
विधानसभेच्या जिल्ह्यातील मतदारसंघात निवडणूक विषयक कामकाज व्यवस्थित व्हावे यासाठी योग्य आणि पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध करुन घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आतापासूनच नियोजन करायला सुरवात केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात झालेल्या चुका टाळून सुरळीतपणे काम व्हावे यासाठी सर्वानी दक्ष राहावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी सांगितले. सर्व शासकीय कार्यालयात मतदान जागृती मंच स्थापन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
विधानसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी विविध विभागाकडून मनुष्यबळ घ्यावे लागणार आहेत. त्याबाबतची माहिती देतांना काळजी घ्यावी, अशा सूचनाही श्री. देशमुख यांनी दिली. अधिकारी कर्मचारी यांची माहिती देताना त्यांचे ग्रेड वेतन आणि पद यांचा बिनचूक उल्लेख करावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी एनआयसीच्या स्नेहल होनकळसे यांनी कर्मचाऱ्यांची माहिती कशाप्रकारे दिली पाहिजे याची माहिती द्यावी, याबाबतीत सविस्तर माहिती दिली.
उपजिल्हाधिकारी शैलेश सुर्यवंशी यांनी निवडणूक विषयक प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. प्रशिक्षणात काही बदल करणे अपेक्षित असेल त ते लवकरच जिल्हा निवडणूक कार्यालयास कळविण्यात यावेत असे त्यांनी सांगितले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी  स्नेहल भोसले, तहसिलदार डी. एस.कुंभार, तहसीलदर श्रीकांत पाटील उपस्थित होते.

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *